Manva Naik : पोलिसांनी खासगी बसचालकावर गुन्हा दाखल केला, पण आता या सगळ्याला काय अर्थ? गौरव काशिदेच्या निधनानंतर मनवा नाईकची पोस्ट
Manva Naik : ठरलं तर मग या मालिकेतील कलाकार गौरव काशिदे याच्या निधनानंतर निर्माती मनवा नाईक हिने पोस्ट केली आहे.
Manva Naik : ठरलं तर मग (Tharla Tar Mag) या मालिकेतला कलाकार गौरव काशिदे (Gaurav Kashide) याचं अपघाती निधन झालं. त्याच्या निधनाच्या बातमीने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अवघ्या 24 वर्षांचा हा तरुण आपल्या आयुष्याला मुकलाय. त्याच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी त्याच्यासाठी पोस्ट करत त्याला श्रद्धांजली वाहिली. त्याच्यासाठी अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शिका मनवा नाईकने (Manva Naik) काही सवाल उपस्थित करत त्याच्यासाठी पोस्ट केलीये.
गौरव हा 24 जून रोजी त्याच्या बाईकवरुन घरी जात होता. त्यावेळी त्याचा अपघात झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा तो कोमामध्ये होता. पण उपचारांना प्रतिसाद न दिल्याने गौरवचा मृत्यू झाला. तो सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग या मालिकेत काम करत होता. त्याच्या जाण्याने मालिकेतील प्रत्येकाला मोठा धक्का बसला आहे. करिअरसाठी धडपड करणाऱ्या या तरुणानं ऐन तारण्यात जीव गमावला.
मनवाने पोस्टमध्ये काय म्हटलं?
एक मेहनती तरुण मुलगा ज्याने, तुमची मुलगी काय करते? या मालिकेतून सुरुवात केली आणि गुन्ह्याला माफी नाही या मालिकेत तो सहाय्यक दिग्दर्शक झाला. 26 वर्षाचा हा मुलगा स्वत:ची बाईक आणि आयफोन घेतल्यानंतर खूप आनंदित झाला होता. तो घरचा आधार होता, घरची परिस्थिती त्याला बदलायची होती. . पॅकअप करून तो सेटवरून निघाला. जेव्हा मुंबईकर पहिल्या पावसाचा आनंद घेत होते, तेव्हा गौरव वाकोला पुलाजवळ रस्त्याच्यामध्ये पार्क केलेल्या एका खासगी बसला धडकला. त्याच्या मेंदूला मार बसला होता. मेंदूवर सर्जरी करण्यात आली. तो 10 दिवस मृत्यूशी लढत होता पण त्याची झुंज अपयशी ठरली. या घटनेनंतर पोलिसांनी खासगी बसचालकाविरोधात गुन्हा दाखल केला. नंतर इन्शुरन्स कंपनी देखील आली. तसेच या घटनेसाठी खासगी बसचालक जबाबदार असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. पण आता या सगळ्याला काय अर्थ आहे? आम्ही गौरवरला गमावलंय. हे लिहितानाच माझ्या कानात त्याचा आवाज घुमतोय, अशी भावनिक पोस्ट मनवाने केली आहे.