(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राम मंदिर बनलं नाही तर सरकार बनणार नाही : उद्धव ठाकरे
LIVE
Background
अयोध्या : राम मंदिर नाही तर आता सरकारही नाही, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. अयोध्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी अयोध्येत पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरेंनी प्रथम पोलीस प्रशासन, यूपी सरकार आणि उत्तर प्रदेशच्या नागरिकांचे आभार मानले.
"सर्व काही कोर्टाच्याच हातात आहे, तर मग निवडणुकीत राम मंदिराचं आश्वासन का दिलं जातं?" असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. "निवडणुकांआधी सगळे राम-राम करतात, निवडणुकीनंतर आराम करतात," असा टोलाही उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावाला.
"राम मंदिर लवकरात लवकर बांधलं गेलं पाहिजे. त्यासाठी अध्यादेश काढा, कायदा बनवा किंवा इतर मार्ग वापरा, पण राम मंदिर बांधा", अशी मागणी उद्धव ठाकरेंनी यावेळी केली. "राम मंदिर बांधल नाही तर पुढे मंदिर बनले, पण हे सरकार नाही बनणार", असा इशाराच उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला.
'अच्छे दिन' सारखा राम मंदिराचा मुद्दाही जुमला होता का? असा गंभीर प्रश्न उद्धव ठाकरेंनी भाजपला विचारला. तसेच हिंदू आता शांत बसणार नाही. हिंदू बांधवांच्या भावनांशी खेळू नका, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला.
"राम मंदिर अद्याप बांधलं गेलं नाही, ही दुर्दैवी बाब आहे. रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर नवचैतन्य मिळालं, मात्र राम अजूनही तुरुंगवासात असल्याची भावना मनात आली. राम मंदिरात जातोय की तुरुंगात जातोय हेच कळत नाही", असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. विरोधकांच्या टीकेला उत्तर देतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, "अयोध्या दौरा करण्यामागे कोणताही छुपा अजेंडा नाही. समस्त हिंदुच्या भावना लक्षात घेत अयोध्या दौरा केला."
पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांचा दोन दिवसांचा अयोध्या दौरा संपला आहे. मात्र या दौऱ्यात त्यांनी भाजपवर टीका जरी केलेली असली तरी राज्यात याच दौऱ्यामुळे सेना-भाजपच्या युतीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.