Sagar Talashikar: अभिनेते सागर तळाशीकर तब्बल पाच तास अडकले पुण्याच्या वाहतूक कोंडीत; व्हिडीओ शेअर करत म्हणाले, “भयंकर आहे हे”
अभिनेते सागर तळाशीकर (Sagar Talashikar) यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.
Sagar Talashikar: पुण्यातील (Pune) वाहतूक कोंडीमध्ये अनेकजण अडकतात. विविध कारणांमुळे वाहतूक कोंडी होत असते. अनेक सेलिब्रिटी तसेच नागरिक सोशल मीडियावरील पोस्ट शेअर करुन या वाहतूक कोंडीवर संताप व्यक्त करतात. नुकाताच अभिनेते सागर तळाशीकर (Sagar Talashikar) यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्यांनी सांगितलं की, त्यांची 85 वर्षांची आई आणि ते हे तब्बल पाच तास पुण्यातील वाहतूक कोंडीमध्ये अडकले होते. सागर तळाशीकर यांच्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
सागर तळाशीकर यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सागर तळाशीकर आणि त्यांची आई गाडीमध्ये बसले आहेत. सागर तळाशीकर म्हणताता, 'इथे कोणतीही यंत्रणा नाहीये, गाड्या पुढे जात नाहीयेत. याचं कारण काय असावं? याला जबाबदार कोण असावं? या लोकांचे जे हाल होत आहेत? त्याच्याबद्दल काय करता येईल?'
सागर तळाशीकर यांनी या व्हिडीओला कॅप्शन दिलं, 'मित्रहो, हा काल दिनांक 24 जुलैचा व्हिडीओ आहे. मी दुपारी 1.30 ते 7.30 पुण्यातल्या वाहतूक कोंडीत अडकलो होतो. 8.30 ला पुण्यात घरी पोहोचलो. म्हणजे पुण्यात शिरल्यावर आम्ही एकाच पुलावर 5 ते 6 तास होतो. यादरम्यान 700 किंवा 800 मीटर मागे पुढे झालो असू इतकेच.'
'कुणीही तिथे वाहतूक सुरळीत करण्यासाठी नव्हते. माझी 85 वर्षांची आई जिचं नुकतंच मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं आहे; ती पण न खाता बरोबर होती. तिच्या शुगर वगैरे इतर गोळ्यापण घ्यायच्या होत्या. असेच आणखी कितीतरी वृद्ध, स्त्रिया, मुलं, पेशंट्स असतील त्यांनी करायचं काय? स्त्रियांचे बाथरुमच्या प्रॉब्लेमचं काय करायचं? काय झालंय हे सांगायलाही कुणी नाही आणि 7.30 ला तिथून सुटलो तेव्हा बघितलं, तर तिथं कुणीही वाहतूक सुरळीत व्हायला मदत व्हावी म्हणून दिशा दर्शविणारा एकही वाहतूक पोलीस नव्हता, कुणी कार्यकर्तेपण नव्हते, भयंकर आहे हे. शक्य असल्यास ही पोस्ट शेअर करा. चुकून काही करावसं वाटलं संबंधितांना, तर इतरांना उपयोगी पडेल. शक्यता कमीच आहे, पण तरी… सर्वांचे मनःपूर्वक आभार. आम्ही घरी पोहोचलो आहोत आणि आई उत्तम आहे.' असंही सागर तळाशीकर यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं.
सागर तळाशीकर यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ठरलं तर मग! या लोकप्रिय मालिकेमध्ये देखील त्यांनी काम केले.
हेही वाचा-
Pune Traffic : भरमसाठ बैठका, दुरुस्तीचे आदेश पण खड्डे अन् वाहतूक कोंडी जैसे थे; पुणेकर हैराण