(Source: ECI/ABP News/ABP Majha)
TMKOC : 'पंजाबी सिनेमात काम करत होते, खूशही होते', तारक मेहता फेम 'सोढी' बेपत्ता झाल्यानंतर लेक 'गोगी'ने दिली प्रतिक्रिया
Taarak Mehta ka Ooltah Chashma : गुरुचरण सिंहच्या ऑनस्क्रिन मुलगा गोगी म्हणजेच समय शाहने गुरुचरण बेपत्ता झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
Taarak Mehta ka Ooltah Chashma : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta ka Ooltah Chashma) या कार्यक्रमातील सोढी म्हणजेच अभिनेता गुरुचरण सिंह (Gururcharan Singh) मागील आठवड्याभरापासून बेपत्ता आहे. तो बेपत्ता झाल्यापासून अनेक प्रकारच्या अफवा पसरवल्या जातायत. दरम्यान, गुरुचरणचा ऑन-स्क्रीन मुलगा ज्युनियर सोढी म्हणजेच अभिनेता समय शाह याने नुकताच एक खुलासा केला आहे. त्याने सांगितले की काही महिन्यांपूर्वी त्याने गुरुचरणशी बराच वेळ फोनवरुन संवाद साधला होता. तसेच सोढी एका पंजाबी सिनेमात काम करत असल्याचं त्याने यावेळी सांगितलं.
समयने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये या सगळ्यावर भाष्य केलं आहे. गुरुचरण बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी केली. त्यानंतर पोलिसांच्या हाती काही गोष्टी लागल्या आहेत. त्याचप्रमाणे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे. तो 22 एप्रिल रोजी मुंबईवरुन दिल्लीसाठी फ्लाईट पकडणार होता. पण त्यावेळी तो विमानतळाच्या दिशेने गेला नसल्याची माहिती देखील पोलिसांना मिळाली आहे.
समय शाहने काय म्हटलं?
इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत समय शाह म्हणाला, 'मी त्यांच्याशी चार ते पाच महिन्यांपूर्वी फोनवर बोललो होतो. जवळपास एक तास ते त्याच्यापेक्षा जास्त वेळ आम्ही बोलत होतो. त्यांनी मला अनेक गोष्टी सांगितल्या. मी त्यांना खूप मिस करत होतो, विशेष करुन जेव्हा आम्ही एकत्र काम करत नव्हतो तेव्हा. त्याचप्रमाणे ते एका पंजाबी सिनेमात काम करत असल्याची माहिती देखील यावेळी समयने दिली आहे. मला फारसं त्या चित्रपटाविषयी माहिती नाही, पण त्याचं नाव 'जीएस' असं काहीतरी होतं.
गुरुचरणच्या डीप्रेशनवर समयची प्रतिक्रिया
गुरुचरण सिंग डिप्रेशनमध्ये असल्याच्या चर्चांवरही समयने भाष्य केलं आहे. यावेळी त्याने म्हटलं की, आम्ही बोललो तेव्हा ते खूश होते. मला अजूनही विश्वास बसत नाही की लोक म्हणतात की ते डीप्रेशनमध्ये होते. पण काही सांगू शकत नाही. आम्ही जेव्हा कधी बोलायचो तेव्हा ते खूप गोड आणि मस्त असायचे. त्यांची तब्येतही बरी होती आणि ते सतत माझ्या तब्येतीची चौकशी करायचे. त्यामुळे ते डीप्रेशनमध्ये वैगरे होते, असं मला वाटत नाही. मी त्यांच्यासाठी मुलासारखा होतो. पण मला विश्वास आहे की ते लवकरच परत येतील.