Ganesh Chaturthi 2024 : 'तूच सुखकर्ता..!' भारतातील 'ही' प्राचीन, रहस्यमयी गणेश मंदिरं, फार कमी लोकांना माहित, एकदा पाहाच..
Ganesh Chaturthi 2024 : भारतात गणपती बाप्पाची अशी काही खास मंदिरं आहेत, जी खूप प्राचीन आणि रहस्यमयी आहेत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
Ganesh Chaturthi 2024 : ज्या दिवसाची भाविक मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते, तो दिवस अखेर जवळ आला आहे. यंदा गणेशोत्सव 7 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. गणरायाच्या आमगमनासाठी अवघा भारत देश आतुर आहे. त्यासाठी मोठ्या उत्साहात जय्यत तयारीही सुरू आहे. गणरायाचा महिमाच असा आहे, की तो सर्वांचा लाडका बाप्पा आहे. तसं पाहायला गेलं तर बरेच लोक भगवान गणेशाचे भक्त आहेत, भारतात बाप्पाची अशी काही खास मंदिरे आहेत, जी खूप प्राचीन आणि रहस्यमयी आहेत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. जरी देशात सर्वत्र श्री गणेशाची अनेक मंदिरे आहेत, मात्र ही अशी मंदिरं आहेत, जी खूप जुनी आणि प्रसिद्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 मंदिरांबद्दल सांगणार आहोत. दु:ख दूर करणाऱ्या गणेशाच्या काही खास मंदिरांबद्दल जाणून घ्या...
मधुर महागणपती मंदिर- 'हे' एक आजपर्यंत लोकांसाठी एक रहस्य
श्री गणेशाचे हे मंदिर केरळमध्ये आहे. मधुर गणपती मंदिर हे गणपतीचे सर्वात जुने मंदिर असल्याचे म्हटले जाते. हे मंदिर 10 व्या शतकात बांधले गेले. येथे दु:ख हरण करणारी गणेशाची मूर्ती कोणत्या धातूची आहे? हे आजपर्यंत लोकांसाठी एक रहस्य आहे.
चिंतामणी गणेश मंदिर - फार कमी लोकांना माहिती
उज्जैनमध्ये असलेल्या शंकराच्या मंदिराविषयी सर्वांना माहिती आहे. परंतु या महाकाल नगरीत भगवान श्री गणेशाचे चिंतामणी गणेश मंदिर देखील आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. या मंदिरात श्री गणेशाच्या तीन मूर्ती आहेत. गर्भगृहातील पहिल्या मूर्तीला चिंतामण, दुसऱ्या मूर्तीला इच्छामन आणि तिसऱ्या मूर्तीला सिद्धी विनायक या नावाने संबोधले जाते.
रणथंबोर गणेश मंदिर - श्री गणेशाचे तीन डोळ्यांचे रूप
रणथंबोर गणेश मंदिर राजस्थानातील रणथंबोर येथे आहे, जे एक हजार वर्षे जुने आहे. हे मंदिर रणथंबोर किल्ल्याच्या सर्वोच्च भागात आहे. मंदिरात श्री गणेशाचे तीन डोळ्यांचे रूप पाहता येते. अशात जर तुम्ही राजस्थानला जाण्याचा विचार करत असाल तर रणथंबोर गणेश मंदिरात जाऊन बाप्पाचा आशीर्वाद मिळवू शकता.
गणेश टोक मंदिर - मंत्रमुग्ध करणारे गणेशाचे रुप
गंगटोक येथे असलेले गणेश टोक मंदिर सिक्कीममध्ये आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात भगवान श्री गणपतीची भव्य मूर्ती आहे. भेट देणे तुमच्यासाठी एक अनोखा अनुभव असू शकतो. यासोबतच गणेश टोक मंदिराच्या आजूबाजूचे दृश्य अतिशय सुंदर आहे, जे तुम्हाला मंत्रमुग्ध करू शकते.
खर्जना गणेश मंदिर - 286 वर्षांपूर्वी विहिरीतून बाहेर काढण्यात आली गणेशाची मूर्ती
हे प्राचीन मंदिर मध्य प्रदेशातील इंदूर येथे आहे जे वर्षानुवर्षे जुने आहे. या मंदिरात अडथळे दूर करणाऱ्या गणेशाची तीन फूट उंचीची मूर्ती बसवण्यात आली आहे. ही मूर्ती 286 वर्षांपूर्वी एका विहिरीतून बाहेर काढण्यात आली होती. या मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी लांबून लोक येतात.
हेही वाचा>>>
Ganesh Chaturthi 2024 : बाप्पा येतायत..झाली का तयारी? आवश्यक साहित्याची 'ही' यादी सेव्ह करून ठेवा, उपयोगी पडेल.!
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )