‘तुझेच मी गीत गात आहे’मधून अनोखा प्रयोग, मराठीतील पहिली म्युझिकल मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
Tujhech Mi Geet Gaat Aahe : नवी मालिका ‘तुझेच मी गीत गात आहे’साठी एक दोन नाही, तर तब्बल 18 गाणी झाली रेकॉर्ड झाली आहेत. तर, कथानकानुसार आणखी गाणी करण्याचा मानस आहे.
Tujhech Mi Geet Gaat Aahe : छोट्या पडद्यावर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ (Tujhech Mi Geet Gaat Aahe) मालिकेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मालिकेच्या प्रोमोना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोच आहे, त्यासोबतच प्रोमोमध्ये वापरण्यात आलेली गाणी विशेष लक्ष वेधून घेत आहेत. छोट्या स्वरावर चित्रित झालेलं ‘फुलपाखराच्या पंखावरचे म्या रंग मोजते सारे, मलेच ठाऊक गात गाणे येती हे कुठून वारे’ हे गाणं असो किंवा अभिजीत खांडकेकर (Abhijeet Khandkekar) म्हणजेच गायक मल्हार कामतवर चित्रीत झालेलं ‘उडून ये फुलपाखरा, उडून ये माझ्या घरा’ ही दोन्ही गाणी प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालत आहेत.
गाण्याचं स्वप्न उराशी बाळगणारी चिमुकली ‘स्वरा’ आणि ज्याचं संपूर्ण आयुष्य सुरांनी भारलं आहे असा सुप्रसिद्ध गायक ‘मल्हार’ यांचा सांगितिक प्रवास या मालिकेत दाखवण्यात येणार आहे. गाणं हा या मालिकेचा मूळ गाभा आहे.
एक-दोन नव्हे तब्बल 18 गाणी!
‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेसाठी एक दोन नाही, तर आत्तापर्यंत तब्बल 18 गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. कथानकाच्या गरजेनुसार आणखी गाणी यात सामील होणार आहेत. त्यामुळे ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मराठीतील पहिली म्युझिकल मालिका ठरणार आहे.
दिग्गजांचे गीत अन् संगीत!
अवधूत गुप्ते,कौशल इनामदार, अविनाश-विश्वजीत, निलेश मोहरीर, पंकज पडघन, रोहन-रोहन, चिनार-महेश या आघाडीच्या संगीतकारांनी ही गाणी संगीतबद्ध केली असून, स्वप्नील बांदोडकर, आर्या आंबेकर, ऋषिकेश रानडे, स्वरा बनसोडे यांच्या सुरांचा साज या गाण्यांवर चढला आहे. रोहिणी निनावे, कौशल इनामदार, अश्विनी शेंडे, श्रीपाद जोशी, दीप्ती सुर्वे, समीर सामंत या दिग्गज गीतकारांच्या लेखणीतून ही गाणी साकारली आहेत. ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका येत्या 2 मे पासून रात्री 9 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा :
- Lock Upp : ‘खूप प्रयत्न केले आई होण्यासाठी, पण...’, कंगनाच्या जेलमध्ये पायल रोहतगीला अश्रू अनावर!
- ‘माता सीता’च्या भूमिकेमुळे घराघरांत पोहोचल्या, आता राजकारणातही सक्रिय झाल्या दीपिका चिखलिया!
- Irrfan Khan Death Anniversary: ‘सलाम बॉम्बे’ ते ‘अंग्रेजी मीडियम’, ‘या’ चित्रपटांमधून कायम लक्षात राहील इरफान खान!