Brain Aneurysm : डोकेदुखीकडे दुर्लक्ष करू नका, ब्रेन एन्युरिजमचा धोका!
ब्रेन एन्युरिजमचा हा मेंदूचा विकार असणाऱ्या 56 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर यशस्वी मुंबईत यशस्वी उपचार करण्यात आले आहे.आशियामध्ये प्रथमच कॉन्टूर डिव्हाइस प्रक्रियेचा वापर करून उपचार करण्यात आले आहे.
मुंबई : ब्रेन एन्युरिजम हा मेंदूशी संबंधित दुर्मिळ आजार झालेल्या मुंबईतील एका 56 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिलेचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे. या महिलेला तीव्र डोकेदुखीची समस्या होती. परंतु, या महिलेनं त्याकडे दुर्लक्ष केल्यानं त्रास वाढला. या महिलेवर कॉन्टूर डिव्हाइस वापरून एक प्रक्रिया करण्यात आली होती. या प्रक्रियेमुळे महिलेला होणारी तीव्र डोकेदुखीची समस्या दूर होऊन तिला नवीन आयुष्य मिळाले आहे.
परळ येथील ग्लोबल रूग्णालयातील एन्डोव्हास्क्यूलर न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे यांच्या नेतृत्वाखाली अन्य डॉक्टरांच्या टीमने ही प्रक्रिया यशस्वी केली आहे.
कांचन डारगे या महिलेला तीव्र डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला होता. स्थानिक डॉक्टरांकडून उपचार घेतल्यानंतर काही क्षणासाठी ठिक वाटायचे. परंतु, पुन्हा डोकेदुखी व्हायची. वेदना असहय होऊ लागल्याने 2017 मध्ये त्यांना एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी महिलेच्या उजव्या बाजूच्या मेंदूत एन्युरिजमसाठी ओपन ब्रेन शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतरही महिलेच्या डाव्या बाजूला शरीराला लकवा मारल्यासारखे झाले होते. तर बोलतानाही अडचण येत होती. अशा स्थितीत काही महिन्यांपूर्वी या महिलेला ग्लोबल रूग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी शस्त्रक्रिया न करता केवळ कॉन्टूर डिव्हाइसचा वापर करून उपचार करण्यात आले आहे.
मुंबईतील परळ येथील ग्लोबल रूग्णालयातील एन्डोव्हास्क्यूलर न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे म्हणाले की, ‘‘या महिलेला तीव्र डोकेदुखीचा त्रास जाणवत होता. वैद्यकीय तपासणीत या महिलेला ब्रेन एन्युरिजम हा मेंदूशी संबंधित विकार असल्याचे निदान झाले. याशिवाय ही महिला कोविड-19 पॉझिटिव्ह असल्याचेही समोर आले होते. पुढील व्यवस्थापनासाठी तिला कोविड आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. सरकारच्या कोविड-19 प्रोटोकॉलचा वापर करून या महिलेवर कॉन्टूर डिव्हाइस वापरून एक प्रक्रिया करण्यात आली.’’
डॉ. डांगे पुढे म्हणाले की, ‘‘एन्युरिजमातील रक्त प्रवाह थांबविण्यासाठी ही प्रक्रिया अतिशय फायदेशीर आहे. साधारणतः दोन तास ही प्रक्रिया सुरू होती. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. अधिक दिवस तीव्र डोकेदुखी होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नयेत. तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.’’
रूग्ण कांचन डारगे यांनी भावना व्यक्त करताना म्हणाल्या की, ‘‘डोकेदुखीसाठी मी सतत वेदनाशामक औषध घेत होती. त्यामुळे मला त्रास झाला. परंतु, मी लोकांना अशी विनंती करते की, मी केलेली चूक करू नयेत. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे मला नवीन आयुष्य मिळाले आहे.’’ ग्लोबल रूग्णालयातील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विवेक तलौलीकर म्हणाले की, ‘‘रूग्णांना दर्जेदार सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. जागतिक स्तरावरील वैद्यकीय आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे हे रूग्णालय जागतिक स्तरावरील आरोग्यसेवा बनले आहे. ’’
एन्युरिजम म्हणजे काय? मेंदूच्या एन्युरिजम (ज्याला सेरेब्रल एन्युरिझम किंवा इंट्राक्रॅनियल एन्युरिजम देखील म्हणतात) मेंदूतील रक्तवाहिनीच्या भिंतीच्या कमकुवत भागामध्ये उद्धवणारी फुग्यासारखी फुगवटा आहे. जर मेंदूत एन्युरिजमचा विस्तार झाला आणि रक्तवाहिन्याची भिंत खूप पातळ झाली तर, एन्युरिजम फुटू शकतो. यामुळे मेंदूच्या आजूबाजूच्या जागेत रक्त वाहू शकते. अशा स्थितीत जीवाला धोका संभवू शकतो. अचानक डोकेदुखी होणं आणि तंद्री येणं ही यामागील लक्षणं आहे. ब्रेन एन्युरिजम हा आजार बऱ्याच कारणांमुळे उद्धवू शकतो. अनुवांशिकता, उच्च रक्तदाब आणि असामान्य रक्तप्रवाह हे या आजाराचे प्रमुख कारण आहे.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )