(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raw Onion Benefits: उन्हाळ्यात कांद्याचे सेवन आरोग्यदायी, जाणून घ्या 5 फायदे
उन्हाळ्यात कांद्याचे सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे. कांदा खाण्याचे विविध फायदे आहेत.
Raw Onion Benefits : सध्या देशात मोठ्या प्रमाणात उन्हाचा चटका वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. या उन्हाचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशा काळात कच्च्या कांद्याचे सेवन करणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. कांदा केवळ जेवणाची चव वाढवण्याचे काम करत नाही तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. उन्हाळ्यात कांदा खाण्याचे विशेष महत्त्व आहे. नेमके कांद्याचे आरोग्यदायी फायदे काय आहेत ते पाहुयात...
1) शरीराचे तापमान नियंत्रित होण्यास मदत
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे की उन्हाळ्यात कांदा खाल्ल्यास शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास खूप मदत होते. यामुळे तुमच्या शरीरावर जास्त उष्णतेचा कोणताही वाईट परिणाम होत नाही. दुपारच्या जेवणात तुम्ही कांदा सॅलडच्या स्वरुपात खाऊ शकता. तसेच कांदा आणि हिरव्या कोथिंबिरीपासून तयार केलेली चटणी खाऊ शकता. जेवणानंतर बडीशेप आणि साखरेचे सेवन करा जेणेकरून तोंडाला वास येणार नाही.
2. आतडे मजबूत
तुम्ही बाहेरच्या गोष्टी अजिबात खात नाही हे पूर्णपणे शक्य नाही. उन्हाळ्यात अन्नपदार्थ लवकर खराब होतात. अनेकवेळा अन्न खराब होते पण वास येत नाही, म्हणून आपण ते योग्य समजून खातो. याचा आपल्या आतड्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. कच्च्या कांद्याचे सेवन केल्याने आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या योग्य राहते. ज्यामुळे पोट खराब होण्यास कारणीभूत असलेले वाईट बॅक्टेरिया वाढू देत नाहीत. म्हणजेच उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी कच्चा कांदा खाणे गरजेचं आहे.
3. हृदय निरोगी ठेवा
कांद्याचे खाल्ल्याने किंवा भाजीत घालून नियमित कांदा खाल्ल्याने तुमच्या हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. कारण कांद्याच्या सेवनाने शरीरातील गुठळ्या होण्याची समस्या नियंत्रणात राहते. त्यामुळे हृदय निरोगी ठेवण्याच्या दृष्टीने कांद्याचे महत्व आहे.
4. रक्तातील साखर नियंत्रित
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की कांदे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. जेव्हा शास्त्रज्ञांनी याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना आढळले की कांद्यामध्ये आढळणारे सल्फर शरीरात इन्सुलिनचे उत्पादन वाढवण्यास मदत करते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. त्यामुळे वाढलेली साखर नियंत्रीत ठेवण्याचे दृष्टीने कांदा खाम्याचे विशेष महत्व आहे.
5. कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून थांबवा
लाल कांदा हा शरीरातील कर्करोगाच्या वाढणाऱ्या पेशी रोखण्यासाठी उपयुक्त असल्याचे जगभरात करण्यात आलेल्या वेगवेगळ्या संशोधनात समोर आले आहे. आपल्या सर्वांच्या शरीरात दररोज काही पेशी तयार होतात. ज्या वेळेवर काढणे गरजेचे असते. त्या जर वेळेवक काढल्या नाहीत तर पुढे कर्करोग होण्याची शक्यता असते. म्हणूनच सकस आहाराला अधिक महत्त्व दिले जाते. कारण सकस अन्नातून मिळणारे पोषण या पेशींची वाढ होण्यापासून रोखते. कांद्याचा वापर हा देखील त्यापैकीच एक आहे.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )