(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Women Health : मूल तर हवंय? IVF प्रक्रियेची भीतीही वाटतेय? घाबरु नका.. समज-गैरसमज जाणून घ्या, डॉक्टर सांगतात...
Women Health : नैसर्गिकरित्या मूल होऊ शकत नाही, त्यासाठी आयव्हीएफ हा एक उत्तम पर्याय समजला जातो. मात्र काही महिलांमध्ये याबाबत अनेक समज-गैरसमज आहेत.
Women Health : बदलती जीवनशैली, कामाचा ताण, व्यायामाचा अभाव यासारख्या अनेक गोष्टींमुळे अनेकांना विविध आजारांनी ग्रासलंय, विशेषत: महिला या कौटुंबिक आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळताना स्वत:ची काळजी घ्यायला विसरतात. वाढत्या वयानुसार महिलांच्या शारिरीक आणि मानसिक स्थितीत अनेक बदल होत जातात. ज्याचा परिणाम अनेक महिलांना सहन करावा लागतो. तर काही महिला या लग्नाला अनेक वर्ष होऊनही मूल झाले नसल्यामुळे चिंतेत आहेत. त्यासाठी त्या अनेक उपायांचा अवलंब करतात. ज्यांना नैसर्गिकरित्या मूल होऊ शकत नाही, त्या जोडप्यांसाठी आयव्हीएफ हा एक उत्तम पर्याय समजला जातो. मात्र काही महिलांमध्ये याबाबत अनेक समज-गैरसमज आहेत. काही महिलांना याच्या प्रक्रियेची भीती वाटते. यावर पुण्याच्या नोवा आयव्हीएफ फर्टिलिटी सेंटरच्या प्रजनन सल्लागार डॉ. करिश्मा डाफळे यांनी महत्त्वाची माहिती दिलीय. जाणून घ्या सविस्तर...
पालकत्वाचा सुखद अनुभव घेता येईल
ज्या महिलांना नैसर्गिकरित्या मूल होऊ शकत नाही त्यांच्यासाठी आयव्हीएफ हा उत्तम पर्याय आहे. आयव्हीएफ अर्थात इंट्रो विट्रो फर्टिलायझेशन हे एक तंत्र असून शुक्राणु आणि स्त्रीबीज टेस्ट ट्यूबमध्ये एकत्र करून ही प्रक्रिया करण्यात येते. फलित अंडी, ज्यांना भ्रूण देखील म्हणतात. त्याचे गर्भाशयात रोपण केले जाते. या प्रक्रियेविषयी अनेक गैरसमज आढळून येतात. मात्र हे गैरसमज दूर करुन या प्रक्रियेचे फायदे जाणून घेतल्यास वंधत्वाचा सामना करणाऱ्या जोडप्यास पालत्वाचा सुखद अनुभव घेता येईल.
जोडप्यांसाठी ठरते आशेचा किरण
आयव्हीएफ ( इन विट्रो फर्टिलायझेशन) हे सहाय्यक पुनरुत्पादन तंत्रज्ञान (ART) चा एक प्रकार आहे. जो जोडप्यांमधील प्रजननक्षमतेशी संबंधित समस्यांवर उपचार करण्यासाठी सक्रियपणे वापरला जातो. ही वैद्यकीय प्रक्रिया वंध्यत्वाच्या समस्यांशी झुंजणाऱ्या जोडप्यांमध्ये आशेचा किरण ठरते. आयव्हीएफची निवड करण्यापूर्वी विविध घटकांचा विचार करणे आवश्यक आहे. सकारात्मक परिणामांसाठी प्रभावी उपचार योजनेसाठी प्रजनन चाचण्यांमुळे कोणता जोडीदार वंध्यत्वाच्या समस्येने ग्रस्त आहे हे ओळखण्यात मदत करू शकते.
विविध गैरसमजूती
यशस्वी गर्भधारणेसाठी आयव्हीएफ उपचार निवडणाऱ्या जोडप्यांबद्दल विविध गैरसमजूती पाहायला मिळतात. पॉलीसिस्टिक डिम्बग्रंथि रोग (पीसीओएस), अकाली डिम्बग्रंथि निकामी होणे, एंडोमेट्रिओसिस, फॅलोपियन ट्यूब खराब होणे, वाढते वय, शुक्राणूंची संख्या कमी होणे तसेच शुक्राणुंची गुणवत्ता, शुक्राणूंची मंद गती आणि असामान्य आकार अशा समस्यांमुळे वंधत्वाचा सामना करावा लागतो. यामुळे एखादया जोडप्याच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आणि चिंता, तणाव आणि नैराश्य यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
आयव्हीएफ उपचारांसंबंधित गैरसमजूती आणि वास्तविकता
आयव्हीएफ केवळ वयाने जास्त असलेल्या जोडप्यांसाठी आहे, असा गैरसमज पहायला मिळतो. वास्तविकता गर्भधारणेमध्ये वय ही महत्त्वाची भूमिका बजावते, कारण वाढत्या वयानुसार प्रजनन क्षमता कमी होऊ लागते. आयव्हीएफ सारखा उपचार हा एक उत्तम पर्याय आहे जो वंध्यत्वग्रस्त जोडप्यांना आणि विविध वयोगटातील व्यक्तींसाठी फायदेशीर ठरू शकतो. आयव्हीएफ प्रक्रिया ही जन्माला येणाऱ्या मुलांसाठी धोकादायक आहे हा देखील एक गैरसमज आहे. उलट आयव्हीएफद्वारे जन्मलेली बाळे इतर मुलांप्रमाणेच निरोगी असतात. या प्रक्रियेस जोडप्यांनी घाबरून जाऊ नये किंवा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही दबावाखाली न येता जोडप्यांनी हा पर्याय निवडावा. आयव्हीएफमुळे एकाधिक गर्भधारणा होते हा देखील एक गैरसमज आहे. एकच एम्ब्रियो स्थलांतर केल्यानंतर जास्त बाळांची गर्भधारणा होण्याची शक्यता एक टक्क्यापेक्षा कमी असते.
ही एक काळाची गरज
डॉक्टर म्हणतात, वरील सर्व गैरसमजूती दूर करत, वंधत्वाच्या समस्या असलेल्या जोडप्याने आयव्हीएफ उपचारांची निवड करणे ही काळाची गरज आहे. याबाबत आपल्या जोडीदारासोबत संवाद साधा, चर्चा करा, गरज भासल्यास समुपदेशनाची निवड करा. आपल्या परिसरातील आयव्हीएफ तज्ज्ञांशी संपर्क साधा आणि उपचारांविषयीच्या शंका दूर करा.
हेही वाचा>>>
Women Health : महिलांनो.. प्रसूतीनंतर पूर्वीप्रमाणेच फिगर मिळवायचीय? आता वजनावर नियंत्रण ठेवणं होईल सोपं, टिप्स एकदा पाहाच..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )