राणा-अंजलीच्या दिमतीला धावली कोल्हापूर चित्रनगरी; कडक लॉकडाऊनमध्येही नियम पाळून तीन दिवस चित्रिकरण
कोल्हापुरातली वाढती संख्या पाहता पुन्हा कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशावेळी ट्रॅकचा भाग म्हणून या मालिकेच्या काही भागाचं शुट कोल्हापूर चित्रनगरीत चालू होतं. ते चालू असतानाच लॉकडाऊन जाहीर झाला.
मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून राणादा आणि अंजलीबाईंच्या संसाराची गोष्ट असलेली मालिका अर्थात तुझ्यात जीव रंगला गाजतेय. रसिकांनी या मालिकेवर प्रचंड प्रेम केलं. लॉकडाऊन काळात इतरांप्रमाणे या मालिकंच चित्रिकरणही थांबलं होतं. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने सर्वच मालिकांचं शुटिंग सुरु झालं. त्यात ही मालिकाही अपवाद नव्हती. कोल्हापुरातल्या केर्ली गावात या मालिकेचं शुट सुरु झालं. सर्व ती काळजी घेऊनच हे चित्रिकरण चालू होतं. अशातच कोल्हापुरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागली.
कोल्हापुरातली वाढती संख्या पाहता पुन्हा कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशावेळी ट्रॅकचा भाग म्हणून या मालिकेच्या काही भागाचं शुट कोल्हापूर चित्रनगरीत चालू होतं. ते चालू असतानाच लॉकडाऊन जाहीर झाला. कोल्हापूर चित्रनगरी या कलाकारांच्या, मालिकेच्या मदतीला धावून आली आहे. कोल्हापूर चित्रनगरीने या कलाकारांना सर्व सुविधा देऊ केल्या त्यामुळे आवश्यक भाग चित्रित करता आला. तीन दिवस हे चित्रिकरण चालू होतं. त्यानंतर या मालिकेचे कलाकार कोल्हापुरातल्या आपआपल्या घरी गेले.
चित्रनगरीमध्ये या एकाच मालिकेचे कलाकार, तंत्रज्ञ असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं. शिवाय यापैकी कुणीही व्यक्ती बाहेर जाणार नसल्याने संसर्गाची भीती उरली नव्हती. याबद्दल बोलताना चित्रनगरीचे संचालक संजय कृष्णा पाटील म्हणाले, 'मालिका पुन्हा नव्याने सुरु झाली आहे. अशावेळी हा लॉकडाऊन आल्याने मालिकेच्या भागात पुन्हा खंड पडणार होता. लॉकडाऊन पाळायचाच आहे. पण आवश्यक भाग चित्रित करणं गरजेचं होतं. त्यामुळे सर्व खबरदारी घेऊन आम्ही तीन दिवस चित्रकरण करता येईल अशी व्यवस्था केली. त्यांची गरज लक्षात घेऊन चित्रनगरीने आवश्यक गोष्टी त्यांना पुरवल्या. तिथे राहण्याची खाण्याची सोय करण्यात आली. प्रश्न तीन दिवसांचा होता. जिल्हाधिकाऱ्यांनी आखून दिलेले सर्व नियम पाळून आम्ही त्यांना मदत केली. आता सर्व कलाकार आपआपल्या घरी असून सुखरूप आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतर पुन्हा चित्रिकरण चालू होईल.'
कोल्हापुरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा जिल्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. त्यात कोल्हापूरकरांंनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. अशावेळी कोल्हापूर चित्रनगरीने आपली जबाबदारी ओळखून मालिकेच्या युनिटला मदत केल्याने सर्वांनीच जोमात कामाला सुरुवात केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :