(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Morning walk benefits | इव्हिनिंग वॉकच्या तुलनेत मॉर्निंग वॉक अधिक फायद्याचा; पाहा कसे आहेत याचे परिणाम
मॉर्निंग वॉक घेणाऱ्या व्यक्तींची कार्डिओव्हस्क्युलर तंदुरुस्ती इव्हिनिंग वॉक घेणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत अधिक चांगली असते
मुंबई : धकाधकीच्या जीवनात शारीरिक सुदृढतेलाही अनेकजण प्राधान्य देताना दिसत आहेत. यातच चालण्याच्या सवयीचे फायदे शरीरात किती सकारात्मक बदल घडवून आणतात, हे जाणत सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळी कामाच्या उपलब्धतेनुसार चालायला जाण्यासाठी अनेकजणांची पसंती दिसते. पण, तुम्हाला माहितीये का चालायला जाण्याची सर्वात योग्य वेळ कोणती?
मुंबईच्या नानावटी रुग्णालयातील काही तज्ज्ञांनी यासंदर्भातील अभ्यास करत महत्त्वाची माहिती प्रसिद्ध केली आहे. मॉर्निंग वॉक घेणाऱ्या व्यक्तींची कार्डिओव्हस्क्युलर तंदुरुस्ती इव्हिनिंग वॉक घेणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत अधिक चांगली असते, असं या अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. ‘इफेक्ट ऑफ मॉर्निंग व्हर्सेस इव्हिनिंग वॉक ऑन कार्डिओव्हस्क्युलर फिटनेस इन अडल्ट्स’ हा अभ्यास नानावटी सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलमधील फिजिओथेरपी आणि स्पोर्ट्स मेडिसीन विभागाने केला. तीन महिने किंवा त्याहून अधिक काळापासून आठवड्यातून किमान तीनदा ३० मिनिटे चालणाऱ्या एकूण २०३ निरोगी प्रौढांचा यात अभ्यास करण्यात आला.
अभ्यासाठी सहभागी सदस्यांचे सरासरी वय ४५ वर्षे होते. व्हायटल कपॅसिटी (कमाल एक्स्पायरेशननंतर श्वासाद्वारे आत घेतल्या जाणाऱ्या हवेचे कमाल प्रमाण), कमाल एक्सापयरेटरी प्रवाह ( एस्क्पायरेशनचा कमाल वेग), वायएमसीए थ्री मिनट टेस्ट (तीन मिनिटांची स्टेप-अप आणि स्टेप-डाउन चाचणी), शांत असतानाची हृदयगती आणि रक्तदाब या निकषांवर सहभागी सदस्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या. मसलोस्केलेटल वेदना किंवा सांधेदुखीचा त्रास असलेल्यांना तसेच घरात व्यायाम करणाऱ्यांना या अभ्यासात सहभागी करण्यात आले नाही. निष्कर्षातून असे दिसून आले की, सकाळच्या वेळी चालणाऱ्या सदस्यांची व्हायटल क्षमता तसेच कमाल एक्स्पायरेटरी प्रवाह संध्याकाळी चालणाऱ्या सदस्यांच्या तुलनेत अधिक चांगले होते.
काय आहेत फायदे?
सकाळच्या वेळी चालल्यामुळे रक्ताची ऑक्सिजन धरून ठेवण्याची क्षमता वाढते, रक्ताभिसरण वाढते आणि आजूबाजूच्या मज्जातंतूंना रक्त अधिक चांगल्या पद्धतीने पुरवले जाते. सकाळी चालणाऱ्यांचा व्हीसी आणि पीईएफआर अधिक चांगला असण्याचे आणखी एक कारण म्हणजे तापमान तसेच ओझोन वायूचा प्रभाव. संध्याकाळच्या वेळात ओझोनचे हवेतील केंद्रीकरण कमी झालेले असते.
संध्याकाळी आणि सकाळी चालणाऱ्यांच्या रेस्टिंग हार्ट रेटमध्ये संख्यात्मकदृष्ट्या काही फरक आढळला नाही. मात्र, संध्याकाळी चालणाऱ्यांमध्ये उच्च रक्तदाबाने ग्रस्त व्यक्ती सकाळी चालणाऱ्यांच्या तुलनेत अधिक आढळल्या. सकाळी चालणाऱ्यांचे सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक बीपी अधिक असते, कारण, ते औषधे घेण्यापूर्वी चालण्याचा व्यायाम करतात, असे संशोधकांनी सांगितले.
अतिशय महत्त्वाच्या अशा या निरीक्षणपूर्ण अभ्यासात व्यक्तींच्या तंदुरुस्ती स्तराचे मूल्यांकन करण्यासाठी वायएमसीए वर्गीकरणाचा उपयोग करण्यात आला. व्यायामानंतर हृदयाची गती किती लवकर पूर्वपदावर येते यावर हे वर्गीकरण आधारित आहे. एकंदर शारीरिक तंदुरुस्तीमध्ये पाच वेगवेगळे घटक येतात: एरोबिक किंवा कार्डिओव्हस्क्युलर सहनशक्ती, स्नायूंची मजबुती, स्नायूंची सहनशक्ती, स्थितीस्थापकत्व, शरीराची रचना.
वायएमसीएस चाचणी व्यायामानंतर हृदयगती स्थिर होण्यासाठी लागणाऱ्या अवधीचे मापन करते. व्यक्ती जेवढी तंदुरुस्त, तेवढी हृदयगती पटकन सामान्य होते. अधिक (७१) मॉर्निंग वॉकर्सना वायएमसीएच्या वर्गीकरणामध्ये उत्कृष्ट, चांगली आणि सरासरीहून चांगली अशा श्रेण्या मिळाल्या. संध्याकाळी चालणाऱ्यांमध्ये हा आकडा ५५ एवढा होता. त्याचप्रमाणे साधारण, साधारणहून निम्न, निकृष्ट अशा श्रेण्या प्राप्त करणाऱ्या इव्हिनिंग वॉकर्सचा आकडा ४६ आहे, तर मॉनिंग वॉकर्समध्ये तो २८ आहे.
नानावटी सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलमधील फिजिओथेरपी आणि स्पोर्ट्स मेडिसिन विभागाचे प्रमुख प्राध्यापक (डॉ.) अली इराणी या अभ्यासाबद्दल म्हणाले, “या अभ्यासामुळे आम्ही संख्याशास्त्रीयदृष्ट्या अशा निष्कर्षावर पोहोचलो आहे की, मॉर्निंग वॉकचे आरोग्याला होणारे लाभ इव्हिनिंग वॉकच्या तुलनेत अधिक आहेत. हे लाभ केवळ शुद्ध हवा श्वासात भरून घेण्यापलीकडील आहेत. एकंदर चालण्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते, रक्तदाबाचे नियमन होते, रक्ताभिसरण सुधारते, फुप्फुसांची क्षमता सुधारते, स्नायू सशक्त व सहनशील होतात. सकाळच्या वेळेस चालल्याने हे लाभ आणखी वाढतात. जे लोक सकाळी ५ ते ६ या वेळात चालतात, त्यांची व्हायटल क्षमता आणि कमाल एक्स्पायरेटरी प्रवाह अन्य व्यक्तींच्या तुलनेत अधिक चांगले असते हे सिद्ध झाले आहे.”.
तज्ज्ञांची मतं आणि अभ्यासातून समोर आलेली माहिती पाहता हेच सिद्ध झालं आहे की सकाळच्या वेळी चालणाऱ्यांना या सवयीतून अनेक फायदे मिळतात. तेव्हा आता तुम्हाला ही सवय नसेल, तर हीच योग्य वेळ आहे. काळजी घ्या, निरोगी राहा!
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )