AC Cooling Tips : वीज बचत अन् एसीची थंड हवा, दोन्ही एकत्र हवंय? मग, ‘या’ टिप्स खास तुमच्यासाठी...
AC Cooling Tips : एसीची योग्य काळजी घेतल्यास कमीत कमी विजेत देखील तुम्ही अधिक थंडगार हवेचा आनंद मिळवू शकता.
AC Cooling Tips : सध्या संपूर्ण देशभरात उन्हाचा तडाखा बसत आहे. तापमानाचा पारा सतत वाढत असल्याने बाहेर पडणे देखील कठीण वाटू लागले आहे. या तीव्र उष्णतेमध्ये ऑफिसमध्ये दीर्घ काळ काम करून घरी आलात किंवा घरून काम करत असाल, तर आरामदायी वाटण्यासाठी आणि या उकाड्यावर मात करण्यासाठी एअर कंडिशनर अर्थात घरात एसी हवा, असे प्रत्येकालाच वाटते. मात्र, एसीसोबतच वाढत्या वीजबिलाचा प्रश्न देखील भेडसावतो.
मात्र, एसीची योग्य काळजी घेतल्यास कमीत कमी विजेत देखील तुम्ही अधिक थंडगार हवेचा आनंद मिळवू शकता. वीज बचतीसाठी एअर कंडिशनर वापरण्याबाबत काळजी घेतली पाहिजे आणि त्याच्या कार्यक्षमतेकडे देखील विशेष लक्ष दिले पाहिजे. एसीची थोडीशी काळजी घेतल्याने वीज बिल देखील वाचेल आणि सोबतच थंड हवा देखील मिळेल. तुम्ही देखील या दोन्ही गोष्टी एकत्र मिळवण्याचा विचार करत असाल, तर एअर कंडिशनर-गोदरेज अप्लायन्सेसचे उत्पादन गट प्रमुख संतोष सलियन यांनी दिलेल्या ‘या’ खास टिप्स नक्की ट्राय करा!
- उन्हाळा सुरू होण्यापूर्वी एसीसाठी प्रतिबंधात्मक देखभाल सेवा अर्थात सर्व्हिसिंग करणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे एसी सर्वोत्तम कामगिरी करेल आणि ऐन कडक उन्हाळ्यात तो मध्येच बंद पडण्याची भीती उरणार नाही.
- एसी स्वच्छ करताना, त्याचे एअर फिल्टर स्वच्छ असल्याची खात्री करून घ्या. यामुळे जास्तीत जास्त कूलिंग क्षमता मिळेल. एअर कंडिशनर चालू असताना खोलीत झाडणे, साफसफाई करणे टाळा. शिवाय फिल्टरमध्ये धूळ किंवा फायबर अडकलेले नाही, याची खात्री करून घेण्यासाठी फिल्टरची आठवड्यातून एकदा तपासणी केलीच पाहिजे.
- एअर कंडिशनरच्या बाहेरील युनिटच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहील याची काळजी घ्या. त्यावर कोणतीही घाण साचू देऊ नका. धूळ आणि घाण हवेचा प्रवाह याचा एसीच्या कुलिंगवर परिणाम करतात.
- थंडगार हवा आणि विजेची बचत या दोन्ही गोष्टी साध्या करण्यासाठी एसी नेहमी 24 ते 26 डिग्री सेल्सिअसच्या तापमानात ठेवा. 22°C च्यावर ठेवलेल्या प्रत्येक डिग्री तापमानासाठी तुम्ही 3-5% पर्यंत वीज बचत करू शकता.
- रात्रीच्या वेळी एसी सुरु ठेवताना स्लीप किंवा टायमर फंक्शन वापरा.
- थंड हवा समप्रमाणात सगळीकडे पसरावी आणि गरम हवा कमी व्हावी यासाठी अधूनमधून सीलिंग फॅन देखील वापरा. यामुळे एअर कंडिशनरच्या बाहेरील युनिटवर कमी दाब पडेल आणि कूलिंगचे काम अधिक कार्यक्षमपणे होईल.
- जाड कापड किंवा ब्लॅकआउट पडदे वापरून खिडकीतून येणारा तीव्र सूर्यप्रकाश रोखा. यामुळे नैसर्गिकरित्या खोलीत विशेषतः दुपारच्या वेळी किंचित गारवा टिकून राहील. खिडक्या किंवा दार उघडे ठेवून एअर कंडिशनर चालवू नका. खोलीची दारे, खिडक्या इत्यादी गोष्टी एसी सुरु असताना योग्यप्रकारे बंद केल्या पाहिजेत.
- एसी निवडताना आर 290 किंवा आर 32 सारखे इको-फ्रेंडली रेफ्रिजरंट वापरणारे पर्यावरणपूरक एसी घ्या. वाढती ग्लोबलवॉर्मिंग कमी करण्याच्या दृष्टीने हे एसी फायदेशीर ठरतील.
हेही वाचा :