(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सकारात्मक! कोरोनाच्या अँटिबॉडिजसह बाळाचा जन्म, जगातील पहिली घटना
कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात हैदोस घातला आहे. अशातच एक सकारात्मक घटना समोर आली आहे. कोरोनाची लस घेणाऱ्या एका गरोदर महिलेनं जन्म दिलेल्या नवजात बाळाच्या रक्तात कोरोनाच्या अँटिबॉडिज असल्याचं निष्पन्न झालं आहे. म्हणजेच, कोरोनाच्या अँटिबॉडिजसह बाळाचा जन्म झाला आहे.
न्यूयॉर्क : अमेरिकेतील बालरोगतज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार, जगात एका अनोख्या बाळाचा जन्म झाला आहे. सध्या कोरोना महामारीने जगभरात धुमाकूळ घातला आहे. अशातच जीवघेण्या कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगाला वेठीस धरंलं आहे. परंतु, अमेरिकेतील बालरोगतज्ञांनी केलेल्या दाव्यामुळे एक सकारात्मक माहिती समोर आली आहे. त्यांच्या दाव्यानुसार, अमेरिकेत जन्म झालेल्या या नवजात बालकाच्या शरीरात कोरोना व्हायरसच्या अँटिबॉडिज आहेत. कोरोनाच्या अँटिबॉडिजसह बाळाचा जन्म होणं, असं पहिल्यांदाच घडलं आहे. दरम्यान, या नवजात बाळाच्या आईला गरोदरपणात कोरोनाच्या लसीचा पहिला डोस देण्यात आला होता.
आरोग्य विज्ञान संबंधित ईप्रिंट प्रकाशित करणाऱ्या 'मेडआर्काइव' वर प्रकाशित करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, बाळाच्या आईला गरोदरपणाच्या 36व्या आठवड्यात मॉर्डना लसीचा डोस देण्यात आला होता. लसीचा डोस घेतल्यानंतर तीन आठवड्यांनी महिलेने एका निरोगी बाळाला जन्म दिला. बाळाच्या जन्मानंतर त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. ज्यामध्ये बाळाच्या रक्तात अँटिबॉडिज आढळून आल्याचा खुलासा करण्यात आला. दरम्यान, अद्याप या संशोधनाचं पुनरावलोकन करण्यात आलेलं नाही. अमेरिकेतील फ्लोरिडाच्या अटलांटिक विश्वविद्यालयाचे सह लेखक पॉल गिल्बर्ट आणि चाड रूडनिक यांनी सांगितलं की, एखाद्या नवजात बाळाच्या शरीरात कोरोनाच्या अँटिबॉडिज आढळण्याचं हे पहिलं प्रकरण असल्याचं समोर येत आहे.
बाळाची आई आणि बाळ दोघेही सुखरुप असून बाळाची आई बाळाला नियमितपणे स्तनपान करत आहे. तसेच बाळाच्या आईला नियमांनुसार, लसीचा दुसरा डोस 28 दिवसांनी देण्यात येणार आहे. याआधीच्या एका संशोधनात सांगण्यात आलं होतं की, कोरोनामुक्त झालेल्या गरोदर स्त्रियांच्या पोटातील बाळाच्या शरीरात अँटिबॉडिज पोहोचवण्यात आईशी जोडलेली नाळ अयशस्वी ठरत असल्याचं सांगण्यात आलं होतं. अशातच, या नव्या संशोधनात सांगण्यात आलं आहे की, जर आईला कोरोनाची लस देण्यात आली असेल, तर त्यामुळे कोरोनाच्या अँटिबॉडिज बाळाच्या शरीरात जाण्याची शक्यता असते. त्यामुळे बाळाला कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोकाही कमी होतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Coronaviras: खोकला, ताप आणि थकव्यासाठी तज्ज्ञांनी सांगतले आयुर्वेदिक उपाय
- सावधान! कारमध्ये सॅनिटायझर वापरताय, हे नक्की वाचा
- अवयव निकामी अन् प्रत्यारोपीतांच्या उपजीविकेचा प्रश्न
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )