Ashadhi Wari 2023 : संत निवृत्तीनाथांच्या पालखीचं आज अहमदनगरकडे प्रस्थान; तर मुक्ताबाईंच्या पालखीचा आज बीड जिल्ह्यात प्रवेश
Ashadhi Wari : संत निवृत्तीनाथांची पालखी 2 जून रोजी निघालेली असून हजारो वारकऱ्यांचा पायी प्रवासाचा आजचा बारावा दिवस आहे.
Pandharpur Ashadhi Wari 2023 : 'माझे, माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तिरी', ज्ञानोबा माऊली तुकाराम, हो, हो, माझा ज्ञानोबा, अशा असंख्य अभंगांनी पंढरीची वारी भक्तिरसात न्हाहून निघाली आहे. अशा भक्तिमय वातावरणात संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी (Sant Nivruttinath Palkhi) नगर जिल्ह्यात असून कालच्या डोंगरगण शहरातील मुक्कामानंतर दिंडी अहमदनगर शहरातील दाखल होणार आहे. तर काल अंकुशनगर इथे मुक्कामी असलेली मुक्ताबाईंची पालखीचं आज सकाळी मुक्कामाच्या ठिकाणाहून बाहेर पडत बीड जिल्ह्यात प्रवेश करून गेवराईमध्ये मुक्कामी असणार आहे.
गेल्या अकरा दिवसांपसून पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी दिंड्याचे प्रस्थान झाले असून लाखो भाविक पायी वारी करीत आहेत. भक्तीत तल्लीन झालेले वारकरी, अभंगांच्या गोडीनं अन् विठ्ठलाच्या ओढीनं एक एक पाऊल पंढरीच्या दिशेने टाकत आहेत. संत मुक्ताबाईंसह (Sant Muktabai) संत निवृत्तीनाथांची पालखी 2 जून रोजी निघाली होती. हजारो वारकऱ्यांच्या पायी प्रवासाचा आजचा बारावा दिवस आहे. ज्या-ज्या ठिकाणी पालखी थांबते, त्या-त्या ठिकाणी स्वागत करून दुसऱ्या दिवशी गावासह इतर परिसरातील वारकरी दिंडीत सामील होत आहेत. नगर जिल्ह्यातील डोंगरगण शहरात मुक्कामी असलेली संत निवृत्तीनाथांची पालखी पुढे राहुरी तालुक्यातील डोंगरगण गावाकडे मार्गस्थ झाली होती. कालच्या डोंगरगण येथील मुक्कामानंतर पालखी अहमदनगर शहरात प्रवेश करणार आहे.
राज्यभरातून निघालेल्या दिंड्यांमध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे. आबालवृद्धांसह महिला वारकरी मोठ्या संख्येनं दिंडीत सहभागी झाले आहेत. लांबवरून दिसणाऱ्या भगव्या पताका, दिंडी पालखी, अभंगाचा आवाज, विठुरायाच्या सुरू असलेला गजर या भक्तिमय वातावरणात दिंडी मार्गावरील भाविक आनंदून जात आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक विविध दिंड्यांच्या माध्यमातून पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. यात संत निवृत्तीनाथांच्या दिंडीसह जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून निघालेली संत मुक्ताबाईंची पालखी काल अंकुशनगर गावी मुक्कामी होती. आज पालखीचा बारावा दिवस असून मुक्कामाच्या ठिकाणाहून पालखी प्रस्थान करत पुढे मार्गस्थ झाली आहे. तर दुपारी शहागड येथे दुपारचा विसावा घेणार आहे. त्यानंतर संत मुक्ताबाईंची दिंडी याच मार्गानं पुढे बीड जिल्ह्यात प्रवेश करून गेवराई भागात विसावा घेणार आहे.
आज पालख्यांचा मुक्काम कुठे?
संत निवृत्तीनाथांची पालखी आज डोंगरगण येथून पायमार्गाने आढाववाडी, पिंपळगाव माळवी या गावावरून जाणार आहे. तर दुपारचे जेवण पिंपळगाव ग्रामस्थांकडून दिले जाणार आहे. तर मुक्कामासाठी संत निवृत्तीनाथांची दिंडी अहमदनगर शहरात जाणार आहे. संत मुक्ताबाईंची पालखी आज अंकुशनगर येथून मार्गस्थ होऊन पायी मार्गक्रमण करणार आहे. या दरम्यान दुपारी शहागड येथील रामकृष्ण जगताप यांच्या परिवाराकडून दिंडीला दुपारचे जेवण दिले जाणार आहे. त्यांनतर दिंडीचे मुक्कामाचे ठिकाण बीड जिल्ह्यातील गेवराई येथे असणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :