Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर सुभाष सराफ सांगणार अशोक मामांचे मजेशीर किस्से
Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या आगामी भागात अशोक सराफ उपस्थित राहणार आहेत.
Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या (Kon Honar Crorepati) आगामी भागात मराठी मनोरंजनसृष्टी ज्यांना 'अशोक मामा' म्हणून ओळखते असं अभिनयाचं स्वतंत्र बेट असणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) उपस्थित राहणार आहेत. दरम्यान अशोक सराफ यांचे बंधू सुभाष सराफ (Subhash Saraf) अशोक मामांचे मजेशीर किस्से प्रेक्षकांसोबत शेअर करणार आहेत.
पंढरपूरजवळील एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी काम करणार्या आणि त्यांना आधार देणार्या प्रभा-हिरा प्रतिष्ठान संचलित 'पालवी' या सेवाभावी संस्थेसाठी अशोक सराफ 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेत. यावेळी त्यांचे धाकटे बंधू सुभाष सराफ आणि पत्नी निवेदिता सराफ यांच्या भगिनी डॉ. मिनल परांजपे हेदेखील त्यांच्यासह खेळात सहभागी होणार आहेत.
View this post on Instagram
मजेदार किस्से आणि आठवणीत रंगणार विशेष भाग
अशोक सराफ यांचे धाकटे बंधू सुभाष सराफ हे व्यवसायाने सीए आहेत. गेली अनेक वर्षे ते मुंबईत प्रॅक्टिस करत आहेत. अशोक सराफ यांच्या करिअरमध्ये सुभाष यांचा मोलाचा वाटा असून अनेक जुन्या आठवणींना 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर उजाळा देण्यात येणार आहे. मनोरंजनसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अशोक मामा बँकेत नोकरी करायचे आणि एकीकडे नाटकाचे दौरे करायचे. त्या वेळी बँकेत खोटं मेडिकल सर्टिफिकेट देण्यासाठी सुभाष यांना पाठवण्यात यायचे. असे अनेक मजेदार किस्से आणि आठवणी मामा आणि त्यांचे बंधू यांनी या विशेष भागात सांगितल्या आहेत.
लहानपणी प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्याबरोबर नाटकात काम केल्याच्या आणि त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळल्याच्या आठवणीही मामांनी सांगितल्या. 'ययाती आणि देवयानी' ह्या नाटकातून त्यांनी रंगमंचावर पदार्पण केलं, 'प्रेमा तुझा रंग कसा' या नाटकातला पँटची नाडी सुटल्याचा गमतीशीर किस्सा, 'भस्म' सिनेमातल्या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत, संगीताची आवड; अशा अनेक आठवणी आणि किस्से यांमुळे 'कोण होणार करोडपती'चा हा विशेष भाग अधिकच रंगतदार होणार आहे.
अशोक सराफ यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याला आणि दिलदार माणसाला 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर पाहणं, ही प्रेक्षकांसाठी अभिमानास्पद आणि आनंददायी गोष्ट असणार आहे.
कुठे पाहता येणार? सोनी मराठी (सोम-शनि रात्री 9 वाजता), सोनी लिव्ह ॲप
संबंधित बातम्या