India At 2047: भविष्यातील इस्रोच्या अंतराळ मोहिमा, जाणून घ्या भारत अवकाशात कसे वर्चस्व गाजवेल
India’s Space Odyssey: भारतीय अंतराळ संशोधन संस्थाने (ISRO) 1960 च्या दशकाच्या सुरुवातीपासून भारतीय अंतराळ कार्यक्रमात (Indian Space Programme) अनेक उल्लेखनीय यश मिळवले आहे.
India’s Space Odyssey: भारतीय अंतराळ संशोधन संस्थाने (ISRO) 1960 च्या दशकाच्या सुरुवातीपासून भारतीय अंतराळ कार्यक्रमात (Indian Space Programme) अनेक उल्लेखनीय यश मिळवले आहे. इस्रो अंतराळ मोहिमेत मोठा इतिहास घडवण्याच्या तयारीत आहे. जेव्हा अमेरिकन उपग्रह Syncom-3 ने 1964 टोकियो ऑलिम्पिकचे थेट प्रक्षेपण केले. ते पाहून भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई (Dr Vikram Sarabhai) यांनी भारतासाठी अवकाश तंत्रज्ञानाचे फायदे ओळखले. डॉ. साराभाईंचा असा विश्वास होता की, अवकाशातील संसाधनांमध्ये समाजाचे खरे प्रश्न सोडवण्याची क्षमता आहे.
यातच 1962 मध्ये अंतराळ संशोधन उपक्रमांचे नेतृत्व करण्यासाठी अणुऊर्जा विभागाच्या (Department Of Atomic Energy) अंतर्गत भारतीय अंतराळ संशोधन समितीची (National Committee for Space Research- INCOSPAR) स्थापना करण्यात आली. नंतर ऑगस्ट 1969 मध्ये त्याच्या जागी स्वतंत्र आणि वेगळी अशी भारतीय अंतराळ संशोधन संस्था स्थापन करण्यात आली. त्यानंतर भारतीय उपग्रह कार्यक्रमाची सुरुवात 19 एप्रिल 1975 रोजी भारताच्या पहिल्या प्रायोगिक उपग्रह आर्यभट्टच्या (Aryabhatta) प्रक्षेपणाने झाली.
उपग्रह आर्यभट्टच्या प्रक्षेपणानंतर इस्रोने मागे वळून पाहिले नाही. यात इस्रोच्या अंतराळ मोहिमांची मोठी यादी आहे. यामध्ये सॅटेलाइट इंस्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट-साइट, रोहिणी सीरीज, इनसॅट आणि जीसॅट सीरीज, एडुसॅट (EDUSAT) भास्कर-1 (Bhaskara-1) पृथ्वी निरीक्षण उपग्रह (Earth Observation Satellite Series), रिकव्हरी एक्सपेरिमेंट सॅटेलाइट सारखी स्पेस सिरीज, सरल, चांद्रयान-1, मार्स ऑर्बिटर मिशन (MOM) यांचा समावेश आहे. यात अॅस्ट्रोसॅट आणि चांद्रयान-2 यांचा देखील समावेश आहे. यातूनच अवकाशात नवा इतिहास घडवण्यासाठी इस्रो कशी जोरदार तयारी करत आहे, हे देखील जाणून घेऊ.
इस्रोच्या भविष्यातील मोहिमा
इस्रोच्या भविष्यातील अनेक मोहिमा आहेत. यात उपग्रह आदित्य L-1, चांद्रयान-3 मिशन, गगनयान मिशन, व्हीनस ऑर्बिटर मिशन आणि NISAR मिशनवर इस्रो काम करत आहे. आदित्य L-1 हे सौर वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी नियोजित कोरोनाग्राफी स्पेसक्राफ्ट (Coronagraphy Spacecraft) आहे. तर चांद्रयान-3 हे इस्रोचे तिसरे चंद्र शोध मोहीम आहे. चांद्रयान-2 मोहिमेची ही पुनरावृत्ती असेल. मात्र त्यात ऑर्बिटर नसेल.
तसेच यातील गगनयान कार्यक्रमाचा उद्देश पृथ्वीच्या खालील पातळीमधील कक्षेत मानवी अंतराळ उड्डाण मोहीम प्रक्षेपित करण्याची स्वदेशी क्षमता प्रदर्शित करणे हा आहे. गगनयान कार्यक्रमांतर्गत पृथ्वीच्या निम्न कक्षेत तीन उड्डाणे पाठवली जातील. यात दोन मानवरहित उड्डाणे असतील. इस्रोच्या या आगामी मोहिमा देशाच्या तांत्रिक क्षमता वाढवतील आणि वैज्ञानिक संशोधन आणि विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतील. हवामानशास्त्र, दळणवळण, टेली-एज्युकेशन आणि टेलिमेडिसिन अशा विविध क्षेत्रात मानवजातीच्या भल्यासाठी इस्रो प्रयत्न करत आहे.