(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kiran Mane: 'आपल्या घरात अजून कितीही कचरा असला तरी...'; किरण माने यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
किरण माने (Kiran Mane) यांनी नुकतीच फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे.
Kiran Mane: अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे सोशल मीडियावर विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट शेअर करत असतात. किरण माने यांनी नुकतीच फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये किरण माने यांनी फ्लाइटमधील एक फोटो शेअर केला. या फोटोला किरण माने यांनी दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
किरण माने यांची पोस्ट
किरण माने यांनी त्यांचा विमानातील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, "पोरी, नव्या जगात नवी उड्डाणं घे. तुझ्या करीयरनं छान 'टेक ऑफ' घेतलाय. आता तू जगभर फिरशील... मात्र सगळ्या सीमा पार करून खुल्या आसमंतात भरारी घेताना तुला आश्चर्याचे अनेक धक्के बसतील. घरात लहानपणापासून तुझ्या घरातल्या जवळच्या माणसानं, तुझ्या मनात ज्या थोर व्यक्तीविषयी द्वेष पेरलाय, ती व्यक्ती जगभर पूजनीय आहे, हे कळल्यावर मनामेंदूला बसणार्या हादर्याची आत्तापासून तयारी कर. जाशील त्या देशात तुला महात्मा गांधींच्या देशातली मुलगी म्हणून ओळखले जाईल. जाशील त्या गांवात तुला बापूजींचा पुतळा दिसेल ! ऑस्ट्रेलियात ब्रिस्वेनमध्ये तुला गांधी भेटेल. ताजीकिस्तानमधल्या ड्युशान्बेमध्येही तुला महात्म्याच्या पुतळ्याचे दर्शन होईल. स्पेनच्या बर्गोस शहरात, चायनाच्या बिजिंगमध्ये, माॅरीशस, सुरीनाम, पोलंड, कोरीया जाशील तिथे गांधी,गांधी आणि गांधीच असेल. इंग्लंडमध्ये लंडन,वेस्टमिन्स्टर अशा अनेक शहरात तुला गांधीपुतळा दिसेल. अमेरीकेत तर भारताखालोखाल विक्रमी संख्येनं तुला आपल्या महात्म्याची मूर्ती दिसेल ! गांधीविचारापुढं नतमस्तक होणारं हे सगळं जग वेडं आहे, की या सुर्यावर थुंकण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा माणूस माथेफिरू आहे, याचा तू गांभीर्यानं विचार करू लागशील."
हा विचार करेस्तोवर अचानक तुला दुसरा हादरा बसेल.अमेरीकेत कोलंबिया विश्वविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक दिसेल. लंडनला सर्वांगसुंदर डॉ. भिमराव रामजी आंबेडकर मेमोरीयल दिसेल ! हंगेरीला डॉ. आंबेडकर हायस्कूल, इंग्लंडमध्ये वॉल्वरहॅम्प्टन बुद्ध विहार पाहून डोळे दिपतील. कॅनडाची सायमन फ्रेझर युनिव्हर्सिटी आणि जपानची कोयासन युनिव्हर्सिटी यांनी डॉ. आंबेडकरांच्या कार्याची, साहित्याची, शोधनिबंधांची माहिती देणारे विशेष विभाग स्थापलेत ते ही पहाशील.लंडन स्कूल ऑफ इकाॅनाॅमिक्समध्येही डॉ. आंबेडकरांचा पुतळा दिसेल. या सगळ्या ठिकाणी जगभरातले विद्यार्थी डॉ. आंबेडकरांनी लिहीलेल्या पुस्तकांचा अभ्यास करताना दिसतील ! काहीजण 'Annihilation of Caste' वाचत असतील, तर काहीजण 'The Untouchables: Who were they and why they Became Untouchables' ची पारायणं करत असतील ! तू आंबेडकरांच्या इंडियामधली आहेस हे कळल्यावर त्या विद्यार्थ्यांना खूप आनंद होईल. ते तुला भारतातल्या हजारो वर्षांच्या अस्पृश्यतेबद्दल अनेक प्रश्न विचारतील. हजारो वर्ष ज्यांना शिक्षणापासून आणि सर्व गोष्टींपासून वंचित ठेवलं गेलं होतं. गुलामगिरीत पिचवलं होतं, ते शोषित-पिडीत आता या इनमिन पाऊणशे वर्षांत कुठपर्यन्त पोहोचलेत अशीही चौकशी करतील. त्यांना हे सांगू नकोस की 'मी यश मिळवल्यावर, माझ्या घरातल्या जवळच्या व्यक्तीनं त्या बांधवांना सवलतींवरून टोमणे मारले आहेत...' अजिबात सांगू नकोस हे. कारण जगभर वाईट मेसेज जाईल की या लोकांच्या मनात आजही अस्पृश्यतेचं विष आहे. आपल्या घरात अजून कितीही कचरा असला तरी बाहेरच्यांना तो दिसता कामा नये. त्यामुळं तू त्यांना खोटं हसत बळंबळंच सांग 'सगळं ठीक आहे आमच्याकडे आता. नंतर मात्र तुझ्या धडावर असलेलं तुझं डोकं वापरून या सगळ्यावर विचार कर. वाचन कर. पुन्हा विचार कर. तुला आसपास फक्त 'माणूस'दिसेपर्यंत विचार करत रहा ! तू भाग्यवान आहेस की तू अशा क्षेत्रात करीयर करतीयेस जिथं एकाचवेळी अनेक जात,धर्म,वंश,रंग,प्रांत,देशांची अनेक माणसं रोज एकत्र प्रवास करतात !! तुला रोज जाणवेल की या जगात जर कुठला धर्म असेल तर तो आहे 'मानवता'. बाकी सब झूठ. मग तू हेच विचार तुझ्या पुढच्या पिढ्यांमध्ये मुरव. तुझ्या आधीच्या पिढीतल्या अविवेकी माणसांनी पसरवलेल्या द्वेषाच्या कॅन्सरवर मात करायची हीच थेरपी आहे पोरी.'
किरण माने यांनी या पोस्टच्या माध्यामातून शरद पोंक्षे यांच्यावर टीका केली आहे, असा अंदाज काही जण लावत आहेत. पण किरण माने यांनी या पोस्टमध्ये कोणत्याही कलाकाराच्या नावाचा उल्लेख केला नाही त्यामुळे आता किरण माने यांनी ही पोस्ट कोणासाठी शेअर केली आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Kiran Mane: 'बाईच्या मोहाच्या 'पिंजर्यात' अडकला की...'; किरण माने यांच्या पोस्टनं वेधलं लक्ष