(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चॅनलवाल्यांनो.. हे वागणं बरं न्हवं! एकच काम चार जणांना वाटून होतेय निर्मितीमूल्याची गळचेपी
टीव्ही मालिकांच्या संगीतकारांना सध्या फसवणुकीला समाोरं जावं लागू लागलं आहे. काही दिवसांपूर्वी एका संगीतकाराने केलेल्या फेसबुकच्या पोस्टमुळे इंडस्ट्रीत चालणारी ही अव्यावसायिकता समोर आली आहे.
मुंबई : संगीतसृष्टीमध्ये फार गमतीदार गोष्टी चालू आहेत. विशेषत: टीव्ही मालिकांच्या संगीतामध्ये. अलिकडे या संगीतकारांनाही फसवणुकीला समाोरं जावं लागू लागलं आहे. ही अनैतिक फसवणूक केली आहे, ती काही टीव्ही चॅनल्सनी. संगीतकार समीर साप्तिसकरने आपल्या फेसबुक पोस्टद्वारे या घडणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली आहे.
समीर साप्तिसकर हा तरुण संगीतकार आता नवा राहिलेला नाही. समीरने अनेक मालिकांची शीर्षकगीतं केली आहेत. त्यातही त्याने केलेलं खुलता कळी खुलेना या मालिकेचं गीत विशेष गाजलं. त्याने काही दिवसापूर्वी केलेल्या फेसबुकच्या पोस्टमुळे इंडस्ट्रीत चालणारी अव्यावसायिकता समोर आली आहे. सर्वसाधारणपणे एका मालिकेचं संगीत करायचं असेल तर एका संगीतकाराला आमंत्रित केलं जातं. त्याला प्रसंग सांगितला जातो. विषय सांगितला जातो. त्यानंतर संगीतकार त्यावर चाल बांधतो आणि त्यानंतर त्यात फेरफार करून ते मालिकेचं शीर्षक गीत होतं. यात गीतकारही असतो. आजवर असचं चालत आलं आहे. विशिष्ट मराठी चॅनल्सचे संगीतकारही ठरलेले असतात. पण अलिकडे मात्र एकच काम चार लोकांना देण्याचा ट्रेंड वाढू लागला आहे.
याच गोष्टीची माहीती संगीतकार समीर साप्तिसकरने दिली आहे. या पोस्टमधून एक काम चार लोकांना देण्याबाबत त्याला हरकत नाहीय. पण तसं करताना त्याची साधी कल्पना दिली जावी असं त्याला वाटतं. मालिकेच्या शीर्षकासाठी चॅनल बोलावून सगळं ब्रीफ देतं. आपण काही पैसे घालून रफ ट्रॅक तयार करतो पण तेच काम चॅनलने सुमडीत दुसऱ्या संगीतकारालाही दिलेलं असतं. मग काम पसंत पडलं नाही तर सरळ त्या संगीतकारासोबत काडीमोड घेऊन दुसऱ्याच संगीतकाराकडून काम घेतलं जातं. याबाबत पोस्टमध्ये लिहिताना समीर म्हणतो, की 'काम दुसऱ्याला देण्याचीही हरकत नाही. पण निदान सांगत जा. किंवा आपलं काम दुसऱ्याकडे गेलं आहे ते तरी कळू दे.' बऱ्याचदा संगीतकाराने केलेलं काम चॅनल घेतं. त्याला काहीच कल्पना दिली जात नाही आणि मालिका टीव्हीवर येते तेव्हा दुसऱ्याच संगीतकाराने बनवलेलं शीर्षक गीत तिथे लागलेलं असतं. हा प्रकार क्लेषदायी असल्याचं त्याच्या पोस्टवरून जाणवतं.
विशेष बाब अशी गी अनेक गीतकारांनाही असा अनुभव आला आहे. एखाद्या मालिकेचं गीतलेखन करण्यासाठी एखाद्या गीतकाराला पाचारण केलं जातं. तो गीतकार गाणं लिहून देतो. पण मालिकेत दुसऱ्याच गीतकाराचे शब्द असतात. अशावेळी संबंधित संगीतकार, गीतकाराचा निर्मितीचा किमान खर्च किंवा मानधन निदान आदर म्हणूनही दिला जात नाही असं संगीतक्षेत्रातले काही जाणते मान्यवर सांगतात.
बोलून चॅनलशी पंगा घेणार कोण?
विशेष बाब अशी की या अव्यावसायिक पद्धतीबद्दल कोणीही संगीतकार-गीतकार बोलत नाही. कारण, उद्या आपण काहीही बोललो तर ही बलाढ्य चॅनल्स आपल्याला काम देणार नाहीत अशी भीती त्यांना वाटते. काम दुसऱ्याला देण्यालाही हरकत नाही. पण तसं चॅनलने सांगावं. चार लोकांना गाणं देऊन ज्याचं चांगलं गाणं वाटतं ते घ्यावं. पण अशावेळी इतरांनी त्या गाण्यावर जे कष्ट केले असतात त्याचं किमान मानधन देण्याची तसदीही घ्यावी. कारण, रफ टायटल ट्रॅक करण्यासाठीही किमान खर्च येत असतो, असं नाव न सांगण्याच्या अटीवर एका संगीतकाराने सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या :