Majhi Mansa : स्वकर्तृत्वावर घर सांभाळणाऱ्या गिरीजाची गोष्ट; सुरू होत आहे नवी मालिका 'माझी माणसं'
Majhi Mansa : सनमराठीवर 30 मे पासून 'माझी माणसं' ही मालिका सुरू होत आहे.
Majhi Mansa : 'माझी माणसं' (Majhi Mansa) ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका सनमराठीवर सुरू होणार आहे. स्वकर्तृत्वावर घर सांभाळणाऱ्या गिरीजाची गोष्ट या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेचा प्रोमो आऊट झाल्यापासून प्रेक्षक मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत.
मालिकेचे कथानक काय?
एक वेगळ्या नातेसंबंधाची गोष्ट 'माझी माणसं' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आपल्या वडिलांच्या पश्चात आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या 'गिरीजा'ची ही गोष्ट असून एका हॉस्पिटलमध्ये हेड नर्स असलेली गिरिजा तिच्या आठ जणांच्या कुटुंबातील एकमेव कमवणारी व्यक्ती आहे.
घरातील सर्वांची काळजी घेत असताना, स्वतःकडे; स्वतःच्या सुखाकडे मात्रती नेहमीच दुर्लक्ष करते. कुटुंबाचा एकटाच कमवता आधार असल्यामुळे आपल्या भावंडांच्या शिक्षणापासून ते घरखर्च भागवण्याची जबाबदारी सर्वस्वी गिरीजाच पार पाडते. अर्थात या सगळ्या प्रवासात अनेक अडथळे येतात. त्यातून मार्ग काढताना ज्या आपल्या माणसांचा तिला आधार वाटतो, अशी तिला आपली वाटणारी माणसं खरंच तिची आपली आहेत का? या प्रश्नाभोवती मालिका गुंफलेली आहे.
सन मराठी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या वेगवेगळ्या मालिका आपल्याला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रांतात घेऊन जातात. शहरी आणि ग्रामीण महाराष्ट्रातील राहणीमान, तेथील संस्कृती आणि विविधता यांचा सुरेख मिलाप आपल्याला या मालिकांमध्ये पहायला मिळतो.
View this post on Instagram
'झोंबिवली' फेम जानकी पाठक मुख्य भूमिकेत
महाराष्ट्रातील मालवण या भागातील कुटुंबाची पार्श्वभूमी असलेले मालिकेचे हे कथानक कोकणातील निसर्गसौंदर्याप्रमाणेच उत्तरोत्तर फुलत जाणार आहे. कर्तव्यदक्ष आणि जबाबदार गिरीजाची भूमिका या मालिकेत जानकी पाठक साकारत आहे. झोंबिवली या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या जानकीची ही पहिलीच मालिका आहे. स्मिता सरवदे या मालिकेत गिरीजाच्या आईची भूमिका साकारत असून, दिगंबर नाईक मालिकेत गिरीजाचे काका ही नकारात्मक भूमिका साकारत आहेत. याशिवाय साईंकित कामत, आरती मोरे, भूमिजा पाटील, विजय पाटील, साक्षी महाजन, रोहन पेडणेकर, सोनम म्हसवेकर हे कलाकार सुद्धा या मालिकेत ठळक भूमिकेत दिसणार आहेत.
संबंधित बातम्या