(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kon Honaar Crorepati : 'कोण होणार करोडपती' 6 जूनपासून होणार सुरू; रंगणार ज्ञान आणि मनोरंजनाचा अद्भुत खेळ!
Kon Honaar Crorepati : 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचे नवे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Kon Honar Crorepati : 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. 'कौन बनेगा करोडपती'नंतर 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता पुन्हा एकदा हा बहुचर्चित कार्यक्रम 6 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
आता आली आहे आपली वेळ, ज्ञान आणि मनोरंजन यांचा अद्भुत खेळ!
'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळत असते. या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळतो. मागील वर्षी देखील या कार्यक्रमाच्या पर्वात अनेक ज्ञानी स्पर्धक सहभागी झाले होते आणि मोठी रक्कम त्यांनी जिंकली होती.यावर्षीदेखील संपूर्ण महाराष्ट्रातून उत्तम स्पर्धक सहभागी होणार आहेत. 'आता आली आहे आपली वेळ, ज्ञान आणि मनोरंजन यांचा अद्भुत खेळ', असे यंदाच्या पर्वाचं ब्रीदवाक्य आहे.
सचिन खेडेकर करणार सूत्रसंचालन
'कोण होणार करोडपती' या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुन्हा एकदा अभिनेते सचिन खेडेकर करणार आहेत. सचिन खेडेकर एक अष्टपैलू कलाकार आहेत. तसेच त्यांचे संवाद कौशल्यदेखील उत्तम आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून स्पर्धक येत असतात. आणि येणाऱ्या प्रत्येकाशी ते खूप आपलेपणाने बोलत असल्याने स्पर्धकांना ते लगेच आपलेसे वाटतात. त्यांच्या या स्वभाववैशिष्ट्यामुळे हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकाला मानसिक धीर देण्याचं काम ते मोठ्या खुबीने करतात. त्याचबरोबर स्पर्धकांना बोलतं करून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यात त्यांची खूप छान मदत होते. सचिन खेडेकर हे मनोरंजन क्षेत्रातील खूप मोठं नाव असल्याने ज्ञानार्जन आणि मनोरंजन या दोन्हींची ते उत्तम सांगड घालतात.
अभिनेत्री तनुजा, काजोल, लेखिका सुधा मूर्तींच्या उपस्थितीत पार पडणार यंदाचे पर्व
'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाच्या पर्वात यंदा ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा, प्रसिद्ध अभिनेत्री काजोल, प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांच्यासारखे अनेक मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत. ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम आता महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचला आहे. तुमचं ज्ञान तुम्हांला यशाच्या शिखरावर पोचवू शकतं, हे या कार्यक्रमातून सिद्ध झालं आहे. या कार्यक्रमाचं नवं पर्व येत्या 6 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. माणूस कोणत्याही मोठ्या संकटात सापडला, तर त्याचं ज्ञानच त्याला त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करू शकतं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून , खेड्यापाड्यातून स्पर्धक या कार्यक्रमात सहभागी होत असतात. ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात याच ज्ञानाच्या साथीनी स्पर्धक एक करोड रुपये जिंकू शकतात. सामान्य माणसानं आपल्या ज्ञानाच्या बळावर पैसे जिंकून आपली स्वप्नपूर्ती करावी, हाच या कार्यक्रमाचा हेतू आहे. विविध क्षेत्रातले आणि वेगवेगळ्या वयोगटातले स्पर्धक यंदा सहभागी झाले आहेत. या वेळी ज्ञान आणि मनोरंजनाचा अनोखा मेळ पाहता येणार आहे.
तीन लाइफलाइन्सचा वापर स्पर्धकांना करता येणार...
‘कोण होणार करोडपती’च्या या पर्वात बहुमताचा कौल, व्हिडिओ अ फ्रेंड आणि बदली प्रश्न या तीन लाइफलाइन्स असणार आहेत. बदली प्रश्न या लाइफलाइनमध्ये एखाद्या प्रश्नाच्या उत्तराबाबत स्पर्धकाला आत्मविश्वास नसेल तर बदली प्रश्न ही लाईफलाईन वापरून प्रश्न बदलू शकतो.
18 वर्षांची एक तरुण मुलगी ते 70 वर्षांची एक व्यक्ती होणार सहभागी
या पर्वातदेखील समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट ‘कोण होणार करोडपती’मध्ये होणार आहे. दर शनिवारच्या भागात ही मंडळी सहभागी होणार आहेत. मागच्या वर्षी नाना पाटेकर , आनंद शिंदे , यजुर्वेंद्र महाजन , मनोज वाजपेयी , सयाजी शिंदे , मेधा पाटकर , सोनाली कुलकर्णी , कनिका राणे यांसारखी मंडळी कर्मवीर विशेष भागात सहभागी झाली होती. या पर्वातही निरनिराळ्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना बोलवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना दर आठवड्याला रंगतदार भाग बघायला मिळणार आहेत. त्याचबरोबर या पर्वात 18 वर्षांची एक तरुण मुलगी आणि 70 वर्षांची एक व्यक्ती देखील सहभागी झाली आहे. आणि इतर सहभागी स्पर्धकांमध्ये डॉक्टर , पोलीस उपनिरीक्षक ,महिला बस चालक, स्टँडअप कॉमेडियन , एमपीएसी किंवा यूपीएससी पास झालेले विद्यार्थी, आर्मी ऑफिसर , फॉरेस्ट ऑफिसर आणि अगदी रेडिओ अनौन्सरदेखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून, खेड्यापाड्यांतून सहभागी झाले आहेत.
कधी होणार सुरू? 6 जून
कुठे पाहता येणार? सोनी मराठी (सोम-शनि रात्री 9 वाजता), सोनी लिव्ह ॲप
संबंधित बातम्या