क्वीन एलिझाबेथ यांच्यावर आधारित 'The Crown' वेब सीरिजच्या सहाव्या भागाचे शूटिंग थांबणार, निर्मात्याचे संकेत
Queen Elizabeth II : द क्राऊन या वेब सीरिजचे चार सीजन रिलीज झाले असून पाचवा सीजन नोव्हेंबर महिन्यात रिलीज होणार आहे.
मुंबई: ब्रिटनच्या क्वीन एलिझाबेथ (Queen Elizabeth II) यांच्या निधनानंतर आता 'The Crown' या नेटफ्लिक्सवरील वेब सीरिजच्या सहाव्या भागाचे शूटिंग थांबवण्याची शक्यता आहे. या वेब सीरिजचे लेखक आणि निर्माते पिटर मॉर्गन (Peter Morgan) यांनी हे शूटिंग थांबणार असल्याचे संकेत दिले आहेत. पण यावर नेटफ्लिक्सने (Netflix) अद्याप कोणतेही निवेदन प्रकाशित केलं नाही. प्रिन्सेस डायना यांच्या अपघाती मृत्यूनंतरच्या घटनांवर या सीझन आधारित आहे.
ब्रिटनच्या राजगादीवर सर्वाधिक काळ राज्य केलेल्या, म्हणजे सुमारे 70 वर्षे महाराणी असलेल्या क्वीन एलिझाबेथ यांचे शुक्रवारी निधन झालं आहे. 1952 साली त्यांचा राज्याभिषेक झाल्यानंतर त्या आतापर्यंत महाराणी म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्याच जीवनावर नेटफ्लिक्सने (Netflix) द क्राऊन (The Crown) या वेबसीरिजची निर्मिती केली होती. या वेबसीरिजचे चार भाग प्रदर्शित झाले असून पाचव्या भागाचे शूटिंग पूर्ण झालं आहे. पाचवा भाग या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. तर सहाव्या भागाचे शूटिंग सुरू आहे.
क्वीन एलिझाबेथ यांच्या निधनानंतर आता सहाव्या भागाचे शूटिंग थांबणार असल्याचं संकेत मिळत आहेत. याबाबत नेटफ्लिक्सकडून अद्याप दुजोरा देण्यात आला नाही. द क्राऊनचा पहिला सीजन 2016 साली प्रदर्शित करण्यात आला होता.
नेटफ्लिक्सचा द क्राऊन सीजन 5 पुढच्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये रीलिज होणार आहे. या सीजनमध्ये नेमका काय विषय असणार आहे याची गुप्तता बाळगण्यात आली असली तरी 1990 च्या दशकातील घडामोडी आणि 1997 साली झालेल्या प्रिन्सेस डायना याच्या मृत्यूबद्दल यामध्ये भाष्य करण्यात आल्याचं सांगितलं जातंय.
सिझन 6 मध्ये प्रिन्सेस डायनाच्या निधनानंतरच्या घडामोडी चित्रित करण्यात आल्या आहेत. प्रिन्सेस डायनाच्या निधनानंतर प्रिन्स हॅरी आणि प्रिन्स विल्यम्स यांच्या बालपणावर असल्याचं सांगितलं जातंय.
द क्राऊनच्या वेब सीरिजचे पाच सीजन प्रदर्शित झाले असून या क्वीन एलिझाबेथ यांनी ही वेबसीरिज अद्याप पाहिली नसल्याचं सांगितलं जातंय. तसेच सार्वजनिकरित्या त्यांनी यावर कधीही भाष्य केलं नाही. पण द क्राऊनच्या पहिल्या भागात क्वीन एलिझाबेथची भूमिका करणाऱ्या क्लेअर फॉय यांनी त्यांची एकदा भेट घेतली होती. त्यावेळी क्वीन एलिझाबेथ यांनी फॉय यांना 'आपल्याच आयुष्यावर आधारलेली ही वेबसीरिज मी पाहू शकत नाही, त्याचा मी तिसस्कार करते असं म्हटल्याचं सांगितलं.'