Sherni Official Trailer : बहुप्रतिक्षित 'शेरनी' ची डरकाळी; पुन्हा एकदा चौकटीबाहेरील भूमिकेत झळकतेय विद्या बालन
कायमच आपल्या अभिनय क्षमतेच्या सीमा ओलांडत अफलातून कलाकृतीसाठी तिचं योगदान पाहायला मिळालं आहे
मुंबई : अभिनेत्री विद्या बालन ही कायमच वेगळ्या धाटणीच्या आणि चौकटीबाहेरील भूमिका साकारण्यासाठी ओळखली जाते. कायमच आपल्या अभिनय क्षमतेच्या सीमा ओलांडत अफलातून कलाकृतीसाठी तिचं योगदान पाहायला मिळालं आहे. अशी ही अभिनेत्री आता 'शेरनी' नामक हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला आहे.
टी-सिरीज आणि अबंडनतिया एंटरटेनमेंटची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अमित मसुरकर यानं केलं आहे. विद्या बालन या चित्रपटात एका वन अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरच्या माध्यमातून घरबसल्या जंगलाची सफर घडत आहे. शिवाय मानवी वस्त्यांमध्ये होणारा नव्य प्राण्याचा शिरकाव आणि त्यामुळं कित्येक वर्षांपासून सुरु असणारा संघर्षही पाहायला मिळत आहे.
'अंडही खातो...', म्हणणाऱ्या विगन विराटचे हे शब्द ऐकून क्रीडारसिकांची तीव्र नाराजी
हाच संघर्ष चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुरुषप्रधान समाजामध्ये वावरताना आणि चौकटीबाहेरच्या चाकोरीमध्ये आपला स्वाभिमान जपताना आलेली आव्हानं थोपवून लावणारी वन अधिकारी साकारणाऱ्या विद्याचा राकटपणा तर या भूमिकेतून दिसत आहेच. सोबतच तिच्या भावनिक मनाचंही चित्रण केल्याची एक झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.
शरद सक्सेना, मुकुल चड्ढा, विजय राझ, इला अरूण, ब्रिजेंद्र काला आणि नीरज काबी हे कलाकारही विद्यासोबतच चित्रपटात उल्लेखनीय भूमिका साकारत आहेत. त्यामुळं शेरनीच्या कथानकाची ही जमेची बाजू ठरत आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही. अमेझॉन प्राईम व्हिडीओवर 'शेरनी' प्रदर्शित होणार असून, जगभरातील रसिकांना कलेच्या या नमुन्याची डरकाळी ऐकू जाणार आहे. भारत आणि 240 हून अधिक देश-प्रदेशातील प्राईम सदस्यांना 18 जूनपासून अमेझॉन प्राईम व्हिडीओवर हा चित्रपट पाहता येणार आहे.