World Prematurity Day : चाळीशीतील गर्भधारणेमुळे वाढतोय मुदतपूर्व जन्माचा धोका, प्रीमॅच्युअर बाळांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं?
World Prematurity Day : गर्भधारणेच्या 37 व्या आठवड्यापूर्वी जन्मल्यास बाळास प्रीमॅच्युअर म्हटले जाते. वेळेआधी जन्माला आल्याने बाळाचा मृत्यू ही होऊ शकतो. अशात नवजात बाळाच्या आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं.
World Prematurity Day : सध्या अनेक मुली करिअरमुळे उशिरा लग्न आणि गर्भधारणेची उशिरा योजना आखत असल्याने वय वाढत जातं. बऱ्याचदा महिला 40 व्या वयानंतर गर्भधारणेचा (Pregnancy) निर्णय घेतात. अशावेळी मुदतपूर्व प्रसुती (Preterm Birth) होण्याचा धोका अधिक असतो. गर्भधारणेच्या 37 व्या आठवड्यापूर्वी जन्मल्यास बाळास प्रीमॅच्युअर म्हटले जाते. वेळेआधी जन्माला आल्याने बाळाचा (Premature Baby) मृत्यू ही होऊ शकतो. अशात नवजात बाळाच्या आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं, असं अपोलो स्पेक्ट्रा मुंबईच्या स्त्रीरोग आणि प्रसुती तज्ज्ञ डॉ डिंपल चुडगर यांनी म्हटलं आहे. आज (17 नोव्हेंबर) वर्ल्ड प्रीमॅच्युरिटी डे अर्थात जागतिक अकाली जन्म दिन आहे. या निमित्ताने तज्ज्ञांकडून जाणून घेऊन प्रीमॅच्युअर बाळांना कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं? तसंच इन्फेक्शन टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी.
"सध्या करिअरच्या किंवा काही वैद्यकीय परिस्थितींमुळे स्त्रिया उशिरा लग्न करतात. बहुसंख्य स्त्रिया पस्तीशीनंतर आणि वयाच्या 40 व्या वर्षीही गर्भधारणेचे नियोजन करतात. आता एआरटीच्या मदतीने, महिलांना इच्छित वयात मातृत्वाचे स्वप्न पूर्ण करणे शक्य आहे. परंतु उशिरा गर्भधारणेमुळे मुदतपूर्व जन्म होऊ शकतो'', अशी प्रतिक्रिया अपोलो स्पेक्ट्रा मुंबईच्या स्त्रीरोग आणि प्रसुती तज्ज्ञ डॉ डिंपल चुडगर यांनी व्यक्त केली आहे.
डॉ डिंपल पुढे म्हणाल्या की, "40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांच्या गर्भधारणेतील गुंतागुंतीमध्ये उच्च रक्तदाब, प्रीक्लेम्पसिया, गर्भधारणेतील मधुमेह, बाळामध्ये गुणसूत्रातील विकृती, मुदतपूर्व जन्म यांचा समावेश होतो. अशा बाळांना जन्मानंतर दीर्घ कालावधीसाठी अतिरिक्त काळजी आणि उपचारांची आवश्यकता असते. अकाली जन्मलेल्या नवजात अर्भकाची कोणतीही गुंतागुंत नवजात अतिदक्षता विभागात (NICU) हाताळली जाईल. अकाली जन्मलेली बाळे आपल्या जगात जीवनाला सामोरं जाण्यासाठी पूर्णपणे सज्ज नसतात. त्यांच्या लहान शरीरात अजूनही अविकसित भाग असतात ज्यात फुफ्फुसे, पचनसंस्था, रोगप्रतिकारक शक्ती आणि त्वचा यांचा समावेश असतो."
प्रीमॅच्युअर बाळांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं?
एसआरव्ही ममता रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. अमेय कार्किडे म्हणाले की, "अकाली जन्मलेल्या बाळांना श्वसनाचा त्रास, कावीळ, अशक्तपणा, कमी प्रतिकारशक्ती, न्यूरोलॉजिकल विकार, श्रवणशक्ती कमी होणे, हृदयाच्या समस्या आणि कमकुवत स्नायू आदी समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. त्यांची योग्य देखभाल आणि काळजी घेणं आवश्यक आहे. फक्त एनआयसीयूमध्ये काळजी घ्यावी लागत नाही तर घरी सोडल्यानंतर देखील तितकीच देखभालीची आवश्यकता भासते. अकाली जन्मलेल्या बाळाला घरी घेऊन जाताना मातांनी डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन केलं पाहिजे. बाळाला अॅलर्जी, इन्फेक्शन आणि विविध रोगांपासून दूर ठेवण्यासाठी आणि बाळाच्या विकासासाठी स्तनपान आवश्यक आहे. स्तनपानाबाबतचे सर्व गैरसमज दूर करण्यासाठी आणि स्तनपानाचे योग्य तंत्र जाणून घेण्यासाठी तज्ञांची मदत घेणं आवश्यक आहे."
'प्रीमॅच्युअर नवजात बाळाला इन्फेक्शन टाळण्यासाठी काळजी घ्या'
डॉ. अमेय पुढे म्हणाले की, "कांगारु केअर तंत्र देखील बाळासाठी महत्त्वाचे ठरते.यामुळे बाळाच्या हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छवासाचे देखील नियमन होते. नवजात बाळाचे तापमान नियमित तपासा आणि कोणतेही संक्रमण टाळण्यासाठी पुरेशी काळजी घ्या. नियमित आरोग्य तपासणी आणि फॉलोअपमुळे बाळांना प्रौढावस्थेत निरोगी जीवन जगता येते. आज, वैद्यकीय विज्ञानातील अत्याधुनिक प्रगतीमुळे, अकाली जन्मलेल्या अर्भकांवर परिणाम करणाऱ्या अनेक परिस्थिती उच्च-कुशल कौशल्याने हाताळली जाऊ शकते."
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )