Zika Virus : गरोदर महिलांनो काळजी घ्या! 'झिका' व्हायरस ठरतोय धोकादायक, काय काळजी घ्याल? आरोग्य तज्ज्ञ सांगतात...
Zika Virus : झिका व्हायरसचा सर्वाधिक धोका गरोदर महिलांना असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. गरोदर स्त्रियांनी काळजी कशाप्रकारे घ्यावी? जाणून घ्या..
Zika Virus : पुण्यात (Pune) झिका व्हायरसचे दोन रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झालीय. पावसाळा असल्याने अनेक आजार डोकं वर काढत असतानाच पुण्यात याचे दोन रुग्ण आढळले आहेत. झिका व्हायरसचा सर्वाधिक धोका गरोदर महिलांना असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. या संदर्भात पुणे येथील प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांनी नागरिकांनी घाबरून न जाता कशी काळजी घ्यावी? याबाबत सांगितलंय. तर गरोदर महिलांना या व्हायरचा सर्वाधिक धोका असल्याचंही त्यांनी म्हटलंय. याची लक्षणं काय? तसेच गरोदर महिलांवर याचा कसा परिणाम होतो? जाणून घेऊया..
गरोदर महिलांमध्ये झिका व्हायरसचा संसर्ग धोकादायक - डॉ. कल्पना बळीवंत, पुणे
डॉ. कल्पना बळीवंत म्हणाल्या, हा एक विषाणूजन्य आजार आहे, ज्याचा प्रसार एडिस या मादी डासामुळे होतो, हा एक विषाणूजन्य डास आहे. जेव्हा हा डास जास्त लोकांना चावतो तेव्हा त्या रक्तातून विषाणू शरीरात पोहचतात. त्यामुळे मुळात व्हायरल इन्फेक्शन होऊ नये म्हणून, सुरूवातीची प्रतिबंधात्मक कारवाई म्हणजे आपल्या घरात डासांची उत्पत्ती होऊ न देणे, एडीस डास कमी पाण्यामध्ये वाढणारा डास आहे. त्यामुळे घरामध्ये अगदी दोन ते पाच लिटर ते मोठ्या दहा ते वीस लिटर पर्यंतच्या पाणी साठ्यात एडिस या डासाची उत्पत्ती होऊ शकते. डॉक्टर पुढे म्हणाल्या, पाच ते सहा दिवसापेक्षा जास्त जर पाणी एकाच ठिकाणी साठवून राहील, तर त्याच्या आजूबाजूला डास जमा होतील, आणि मग डासाची मादी अशा पाण्यामध्ये अंडी टाकते, ज्यामुळे डासांची उत्पत्ती वाढते. डॉक्टर सांगतात, सामान्य लोकांसाठी सांगायचं तर, याची लक्षणं जास्त नाही, पण गरोदर महिलांमध्ये याचा संसर्ग धोकादायक ठरू शकतो. याचा थेट परिणाम महिलेच्या गर्भावर होऊ शकतो.
झिका विषाणूचा गर्भावर काय परिणाम होतो?
आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, झिका व्हायरस टाळण्यासाठी गरोदर स्त्रियांनी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण याचा सर्वाधिक धोका गर्भावर होतो. त्यामुळे गरोदरपणात जर झिका विषाणूचा संसर्ग झाल्यास, बाळाचा मेंदू सामान्यपणे वाढू शकत नाही आणि विकसित होऊ शकत नाही. परिणामी, बाळाचा जन्म मेंदूच्या विकासाशी संबंधित अपंगत्व घेऊन होऊ शकतो, किंवा त्याचे डोके लहान असू शकते, तसेच बाळामध्ये ऐकणे, शिकणे आणि वागण्यात देखील समस्या असू शकतात. पहिल्या तिमाहीत झिका संसर्ग झाल्यानंतर या समस्यांचा धोका सर्वाधिक असतो. झिका विषाणूचा गर्भधारणेचे प्रमाण घटण्याशी देखील संबंध आहे.
गरोदरपणात झिका व्हायरसपासून स्वतःचे संरक्षण कसे कराल?
-झिका विषाणूचे प्रमाण जास्त असलेल्या भागात जाणे टाळा.
-झिका विषाणू संक्रमित किंवा झिका विषाणू असलेल्या भागात प्रवास केलेल्या जोडीदारासोबत असुरक्षित लैंगिक संबंध टाळा.
-जर झिका बाधित क्षेत्राचा प्रवास टाळता येत नसेल तर, डास चावण्यापासून टाळण्यासाठी कठोर उपाय योजले पाहिजेत
-सकाळपासून संध्याकाळपर्यंत शक्य तितके घरात राहणे. झिका विषाणू पसरवणारे डास प्रामुख्याने दिवसाच्या प्रकाशात सक्रिय असतात
-हलक्या रंगाच्या, सैल-फिटिंग कपड्यांनी शक्य तितकी त्वचा झाकणे.
-कपड्यांवर आणि मच्छरदाणीवर कीटकनाशक लावणे जे संपर्कात असलेल्या डासांना मारते.
-दारे आणि खिडक्यांवर मच्छरदाणी वापरणे.
-बेडवर मच्छरदाणी लावून झोपणे.
झिका व्हायरसची लक्षणं कोणती?
ताप
सांधेदुखी
अंगदुखी
डोकेदुखी
डोळे लाल होणे
उलटी होणे
अस्वस्थता जाणवणे
अंगावर पुरळ उठणे
काळजी कशी घ्याल?
डासांपासून दूर राहणे
घराच्या खिडक्या आणि दरवाज्यांना जाळी लावा.
पाण्याची डबकी होऊ न देणे
पाणी जास्त काळ साठवून ठेवू नका
घर आणि परिसर स्वच्छ ठेवा
मच्छरदाणीचा वापर करा.
हेही वाचा>>>
Women Health : 'महिलांनो..इतरांची काळजी घेता, पण स्वत:च्या आरोग्याचं काय?' वयाच्या चाळीशीनंतर 'अशी' काळजी घ्या, म्हातारपणा राहील दूर
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )