Health Tips : गुडघा प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसंदर्भात समज गैरसमज; कशी आणि कधी केली जाते शस्त्रक्रिया? सगळी माहिती एका क्लिकवर...
Health Tips : गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया फक्त वयस्कर लोकांसाठी आहे असा एक गैरसमज लोकांमध्ये पाहायला मिळतो.
Health Tips : गुडघेदुखी, सांधेदुखी या त्रासाने तर अनेक लोक त्रस्त असतात. विशेषत: वृद्धांना या त्रासाचा जास्त सामना करावा लागतो. हिवाळ्यात तर हा त्रास अधिक वाढतो. अशा वेळी अनेकजण गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया करतात. या प्रक्रियेमध्ये गुडघ्याच्या सांध्यातून काढून टाकण्यात आलेल्या कमकुवत हाडाच्या जागी शरीराच्या दुसर्या भागातील काही हाडांसह, धातू आणि प्लॅस्टिकच्या वापराने ऑपरेशन करतात. जरी गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया वेदना कमी करुन पायांमध्ये गतिशीलता वाढवणारी असली तरी या प्रक्रियेबद्दल अनेक गैरसमज आहेत. या गैरसमजुती नेमक्या कोणत्या ते समजून घेऊयात.
- डॉ प्रमोद भोर, संचालक,ऑर्थोपेडिक्स आणि रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, फोर्टिस हॉस्पिटल, वाशी
गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेशी संबंधित गैरसमजूती कोणत्या?
फक्त वयस्कर लोकांसाठी शस्त्रक्रिया
गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया फक्त वयस्कर लोकांसाठी आहे असा एक गैरसमज लोकांमध्ये पाहायला मिळतो. मात्र, शस्त्रक्रिया करण्यासाठी कोणत्याही वयाची मर्यादा नसते. त्याऐवजी, शस्त्रक्रियेचा निर्णय घेताना रुग्णाला होणारी वेदना, अपंगत्व आणि रुग्णाचे एकूण आरोग्य यांसारख्या घटकांचा विचार करणं गरजेचं आहे.
शस्त्रक्रियेमुळे प्रचंड वेदना होतात
गुडघा प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेमुळे प्रचंड वेदना होतात हा देखील एक गैरसमज आहे. खरंतर, गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया अत्यंत वेदनादायक नसते. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे रूग्णाना फार कमी वेदना सहन कराव्या लागतात.
दैनंदिन कामे सहज करता येत नाहीत
गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया रुग्णाला त्याची दैनंदिन कामे सहजतेने करू देत नाही असा देखील अनेकांमध्ये गैरसमज आहे. यामध्ये, तुम्ही धावणे आणि उडी मारणे यांसारख्या क्रिया अर्थात करू शकत नाही. गुडघा प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेचा मुख्य उद्देशच वेदना कमी करणे आणि गुडघ्याचे कार्य पुन्हा सुरळीत करणे असा आहे. रुग्णांना त्यांची ऊर्जा वाढवण्यासाठी पोहणे, सायकल चालवणे आणि चालणे यांसारख्या व्यायामांचा सल्ला दिला जातो.
शस्त्रक्रिया यशस्वी होत नाही
गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी परिणाम देत नाही हा देखील गैरसमज आढळून येतो. खरंतर, ज्यांची हाडं ठिसूळ झाली आहेत अशा लोकांसाठी गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया हा एक विश्वासार्ह उपाय आहे. शस्त्रक्रियेचे एकूण यश हे रुग्णाचे एकूण आरोग्य, शस्त्रक्रियेनंतरची काळजी आणि इम्प्लांटची गुणवत्ता यांसारख्या विविध घटकांवर अवलंबून असते. म्हणून याची निवड करण्यास अजिबात संकोच करू नका.
शस्त्रक्रियेनंतर जमिनीवर बसू शकत नाही
गुडघा प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण गुडघे वाकवू शकत नाही किंवा जमिनीवर बसू शकत नाही हा एक व्यापक गैरसमज लोकांमध्ये दिसून येतो. या प्रक्रियेतून गेलेल्या असंख्य व्यक्तींना केवळ गुडघे वाकविण्याची क्षमता प्राप्त होत नाही तर ते कोणत्याही आधाराशिवाय जमिनीवर बसू शकतात आणि हे अनेकांनी अनुभविले देखील आहे. शस्त्रक्रियेनंतर लवकर बरे होता येते त्यामुळे कोणत्याही शारीरिक क्रियांमध्ये सहभाग घेणे शक्य होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )