Health News : सप्लिमेंट्स शरीराच्या अवयवांवर कसा परिणाम करतात? सप्लिमेंट घेण्यापूर्वी तुम्हाला 'हे' माहित असलं पाहिजे?
Health News : पौष्टिक अन्नामध्ये जीवनसत्त्वांचा समावेश असलेल्या पूरक आहाराचाही समावेश आहे. परंतु सप्लिमेंट्सची गरज नसताना किंवा जास्त प्रमाणात घेतल्यास त्याचा शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतो
Health News : बर्याच लोकांसाठी, निरोगी जीवनशैलीसह जगणं म्हणजे केवळ पौष्टिक अन्नाचे सेवन करणे आणि पुरेसा व्यायाम करणं इतकंच असतं. मात्र या पौष्टिक अन्नामध्ये जीवनसत्त्वांचा (Vitamin) समावेश असलेल्या पूरक आहाराचाही समावेश आहे. मात्र या सप्लिमेंट्सची (Supplements) गरज नसताना किंवा जास्त प्रमाणात घेतल्यास त्याचा शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतो हे देखील तितकंच खरं आहे. जेव्हा सप्लिमेंट्सचा विचार केला जातो तेव्हा ते घेण्याचे तोटे किंवा नुकसान, त्याचे दुष्परिणाम याबाबत अनेक समज-गैरसमज आढळून येतात.
सप्लिमेंट्सच्या फायद्यांबद्दल अनेकांना माहिती असून वास्तव आणि काल्पनिक गोष्टींमध्ये फरक करणं कठीण होऊ शकते. आपल्या सर्वांना माहित आहे की जीवनसत्त्वे आणि खनिजे आरोग्यासाठी आवश्यक आहेत. संतुलित आहारात तुम्हाला त्यांचं सेवनही करता येतं तसंच दररोज व्यायाम आणि पुरेसा सूर्यप्रकाश मिळवणं हे देखील तितकंच फायदेशीर ठरतं. मात्र योग्य आहाराविहाराच्या सवयींचं पालन न केल्याने जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता निर्माण होते. मग अनेकजण याची कमतरता भरुन काढण्यासाठी ठराविक गोळ्या, कॅप्सूल किंवा पावडरचा वापर करतात. मात्र याचे केवळ फायदे न होता तोटे देखील होतात. उदा. व्हिटॅमिन डी 3 च्या अतिरेकामुळे तसंच कॅल्शियमची उच्च पातळी हृदय, मेंदू आणि मूत्रपिंडावर गंभीर परिणाम करु शकते. तसेच गंभीर परिणामांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसारखे दुष्परिणामही दिसून येतात. केवळ ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि फॉलिक अॅसिड हृदयरोग रोखण्यासाठी उपयुक्त आहेत.
तुमच्या शरीराला विशिष्ट पोषक तत्वांची गरज असते. तुमचं शरीर नियमितपणे पेशी आणि ऊतींची दुरुस्ती आणि नवनिर्मितीस मदत करते. शरीरात पेशी निर्माण करण्याची तसेच जुन्या पेशींचे आयुर्मान संपल्यावर त्यांचा नाश/काढण्याची एक मजबूत प्रणाली असते. अन्न आणि त्याच्या चयापचयातून मिळणारी पोषक तत्वे सर्व अंतःस्रावी अवयवांची दैनंदिन कार्ये पार पाडण्यासाठी, मेंदू, हृदय आणि गॅस्ट्रोइंटेस्टायनल कार्यासाठी आवश्यक रसायनं तयार करण्यासाठी आणि हाडांच्या आरोग्यासाठी, हाडांना योग्य प्रमाणात खनिजे प्रदान करण्यासाठी वापरली जातात.
आपल्या अन्नातून सर्वकाही पोषक तत्त्वे मिळतात का?
होय, जर एखाद्याने ताजी फळे, भाज्या, मसूर (डाळ), कडधान्ये, तृणधान्ये, दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असलेला समतोल आहार घेतला तर शरीर आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे शोषून त्यावर प्रक्रिया करु शकते. सकाळच्या सूर्यप्रकाशात आणखी व्यायाम केल्याने आणि ताजी हवा (ऑक्सिजन) मिळाल्यास हाडे आणि स्नायू मजबूत होण्यास मदत होईल.
सप्लिमेंट घेण्यापूर्वी तुम्हाला काय माहित असले पाहिजे?
अन्न आणि औषध प्रशासन (FDA) आहारातील डाएटरी सप्लिमेंट्सच्या (Dietary Supplements) नियमनाची जबाबदारी घेत असताना, नवीन सप्लिमेंट्स विकले जाण्यापूर्वी कोणतीही सुरक्षा चाचणी किंवा एफडीएची मंजुरी आवश्यक नसते. शिवाय, पौष्टिक पूरक पॅकेजिंगमध्ये त्याच्या संभाव्य दुष्परिणामांचा उल्लेख करणारे कोणतेही निर्बंध नाहीत किंवा गोळ्यांच्या आकारासंबंधितही काही मानक नाहीत (वृद्ध लोकांसाठी स्पष्ट धोका).
काही कारणास्तव, न्युट्रिशनल सप्लिमेंट्स, ओव्हर-द-काउंटर (OTC) आणि प्रिस्क्रिप्शन औषधांचे सेवन हे एकमेकांमध्ये व्यत्यय आणू शकतात. जेव्हा एखादी कमतरता सिद्ध होते आणि डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवर आधारित सप्लिमेंट असल्यावरच त्याचे सेवन करावे.
प्रक्रिया न केलेले अन्न- ताजी फळे, भाज्या, मसूर, कडधान्ये, तृणधान्ये आणि दुग्धजन्य पदार्थ यांचा समावेश असलेला आहार नियमित व्यायाम आणि ताजी हवा मानवी शरीराच्या गरजा पूर्ण करतात. वैद्यकीयदृष्ट्या सूचित केल्यावरच पूरक आहार वापरला पाहिजे. काही सप्लिमेंट्स, योग्यरित्या वापरल्यास, तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरु शकतात, तर काही निरुपयोगी किंवा अगदी घातकही असू शकतात.
बर्याच लोकांसाठी, निरोगी जीवनशैलीचे पालन करणे म्हणजे केवळ पौष्टिक आहाराचे सेवन करणे आणि पुरेसा व्यायाम करणे यापेक्षा अधिक आवश्यक आहे; त्यात जीवनसत्त्वे, पूरक आहार आणि अतिरिक्त पौष्टिक पदार्थांचाही समावेश आहे. तथापि, त्यांच्या संभाव्य फायद्यांची व्यापक माहिती असूनही, त्यांच्या संभाव्य तोट्यांबद्दल कमी समज आहे. खरं तर, या वस्तूंचा वापर काहीवेळेस आपत्कालीन परिस्थिती देखील उद्भवू शकते.
- डॉ श्रुती तापियावाला, नेफ्रोलॉजीस्ट आणि रेनल ट्रान्सप्लांट फिजिशियन, ग्लोबल हॉस्पिटल्स, परेल, मुंबई
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )