(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eye Diseases : वायू प्रदूषणाचा थेट डोळ्यांवर परिणाम, 'या' आजाराचा वाढता धोका; वेळीच काळजी घ्या
Eye Diseases : दीर्घकाळ प्रदूषणात राहणाऱ्या लोकांना डोळ्यांत जळजळ, पाणी येणे आणि अंधुक दिसणे यांसारख्या समस्या निर्माण होतात.
Eye Diseases : वायू प्रदूषणाच्या (Air Pollution) वाढत्या पातळीमुळे अनेक लोक आजारी पडत आहेत. त्यामुळे केवळ श्वसन, त्वचाच नव्हे तर डोळ्यांच्या समस्यांचं प्रमाणही वाढत चाललं आहे. दिवाळीचा उत्साह देखील सगळीकडे पाहायला मिळतोय. त्यामुळे फटाक्यांमुळे होणारं वायू प्रदूषण देखील टाळता येत नाही. अशा वेळी वायू प्रदूषणापासून डोळ्यांचे रक्षण करण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. प्रदूषणामुळे लोक ग्लूकोमा आजाराला बळी पडत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. ग्लूकोमा हा डोळ्यांचा आजार आहे ज्यामध्ये डोळ्यांची दृष्टी कमी होते. दीर्घकाळ प्रदूषणात राहणाऱ्या लोकांना डोळ्यांत जळजळ, पाणी येणे आणि अंधुक दिसणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे नंतर प्रकाश कमी होण्याचा धोका आहे. ग्लूकोमाची लक्षणे आणि ते टाळण्याचे उपाय नेमके काय या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
प्रदूषण आणि डोळ्यांचे आजार
प्रदुषणात नायट्रोजन डायऑक्साईड आणि पीएम 2.5 चे अत्यंत छोटे कण आढळतात, जे डोळ्यांत गेल्यानंतर अनेक समस्या निर्माण करतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. डोळ्यांच्या आत एक मॅक्युला असतो, ज्यामध्ये अनेक लहान पेशी असतात. जेव्हा ते PM 2.5 च्या लहान कणांच्या संपर्कात येतात तेव्हा डोळ्यांना इजा होऊ लागते. आधीच डोळ्यांच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये, परिस्थिती आणखी बिघडू शकते. अशा परिस्थितीत प्रदूषण टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत.
ग्लूकोमाची लक्षणे कोणती?
डोळ्यांच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जे लोक प्रदूषणाच्या जास्त संपर्कात असतात त्यांना डोळ्यांमध्ये जळजळ, डोळ्यांत पाणी येणे आणि अंधुक दृष्टी यांसारख्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. या सर्व समस्या दीर्घकाळ राहिल्यास ग्लूकोमाचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत प्रदूषण टाळण्याची गरज आहे. बदलत्या हवामानातही डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी. वाऱ्यामुळे डोळ्यातील आर्द्रता कमी होऊ लागते आणि कोरडेपणाची समस्या उद्भवू शकते. प्रदूषण आणि हवामानातील बदलामुळे कावीळ आणि डोळे धूसर होण्यासारख्या समस्या वाढून ग्लूकोमाचे रूप धारण करू शकते.
प्रदूषणापासून डोळ्यांचे रक्षण करण्याचे उपाय
1. घराबाहेर जाताना चष्मा घाला.
2. वारंवार डोळ्यांना स्पर्श करू नका.
3. डोळ्यांची जळजळ झाल्यास, डोळे पाण्याने चांगले धुवा.
4. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डोळ्यातील थेंब वापरा.
5. कोणतेही घरगुती उपाय वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :