Brain Eating Amoeba : चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या विषाणूची दहशत, एका रुग्णाचा मृत्यू; 'ही' आहेत लक्षणे
Brain Eating Amoeba : नेग्लेरिया फॉलेरी (Naegleria Fowleri) नावाचा विषाणू नाकावाटे शरीरात प्रवेश करतो आणि मेंदूपर्यंत पोहोचतो. यानंतर हा अमिबा मानवाच्या मेंदूच्या पेशी हळूहळू नष्ट करतो.
Brain Eating Amoeba : जगभरात एकीकडे कोरोना विषाणू (Coronavirus) नष्ट होण्याचं नाव घेत नाहीय, त्यातच आता आणखी एक धोकादायक विषाणू आढळला आहे. धक्कादायक म्हणजे हा विषाणू मानवी मेंदूच्या पेशींवर हल्ला करून त्या नष्ट करतो, म्हणूनच या विषाणूला 'ब्रेन इटिंग अमिबा' (Brain Eating Amoeba) असेही म्हणतात. दक्षिण कोरियामध्ये हा धोकादायक आजार परसला आहे. दक्षिण कोरियामध्ये मेंदू पोखरणाऱ्या विषाणूची दहशत पसरली आहे.
दक्षिण कोरियामध्ये एकाचा मृत्यू
दक्षिण कोरियामध्ये 29 डिसेंबर रोजी मृत्यू झालेल्या 50 वर्षीय व्यक्तीमध्ये हा आजार आढळून आला आहे. ही व्यक्ती नुकतीच थायलंडहून दक्षिण कोरियाला परतली होती. थायलंडहून परतल्यानंतर त्यांना डोकेदुखी, ताप, उलट्या, बोलण्यात अडचण आणि मान ताठ अशी लक्षणे दिसू लागली. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुसऱ्याच दिवशी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
हा रोग अतिशय धोकादायक असल्याचं समोर येत आहे. नेग्लेरिया फॉलेरी (Naegleria Fowleri) नावाच्या अमिबामुळे हा आजार पसरतो. याला 'ब्रेन इटिंग अमिबा' (Brain Eating Amoeba) असेही म्हणतात, कारण हा अमिबा हळूहळू मेंदूच्या पेशी नष्ट करून मेंदू पोकळ करतो. अमेरिकन रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या (CDC - US Centers for Disease Control and Prevention) मते, नेग्लेरिया फॉलेरी हा एक अमिबा आहे. हा अमिबा नद्या, तलाव, झरे सारख्या पाणवठ्यांमध्ये आढळतो. या आजाराला प्रायमरी अमिबिक मॅनिंगोएन्सेफलाइटिस (PAM) असेही म्हटले जाते.
अमिबा शरीरात कसा प्रवेश करतो?
मेंदू खाणारा अमिबा ही नायगलेरिया फालेरी या नावाने ओळखली जाणारी नेग्लेरिया वंशातील विषाणूची एक प्रजाती आहे. कोचीमधील अमृता हॉस्पिटलचे डॉ. दीपू टीएस यांनी सांगितले की, जेव्हा लोक दूषित तलाव, डबके किंवा नदीत आंघोळीसाठी उतरतात तेव्हा लोकांना नॅग्लेरिया फॉलेरी अमिबाचा संसर्ग होतो. नॅग्लेरिया फॉलेरी अमिबा पाण्यावाटे नाकातून शरीरात प्रवेश करतो. हा 'ब्रेन इटिंग अमिबा' हळूहळू तुमच्या मेंदूच्या पेशी नष्ट करतो. महत्त्वाची बाब म्हणजे ब्रेन इटिंग अमिबाचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरत नाही. हा अमिबा तुमच्या शरीरामध्ये गेल्यावरच या आजाराची लागण होते.
ब्रेन इटिंग अमिबाची लक्षणे काय?
नेग्लेरिया फॉलेरी अमिबा नाकावाटे मेंदूपर्यंत पोहोचते. त्यानंतर त्याचा मेंदूवर परिणाम होऊ लागतो. प्रायमरी अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीस (PAM) म्हणून ओळखला जाणारा हा रोग मेंदूच्या पेशींचा नाश करतो. PAM आजाराची लागण झाल्यावर पहिली लक्षणे साधारणतः पाच दिवसांनी दिसू लागतात. काही प्रकरणांमध्ये एक ते 12 दिवसांमध्ये लक्षणे दिसून येतात. डोकेदुखी, ताप, मळमळ किंवा उलट्या ही याची सुरुवातीची लक्षणे आहेत.
त्यानंतरच्या काळात मान ताठ होणे, बोलण्यात अडचण, लोकांकडे आणि आजूबाजूच्या वातावरणाकडे लक्ष न देणे, गोंधळणे आणि कोमासारखी स्थिती ही लक्षणे दिसून येतात. ब्रेन इटिंग अमिबाची लक्षणे दिसू लागल्यानंतर हा आजार झपाट्याने पसरतो. या आजारामुळे सुमारे पाच दिवसात मृत्यूही होण्याची शक्यता असते.
ब्रेन इटिंग अमिबावरील उपचार
प्रायमरी अमिबिक मेनिंगोएन्सेफलायटीस हा एक दुर्मिळ आजार आहे. विषाणू शरीरात प्रवेश केल्यानंतर हा आजार झपाट्याने पसरतो. यावर अद्याप प्रभावी उपचार उपलब्ध नसून त्यावर संशोधन सुरु आहे. सध्या या आजारावर उपचार म्हणून अँटीबायोटिक्स, अँटीफंगल्स आणि अँटी-पॅरासिटिक यांचे मिश्रण असलेल्या औषधांद्वारे उपचार केले जात आहेत.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )