Mahesh Tilekar: महेश टिळेकर यांच्या पोस्टनं वेधलं लक्ष, म्हणाले, 'काम झाल्यावर सरड्याप्रमाणे रंग बदलले'
Mahesh Tilekar: नुकतीच महेश टिळेकर यांनी एक पोस्ट शेअर करुन अभिनेते मिलिंद गवळी यांचे कौतुक केले आहे. तसेच महेश टिळेकर यांनी काही कलाकारांबाबत देखील या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
Mahesh Tilekar: प्रसिद्ध चित्रपट लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक महेश टिळेकर (Mahesh Tilekar) हे सोशल मीडियावर विविध विषयांवर आधारित पोस्ट शेअर करतात. त्यांच्या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात. नुकतीच महेश टिळेकर यांनी एक पोस्ट शेअर करुन अभिनेते मिलिंद गवळी यांचे कौतुक केले आहे. तसेच महेश टिळेकर यांनी काही कलाकारांबाबत देखील या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
महेश टिळेकर यांची पोस्ट
महेश टिळेकर यांनी फेसबुकवरील पोस्टमध्ये लिहिलं, कृतज्ञ आणि कृतघ्न कलाकार, कलाक्षेत्रात गेली तीस एक वर्ष काम करीत असताना आपण केलेल्या संघर्षाची जाणिव ठेवून इतरांना जमेल तशी मदत करण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला.पण नंतर मुखवट्या मागचे खरे चेहरे कळल्यावर आपण मदत केलेले हेच ते कलाकार का? हा प्रश्न नेहमीच पडायचा. पण काही बोटावर मोजणारे आहेत की ज्यांनी जाहीरपणे कृज्ञतापूर्वक केलेल्या मदतीची जाणीव व्यक्त केली. त्यातीलच एक अभिनेता मिलिंद गवळी. बऱ्याच कलाकारांची हयात जाते पण मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होत नाही. काही उत्तम ,नावाजलेले कलाकार मरेपर्यंत भाड्याच्या घरातच राहिल्याचं मी अगदी जवळून पाहिलं आहे. आपल्या ओळखीचा , नावाचा फायदा आपल्या बरोबर इतरही मराठी कलाकारांना व्हावा, त्यांचीही मुंबईत हक्काची घरे व्हावीत म्हणून मी 15 वर्षांपूर्वी प्रयत्न सुरू केले.अनेक खस्ता खाल्ल्यावर प्रयत्नांना यश आले आणि माझ्या बरोबर 12 गरजू ( त्यावेळी 13 वर्षांपूर्वी )कलाकार आणि तंत्रज्ञांना 2012 मध्ये सरकारी कोट्यातून मी माफक किमतीतील घरे मुंबईतील उच्चभ्रू भागात मिळवून दिली. त्यावेळी ज्यांना घरे मिळवून दिली त्या सर्व मराठी कलाकारांच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा आनंद पाहून खूप समाधान वाटलं होतं. पण हे समाधान फार काळ टिकले नाही. चार एकजण सोडले तर इतरांनी काम झाल्यावर सरड्या प्रमाणे रंग बदलले. घरी जेवायला चहाला नक्की यायचं तुम्ही असं हक्काने म्हणणाऱ्या कलाकारांनी घरात रहायला येऊन वर्षे होऊन गेली तरी घरी काही बोलावलं नाही आणि चांगली किंमत आल्यावर हे कलाकार घरे विकून करोडो रुपयांचा नफा मिळवून मोकळे. असे कर्म दरिद्री कलाकार पाहिल्यावर आपल्या ह्याच मराठी कलाकारांसाठी आपण रक्त आटवून प्रयत्न केले याचा पश्चाताप नक्कीच झाला.
पुढे त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, यातल्या एका कलाकाराला बँकेचे हफ्ते भरायला पैसे नसताना अनेकदा आर्थिक मदत करूनही पैसे परत मिळवताना या कलाकाराने माझ्या तोंडचं पाणी पळवले होते वर " इतकं काय पैश्यासाठी मागे लागलात ,तुम्हाला काय कमी आहे?" अमुक एक तारखेला पैसे परत देतो असा शब्द देऊनही अनेक वेळा ते पैसे वेळेवर परत न करणाऱ्या कलाकाराला वेळोवेळी पार्ट्या करायला, बाहेर फिरायला जायला पैसे असायचे .एका अभिनेत्रीने तर माझ्या एका तंत्रज्ञानाला मिळालेला आणि चांगला व्ह्यू असलेला फ्लॅट, तिचा लकी नंबर असल्याचं सांगून तो फ्लॅट तिला मिळवून देण्यासाठी मला विनंती केली. मी सांगितल्यामुळे आणि मीच फ्लॅट मिळवून दिला असल्यामुळे माझ्या एका शब्दावर त्याने स्वतः चा फ्लॅट त्या अभिनेत्रीला ट्रान्स्फर केला आणि तिचा फ्लॅट त्याने घेतला. ही अभिनेत्री तिला लकी नंबर असलेल्या फ्लॅट मध्ये कधीच रहायला आली नाहीच. तिच्या वेग वेगळ्या कलाकार मित्रांबरोबर फक्त क्षणभर विश्रांतीसाठीच तिथे यायची. पाच वर्षांनी तिथे तो फ्लॅट विकला तेंव्हा चांगला व्हू असल्यामुळे तिला त्या फ्लॅटचे ज्यादा पैसे मिळाले .
'करोडो रुपये मिळूनही या कृतघ्न अभिनेत्रीच्या मनात साधा विचारही आला नाही की ज्या व्यक्तीने त्याचा फ्लॅट आपल्याला ट्रान्स्फर केला त्या तंत्रज्ञाला माणुसकी म्हणून काहीतरी द्यावे.फोन करून मी तिला झापल्या वर तिच्या नशिबात होता म्हणूनच तिला तो फ्लॅट मिळाल्याचे तिने उत्तर दिले आणि " तुमची एवढीच इच्छा असेल मी त्याला काही द्यावे तर मी त्याला चांदीचे एक निरांजन गिफ्ट देते " असं ती बोलल्यावर तिच्यात किती दानत आहे याचा मला अंदाज आला .याच अभिनेत्रीने नंतर एका मोठ्या हुद्द्यावर असलेल्या पैसेवाल्या अधिकाऱ्या बरोबर लग्न केले . काही महिन्यांपूर्वी एका टीव्ही चॅनेलवर ही अभिनेत्री तिच्या नवऱ्या बरोबर समाजकारणात येणार असल्याचे कळवून सांगत होती. तो तिचा अभिनय पाहून मी थक्क झालो. अभिनेता मिलिंद गवळी सारखे केलेल्या मदतीची जाणीव ठेवणारे काही कलाकार आहेत म्हणून काही कलाकारांमध्ये माणुसकी आहे याची प्रचिती येते.' असंही महेश टिळेकर यांनी पोस्टमध्ये लिहिलं.
महेश टिळेकर यांचा हवाहवाई हा चित्रपट गेल्या वर्षी रिलीज झाला. या चित्रपटात वर्षा उसगावकर,निमिषा सजयन, सिद्धार्थ जाधव, गौरव मोरे, मोहन जोशी, स्मिता जयकर यांनी प्रमुख भूमिका साकारली.