(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kiran Mane: 'ही वेळ नव्हती गड्या तुझी जाण्याची...'; किरण मानेंची भावनिक पोस्ट
Kiran Mane: किरण माने यांनी नुकतीच फेसबुकवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये किरण यांनी त्यांच्या मित्राच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
Kiran Mane: अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे सोशल मीडियावर विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट शेअर करत असतात. किरण माने यांनी नुकतीच फेसबुकवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये किरण यांनी त्यांच्या मित्राच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
किरण माने यांनी त्यांच्या मित्रासोबतचे फोटो सोशल फेसबुकवर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आमच्या नाटकाचा दर पंधरा दिवसांनी पुण्याला दौरा असायचा... पहाटे-पहाटे माटुंग्याहून बस निघायची. रात्री नीट झोप झालेली नसायची. बसमध्ये बसल्या-बसल्या आम्ही पांघरूण घेऊन गाढ झोपून जायचो. मात्र मेगा हायवे सुरू झाला की अक्ष्या पेंडसे उठून खिडकीतून बाहेर दर्या-डोंगर-जंगल बघत बसायचा...कायम. मी त्याला म्हणायचो, "झोप की भावा." तो म्हणायचा,"मला सकाळ-सकाळी हा भवतालचा सगळा परीसर पहायला खूप आवडतो. खूप फ्रेश होतो मी हे पाहून." प्रचंड आकर्षण होतं त्याला मेगा हायवेचं ! त्याला माहितही नसेल की नंतर कधीतरी याच हायवेवर.'
किरण माने यांनी पोस्टमध्ये अक्षय पेंडसे यांच्या आठवणींना उजाळा दिला. अक्षय पेंडसे यांचे 2012 मध्ये अपघातात निधन झाले. किरण माने यांनी पुढे पोस्टमध्ये लिहिलं, 'स्काॅटलंडला ॲबरडिनच्या नाईट क्लबमध्ये मी गोर्या पोरींबरोबर डान्स फ्लोअरवर धुमाकूळ घालत असताना लांबून गालातल्या गालात हसत माझ्याकडे पहात डोळे मिचकावणारा अक्ष्या मी कधीच विसरु शकत नाही.'ग्लेनफिडीज' स्काॅच फॅक्टरीला दिलेली भेट. डफटाऊन-एडींबरा सगळीकडे फिरताना, बाहेर बर्फ पडायला लागला की अक्ष्या त्याच्या आवडीची हळूवार इंग्लीश गाणी ऐकायचा. एक दिवस वैतागून मी आणि अक्षता बिवलकरने 'जवा नविन पोपट हा' , 'आबा जरा सरकून बसा की नीट' पासून 'ढगाला लागली कळ' अशी लावलेली इरसाल गाणी... त्यावर वैतागलेला अक्ष्या...हे आठवून अजूनही हसू येतं. तो अतिशय शिस्तप्रिय, मी बेशिस्त. तो टापटिपीत रहाणारा, मी धसमुसळा. अति सभ्यपणावरून मी त्याची जाम खेचायचो ! पण तो चिडायचा नाही. एकदम जेंटलमन, कष्टाळू, सुसंस्कृत, टोकाचा मातृभक्त ! आईचा प्रचंड प्रभाव त्याच्यावर. 'ग्रेट कूक' !! त्याच्या हातचे खूप पदार्थ आवडीनं खाल्लेत मी. आम्हा दोघांच्याही मुलांचा जन्म आठदहा दिवसांच्या अंतराने झाला. कायम आमचा एकमेकांना फोन..मी फोन करायचो, 'अरे आरूष आज स्वत:हून पालथा होऊ लागला.' तो सांगायचा 'प्रत्युषही ट्राय करतोय...' आमच्या लेकरांच्या वाढीचा एकेक दिवस आम्ही एकमेकांशी उत्सूकतेनं शेअर करायचो ! अक्षय तर मुलाची शी-शू धुणे, अंघोळ घालणे आणि मुलाचं लंगोट वगैरे धुवून वाळत घालण्यापर्यन्त सगळं-सगळं हौसेनं करायचा. मला आश्चर्य वाटायचं. मला नाही जमायचं ते....अक्ष्या गेला... जाताना प्रत्युषलाही बरोबर घेऊन गेला... छे... नाही यार अक्ष्या... डोळे भरून येताहेत... नाही लिहू शकत मी तुझ्यावर.. ही वेळ नव्हती गड्या तुझी जाण्याची अक्ष्या !'
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: