वाहनधारकांना दिलासा! डिजिलॉकर आणि एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य, वाहतूक पोलिसांना आदेश
Traffic Rules In Mumbai : वाहन चालकांनी वाहनाची डिजिटल कागदपत्रे दाखवूनही चालकांवर ई-चलनद्वारे कारवाई करण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर वाहनधारकांना दिलासा दिला आहे.
DigiLocker and M Parivahan Documents : डिजिलॉकर आणि एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य धरण्याबाबतचे आदेश मुंबईतील सर्व वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहेत. आजकाल स्मार्टफोन आणि तंत्रज्ञानाच्या युगात लोक कागदे बाळगण्याऐवजी ते मोबाईलवर डिजिलॉकर किंवा एम परिवहन यांसारख्या ॲपवर डिजिटल स्वरुपात ठेवतात. मात्र, वाहतूक पोलिस ही कागदपत्रे ग्राह्य न धरता वाहनचालकांवर कारवाई करत होते, याप्रकरणी वाहनधारकांनी वाहतूक पोलिस आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी वाहनधारकांना दिलासा दिला आहे.
वाहनधारकांना दिलासा!
वाहतूक सहपोलीस आयुक्तांनी डिजिटल कागदपत्रे ग्राह्य धरण्याचे लेखी आदेश दिले आहेत. यामुळे आता वाहनधारकांची अडचण दूर झाली आहे. वाहन चालकांनी वाहनाची डिजिटल कागदपत्रे दाखवूनही चालकांवर ई-चलनद्वारे कारवाई करण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आता सहपोलीस आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे यांनी गुरूवारी याबाबतचे लेखी आदेश जारी केले. त्यामुळे आता मुंबईकर मोटरगाडी आणि दुचाकीच्या प्रत्यक्ष कागदपत्रांऐवजी डिजिलॉकर अॅपच्या मदतीने वाहतूक पोलिसांना कागदपत्रे दाखवू शकतात.
कागदपत्रांची डिजीटल कॉपी दाखवण्याची सुविधा
केंद्र सरकारच्या रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांनी वाहन चालक परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र तसेच इतर कागदपत्रांची डिजीटल कॉपी डिजिटल लॉकर आणि एम परिवहन या मोबाईल ॲपद्वारे दाखविण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे. माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याच्या कलम 4 आणि 5 नुसार चालक परवाना, नोंदणी प्रमाणपत्र, विमाअशा कागदपत्रांची प्रत्यक्षप्रद दाखवणे बंधनकारक नाही. डिजिलॉकर आणि एमपरिवहन अॅपवर उपलब्ध कागदपत्रांची डिजिटल प्रत वैध मानली जाईल, असे मंत्रालयाने स्पष्ट केले होते.
डिजिलॉकर, एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य
केंद्र सरकारने सर्व राज्यांच्या परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांना यासंदर्भात सूचनाही दिल्या होत्या. पण त्यानंतरही वाहन मालक, चालक यांनी त्यांचे डिजी लॉकर ॲपमधील त्यांना जारी करण्यात आलेला परवाना, वाहन नोंदणी प्रमाणपत्र, वाहनाचा विमा, पी.यु.सी. यांची डिजीटल प्रत दाखवून सुद्धा त्यांच्यावर ई-चलानद्वारे कारवाई केल्या जात होत्या.
वाहतूक पोलिसांना आदेश
त्यामुळे बुधवारी वाहतूक विभागाचे प्रमुख अनिल कुंभारे यांनी लेखी आदेश जारी करून डिजिलॉकर आणि एमपरिवहन या मोबाईल ॲपद्वारे दाखवण्यात आलेले चालक परवाना, वाहन नोंदणी प्रमाणपत्र, वाहनाचा विमा, पीयुसी ग्राह्य धरण्यात यावे, असे सांगण्यात आले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :