Pitru Paksha 2023 : हिंदू धर्मात श्राद्ध महत्त्वाचे का आहे? पितृदोष का लागतो? वेद आणि पुराण काय सांगतात? जाणून घ्या
Pitru Paksha 2023 : हिंदू धर्मात श्राद्ध आणि श्राद्धकर्माचा सखोल विचार करण्यात आला आहे. वेद आणि पुराण काय सांगतात? जाणून घ्या
Pitru Paksha 2023 : आपल्या ऋषीमुनींनी वेद, तत्त्वज्ञान आणि पुराण इत्यादींमध्ये जीवन आणि मृत्यूच्या सर्वात गूढ रहस्यांची तपशीलवार चर्चा केली आहे. श्रीमद्भागवत गीतेत (Bhagwad Gita) सांगितले आहे की, जो जन्म घेतो त्याचा मृत्यू आणि ज्याचा मृत्यू त्याचा जन्म निश्चित आहे. हा निसर्गाचा नियम आहे. पण त्यात असेही म्हटले आहे की मृत्यूनंतर शरीराचा नाश होतो, पण आत्मा कधीच नष्ट होत नाही, तो पुन्हा पुन्हा जन्म घेतो. या पुनर्जन्माच्या आधारेच श्राद्धविधी कर्मकांडात करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
वेद, पुराणे, धार्मिक ग्रंथात काय म्हटंलय?
परंतु बहुतेक लोकांच्या मनात शंका असते की, पितृपक्षात केलेल्या श्राद्धमार्फत पूर्वजांना दिलेल्या वस्तू प्रत्यक्षात मिळतात की नाही? आपण दिलेले पदार्थ त्यांच्यापर्यंत कसे पोहोचतात? ब्राह्मणाला खाऊ घालून पितरांची पोटं भरतात का? असे किती प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होतात., ज्यांची थेट उत्तरे देणे कदाचित शक्य होणार नाही. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यासाठी कोणताही पुरावा नसतानाही विश्वास ठेवावा लागतो. परंतु वेद, पुराणे, धार्मिक ग्रंथ, पितृ पक्षादरम्यान केले जाणारे विधी इत्यादींशी संबंधित वैज्ञानिक मान्यता देखील आहेत, ज्याबद्दल आपण सर्वांना माहित असणे आवश्यक आहे.
पितृगण कोण आहेत आणि ते कसे अस्तित्वात आले?
श्राद्ध पक्ष किंवा पितृ पक्ष 29 सप्टेंबर 2023 पासून सुरू झाला आहे. जो 14 ऑक्टोबरपर्यंत चालेल. पितृ पक्षाच्या काळात लोक धर्मग्रंथात सांगितलेल्या धार्मिक स्थळी जाऊन पितरांना प्रसन्न करण्यासाठी, त्यांना मोक्ष मिळवून देण्यासाठी, ऋणमुक्तीसाठी, त्यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान विधी करतात. त्याच वेळी, काही लोक श्राद्ध, तर्पण, पिंड दान आणि ब्राह्मण भोजनासह इतर अनेक विधी घरी किंवा घराजवळील नदी तसेच तलावामध्ये करत आहेत. पण हे नियम पाळण्याआधी तुम्हाला पितृगण कोण आहेत आणि ते कसे अस्तित्वात आले हे जाणून घेतले पाहिजे.
अशांना पितृलोक प्राप्त होतो.
पितृ पक्षाच्या काळात पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंड दान केले जाते हे आपणा सर्वांना माहीत आहे. पण याआधी जाणून घेऊया, कोण आहेत पूर्वज? पूर्वजांच्या संदर्भात लोकांची सामान्य धारणा अशी आहे की, ज्यांचा मृत्यू होते ते पूर्वज होतात. गरुड पुराणात असे म्हटले आहे की मृत्यूनंतर, यमलोकात पोहोचल्यानंतर, भूत आत्मा त्याच्या कर्मानुसार प्रेत योनी किंवा इतर जीवन प्राप्त करतो. तर जे काही आत्मे सत्कर्म करून स्वर्गात पोहोचतात त्यांना पितृलोक प्राप्त होतो.
वेदांमध्ये पितरांची स्तुती करण्यास सांगितले आहे-
।।ऊँ अर्यमा न त्रिप्य्ताम इदं तिलोदकं तस्मै स्वधा नम:।..ऊँ मृत्योर्मा अमृतं गमय।।
अर्थ : श्रेष्ठ आर्यमा ही पूर्वजांची देवता आहे. आर्यमाला सलाम. हे! वडील, आजोबा आणि पणजोबा,आई, आजी आणि पणजी, तुम्हाला पुन्हा पुन्हा नमस्कार. शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की श्राद्ध विधी तीन पिढ्यांपर्यंत केले पाहिजे.
ये न: पितु: पितरो ये पितामहा...तेभ्य: पितृभ्यो नमसा विधेम।। (अथर्व 18.2.49)
अर्थ : आपण आपल्या पूर्वजांना, आजोबांना आणि पणजोबांना श्राद्धाने तृप्त करतो आणि नमन करून त्यांची पूजा करतो.
हिंदू धर्मात पितरांचे श्राद्ध महत्त्वाचे
हिंदू धर्मात पितरांचे श्राद्ध महत्त्वाचे मानले जाते आणि ते कर्तव्य म्हणून पाळले जाते. कारण असे मानले जाते की, जे पितरांचे श्राद्ध करत नाहीत त्यांना पितृदोषाचा त्रास सहन करावा लागतो. अशा स्थितीत प्रश्न पडतो की, इतर धर्मातील पूर्वजांचाही मृत्यू विविध धर्मात किंवा पंथात होतो. मग जेव्हा ते आपल्या पूर्वजांचे पिंडदान करत नाहीत, तेव्हा त्यांचे पूर्वज त्यांना त्रास का देत नाहीत. अशा परिस्थितीत श्राद्ध फक्त हिंदूंसाठीच करणे आवश्यक आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. धार्मिक मान्यतेनुसार या प्रश्नाचे उत्तर स्पष्टपणे दिले तर असे होऊ शकते की, हिंदू धर्माव्यतिरिक्त इतर सर्व धर्म किंवा पंथ केवळ उपासनेसाठीच ओळखले जातात. त्यांच्या पंथात श्राद्धासारखा कोणताही विधी नाही. ते त्यांच्या मृत पूर्वजांचे स्मरण करतात किंवा त्यांच्या कबरीजवळ बसून प्रार्थना करतात, हा देखील एक प्रकारचा श्राद्ध आहे.
वेद आणि पुराणात आढळतो उल्लेख
परंतु हिंदू धर्मात श्राद्ध आणि श्राद्धकर्माचा सखोल विचार करण्यात आला आहे. त्यामुळे श्राद्ध करण्याची परंपरा किंवा नियम तुम्ही किंवा आम्ही निर्माण केलेले नसून ती एक अतिशय प्राचीन परंपरा आहे, ज्याचा उल्लेख वेद आणि पुराणात आढळतो. देव कोणत्याही धर्माचा, पंथाचा असो, तो कुणालाही दुखावत नाही. परंतु हिंदू धर्मात पितरांना सुखशांती लाभावी यासाठी श्राद्धाची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व धर्मांची स्वतःची मूल्ये, धर्मग्रंथ आणि नियम आहेत. हिंदू असो, मुस्लिम असो वा ख्रिश्चन, धर्मग्रंथात सांगितलेल्या नियमांचे पालन करणाऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होतो आणि जो धर्मग्रंथांच्या विरोधात जातो त्याचे नुकसान निश्चितच होते.
वेदांमध्ये यज्ञांचे पाच प्रकार
वेदांमध्ये यज्ञांचे पाच प्रकार सांगितले आहेत, जे पुढीलप्रमाणे आहेत - ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, पितृयज्ञ, वैश्वदेव यज्ञ आणि अतिथी यज्ञ. या पाच यज्ञांपैकी एक यज्ञ म्हणजे पितृयज्ञ, ज्याला पुराणात श्राद्ध यज्ञ किंवा श्राद्ध कर्म म्हणतात. या यज्ञाची समाप्ती मुलाच्या जन्माने होते आणि या यज्ञाद्वारे पितरांचे ऋण फेडले जाते.
पितृ दोष खरंच अस्तित्वात आहे की फक्त अंधश्रद्धा?
पितृदोषाचा उल्लेख हिंदू धर्मग्रंथ, तसेच आपल्या वेद-पुराणात केला आहे. त्यामुळे याला आपण अंधश्रद्धा मानू शकत नाही. याचा स्पष्ट पुरावा म्हणजे अमेरिका आणि इतर देश जे भारतापेक्षा अधिक विकसित आणि विकसनशील देश आहेत. परंतु असे असूनही, अनेक परदेशी लोक पितृ पक्षाच्या काळात श्राद्ध करण्यासाठी गया, बिहार येथे येतात आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवतात.
श्राद्ध विधी न केल्यास काय होईल?
श्राद्ध का महत्त्वाचे आहे यावर चर्चा केल्यानंतर श्राद्ध केले नाही तर काय होईल हे जाणून घेणेही खूप महत्त्वाचे आहे. म्हणजेच यातून कोणते नुकसान होऊ शकते. हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे कारण हिंदू धर्मग्रंथात दरवर्षी श्राद्ध करावे असे सांगितले आहे, परंतु काही नास्तिकही याला विरोध करतात. म्हणून, हिंदू धर्मानुसार, श्राद्ध विधी न केल्यास होणार्या संभाव्य हानीबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे - हिंदू धर्माने प्रत्येक विषयावर खूप सखोल विचार केला आहे. जे लोक आर्थिकदृष्ट्या श्राद्ध करू शकत नाहीत त्यांच्यासाठी शास्त्रात तरतुदी किंवा उपाय सांगितले आहेत. परंतु आधुनिक वैज्ञानिक युगात राहून लोक धार्मिक ग्रंथांशी संबंधित गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत आणि हळूहळू नास्तिक बनतात. पितरांचे श्राद्ध विधी न केल्यास काय होते ते जाणून घ्या.
श्राद्ध न केल्याने पितृदोष होतो असे म्हणतात, पण कसा?
-पितरांच्या असंतोषामुळे होणाऱ्या त्रासाला पितृदोष म्हणतात. पितृदोष दोन प्रकारे निर्माण होतो. पहिले या जन्मातील कर्मापासून आणि दुसरे मागील जन्मात केलेल्या कर्मातून. मागील जन्मांची कर्मे आपोआप कुंडलीत दिसून येतात.
-जर एखाद्याच्या कुंडलीत 10व्या घरात गुरु असेल तर तो पूर्ण पितृदोष मानला जातो. तर बृहस्पति सातव्या भावात असल्यामुळे आंशिक पितृदोष होतो.
-पितृदोषाच्या कारणांमध्ये जिवंत असताना आजी-आजोबा, आई-वडीलांना त्रास देणे, श्राद्धविधी न करणे, पितृधर्माचे पालन न करणे, मुलांवर अत्याचार करणे, पिंपळाचे झाड तोडणे, गायींचा छळ करणे किंवा मारणे आणि धर्मविरोधी असणे यांचा समावेश आहे.
-पितृदोषाची काही लक्षणे सांगितली आहेत, ती पुढीलप्रमाणे - लग्न न होणे, पती-पत्नीमधील कलह. गर्भधारणा न होणे, गर्भधारणेनंतर गर्भपात होणे, अकाली मूल होणे किंवा अपंग मूल होणे, व्यसनाधीनता, दारिद्र्य, रोग इत्यादी पितृदोषाची लक्षणे आहेत
पितृदोषावर उपाय
-कुंडलीत पितृदोष असल्यास घराच्या दक्षिण दिशेच्या भिंतीवर पितराचा फोटो लावा आणि नियमितपणे फुले व हार अर्पण करून पूजा करा.
-पितरांच्या आशीर्वादानेच पितृदोषापासून मुक्ती मिळू शकते.
-एखाद्या दिवंगत नातेवाईकाच्या पुण्यतिथीला गरिबांना वस्तू दान करा आणि ब्राह्मणाला अन्नदान करा.
-जेवणासाठी मृत व्यक्तीच्या आवडीचे काही पदार्थ तयार करण्याचे सुनिश्चित करा.
-पितरांचे स्मरण करताना दुपारी पिंपळाच्या झाडाला पाणी, फुले, अक्षता, दूध, गंगाजल, काळे तीळ अर्पण करावे.
-पितृ पक्षादरम्यान, आपल्या पूर्वजांचे त्यांच्या मृत्युतिथीनुसार श्राद्ध करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :