Independence Day 2024 Dishes : स्वातंत्र्यदिन खास, पदार्थही मस्त! 15 ऑगस्टला खास बनवा 'हे' तिरंगी झटपट पदार्थ, सगळेच करतील फस्त...
Independence Day 2024 Dishes : 15 ऑगस्टच्या थीमशी जुळणारी खास रेसिपी बनवायची असेल, तर 'या' तिरंगी डिशेश तुमच्यासाठी योग्य पर्याय आहेत.
Independence Day 2024 Dishes : स्वातंत्र्यदिन म्हटला की, त्या दिवशी अवघा देश देशभक्तीच्या रंगात रंगला जातो. ठिकठिकाणी झेंडावंदन, देशभक्तीपर गीते, कुठे परेड, तर काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आणि कार्यक्रम म्हटला की खाण्याची सोयही आलीच. पदार्थ म्हटले की हा कोणत्याही सणाचा आत्मा असतो. सणासुदीला अनेक पदार्थ तयार केले जातात. जर तुम्हाला 15 ऑगस्टच्या थीमशी जुळणारी पाककृती बनवायची असेल, तर आज आम्ही तुमच्यासाठी अशा तिरंगी पाककृती सांगत आहोत, ज्या तुमच्यासाठी अगदी योग्य पर्याय आहेत. स्वातंत्र्यदिनी, तुम्ही तुमच्या कुटुंबाला आणि मित्रांना सोप्या, झटपट आणि स्वादिष्ट पदार्थांसह आश्चर्यचकित करू शकता. स्वादिष्ट अन्नाचा आनंद घेण्यापेक्षा हा दिवस साजरा करण्याचा चांगला मार्ग आणखी कोणता असावा? नाही का..? मग चला 15 ऑगस्टनिमित्त खास पाककृती जाणून घेऊया..
तिरंगा इडली
जर तुम्ही दक्षिण भारतीय खाद्यपदार्थाचे शौकीन असाल तर तिरंगी इडली तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. भगव्या रंगासाठी गाजराची प्युरी, पांढऱ्या रंगासाठी नारळाची चटणी आणि हिरव्या रंगासाठी पुदिन्याची चटणी वापरू शकता. या तीन चटण्या पांढऱ्या इडलीवर आकारात ठेवून खा.
तिरंगा/बिर्याणी पुलाव
बिर्याणी आणि पुलाव बहुतेक लोकांना आवडतात. आपल्यापैकी अनेकजण असे आहेत, जे पुलाव/बिर्याणी रोज खाऊ शकतात. या 15 ऑगस्टला तिरंगा थीम असलेली बिर्याणी एकदा ट्राय करा. हिरवा रंग येण्यासाठी तुम्ही पालक, केशरी रंगासाठी टोमॅटो प्युरी आणि पांढऱ्या रंगासाठी पनीरचे चौकोनी तुकडे किंवा टोफू घालू शकता. त्यामुळे नियमित बिर्याणी बनवण्याऐवजी यावेळी तिरंगी बिर्याणी करून पाहा.
ट्राय कलर कोल्ड ड्रिंक
ऑरेंज कलर कोल्ड ड्रिंक्स हे मुलांचे आवडते पेय आहे. या 15 ऑगस्टला तुम्ही आणखी काही प्रयोग करू शकता. ग्लुकोंडी किंवा संत्र्याचा रस केशरी रंग म्हणून काम करू शकतो. पांढऱ्या रंगासाठी, तुम्ही लिची आणि लिंबाचा रस यापैकी एक निवडू शकता तर हिरव्यासाठी, तुम्ही कच्ची कैरी /सफरचंद ड्रिंक निवडू शकता.
ढोकळा
ढोकळा आता फक्त गुजरातपुरता मर्यादित नाही. या स्वातंत्र्यदिनी तिरंगा ढोकळा ट्राय करा. केशरी रंगासाठी गाजराचा रस, पांढऱ्या रंगासाठी रवा आणि हिरव्या रंगासाठी पालक प्युरी वापरा. ढोकळा पुदिन्याच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.
तिरंगा पास्ता
पास्ता
पांढरा सॉस
टोमॅटो पेस्ट
पालक
तेल
लसूण
चवीनुसार मीठ
बेसिल
चीज
सर्व प्रथम एक पॅन घ्या आणि त्यात कांदा, लसूण आणि तमालपत्र टाका आणि चांगले मिसळा. त्यात टोमॅटोची पेस्ट घाला आणि नंतर थोडा टोमॅटो केचप घाला, मीठ आणि बेसिल घाला, शिजवा आणि बाजूला ठेवा. आता पालक उकळवून त्याची पेस्ट तयार करा. याने तुमचा ग्रीन बेस तयार होईल. आता पास्ता उकळत्या पाण्यात टाका आणि थोडा वेळ शिजवल्यानंतर त्याचे 3 भाग करा.नआता एका पॅनमध्ये टोमॅटो सॉसच्या मिश्रणात पास्ता घाला आणि वर चीज घाला. दुसऱ्या पॅनमध्ये व्हाईट सॉस आणि क्रीम थोडा वेळ शिजवा, त्यात पास्ता आणि चीज घाला. तिसऱ्या पॅनमध्ये पालक प्युरी, पास्ता आणि चीज घालून शिजवा. तिरंगांचा पास्ता तयार आहे आणि आता तो तिरंगा दिसेल अशा पद्धतीने प्लेट करा. तुमचा स्वादिष्ट तिरंगा पास्ता तयार आहे.
तिरंगी सँडविच
सँडविच ब्रेडचे एक पॅकेट
बेसन
बटाटे (उकडलेले)
कांदा
चिरलेली कोथिंबीर
चिरलेल्या मिरच्या
हळद
बडीशेप
मोहरी
लाल मिरची पावडर
जिरे
टोमॅटो सॉस
चवीनुसार मीठ
चटणीसाठी: हिरवी कोथींबीर, पुदिना, आले, हिरवी मिरची, लिंबू, मीठ, साखर, भाजलेले जिरे.
प्रथम बेसनमध्ये हिरवी कोथींबीर, मिरची, बडीशेप, हळद, सेलेरी आणि मीठ घालून पीठ बनवा. आता उकडलेल्या बटाट्यात बारीक कांदा, मीठ, हिरवी मिरची आणि जिरे एकत्र करून मळून घ्या. आता हिरव्या चटणीचे साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. एका प्लेटवर ब्रेड ठेवा. त्यावर हिरवी चटणी लावावी. त्यावर दुसरी ब्रेड ठेवा आणि बटाट्याचे मिश्रण पसरवा.
तिसरा ब्रेड त्यावर ठेवा, टोमॅटो सॉस लावा आणि चौथ्या ब्रेडवर झाकून ठेवा. आता बेसनाच्या पिठात हलक्या हाताने गुंडाळा. गरम तेलात टाका. तपकिरी होईपर्यंत तळा. आता त्याचे सँडविचप्रमाणे चार भाग करा. अप्रतिम तिरंगा ब्रेड सँडविच चटणीसोबत सर्व्ह करा.
हेही वाचा>>>
Independence Day 2024 : पतंग एकेकाळी आनंदाचे नव्हे..तर निषेधाचे प्रतीक होते? 15 ऑगस्टला का उडवतात पतंग? त्यामागची रंजक कहाणी जाणून घ्या..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )