'बिग बॉस'... प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा टाईमपास
भारतात बिग बॉस सध्या सात भाषामध्ये सुरु आहे. कन्नड, बंगाली, तमिळ, तेलुगू, मराठी, मल्याळम आणि हिंदी या भाषांमध्ये बिग बॉस सुरु आहे. कन्नड भाषेत बिग बॉसचे आतापर्यंत 6 सीजन झाले आहेत.
मुंबई : सध्या मराठी 'बिग बॉस'च्या दुसऱ्या सीजनची सगळीकडे जबरदस्त चर्चा सुरु आहे. म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीचे आणखी कोणते नेते शिवसेना-भाजपमध्ये जाणार तितकीच उत्सुकता बिग बॉस- 2 चा विजेता कोण होणार? याकडे अनेकांच लक्ष लागलंय. बिग बॉस नेहमीच चर्चेत राहणारा कार्यक्रम आहे. मात्र ही चर्चा क्षणिक असते हे देखील तितकच खरं. अनेकदा कार्यक्रम संपला की काही महिन्यांत त्यातले स्पर्धक कोण होते हे सुद्धा प्रेक्षकांच्या लक्षात राहत नाही (विजेते सोडले तर).
या कार्यक्रमाची जमेची बाजू म्हणजे कोणतीही कथा नसताना निव्वळ टाईमपास म्हणून प्रेक्षक बांधून ठेवण्याची ताकद या कार्यक्रमात आहे. दोन-तीन एपिसोड पाहिले तर पुढचे एपिसोड पाहण्याची उत्कंठा आपोआप वाढत जाते. यंदाच्या मराठी बिग बॉसच्या सीजनमध्ये खासकरुन एक स्पर्धक प्रेक्षकांच्या लक्षात राहू शकतो, तो म्हणजे अभिजित बिचुकले. बिचुकले राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व म्हणून बिग बॉसच्या घरात गेले. संयम, विचार करुन बोलणे, बोलताना आपल्या बोलण्याचा काय परिणाम होईल याची जाणिव असणे इत्यादी गोष्टी राजकारण्यांमध्ये पाहायला मिळतात. मात्र बिचुकले याला अपवाद आहे. बिग बॉसच्या घरात आपल्या राजकीय भविष्याबद्दल बोलताना, मी भावी मुख्यमंत्री असल्याचे ठामपणे आणि आत्मविश्वासाने त्यांनी अनेकदा सांगितलं. पण जर ते खरंच मुख्यमंत्री झाले तर (होणे शक्यच नाही) सर्व मंत्री, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुजरा करावा लागेल. त्यांचा बिग बॉसमधील वावर पाहिल्यानंतरचा हा अंदाज आहे.
बिग बॉस आणि बिग ब्रदर
आता मुळ मुद्यावर येऊया... 'बिग बॉस' मुळ बॉस नाही. कारण मुळात बिग बॉस हा कार्यक्रमच नेदरलँडच्या 'बिग ब्रदर' या कार्यक्रमावर आधारित आहे. बिग ब्रदर आणि बिग बॉसचा फॉरमॅट सेम टु सेम आहे. जॉन डे मॉल यांना 1997 मध्ये बिग ब्रदर या कार्यक्रमाची संकल्पना सुचली होती. जॉर्ज ऑर्वेल यांच्या 'नाईन्टीन एटीफोर' या प्रसिद्ध कांदबरीतील एका पात्रावरुन या कार्यक्रमाचं शिर्षक देण्यात आलं. या कांदबरीतील कधीही न दिसणाऱ्या बिग ब्रदरने वाचकांना चांगलीच भूरळ पाडली होती. त्यानंतर 1999 मध्ये पहिल्यांदा हा कांदबरीतील बिग ब्रदर टीव्हीवर आला. नेदरलँडमधील वरोनिका चॅनलवर बिग ब्रदर कार्यक्रम पहिल्यांदा प्रसारित करण्यात आला. त्यानंतर बिग ब्रदरचा पसारा वाढतच गेला. सध्या जगभरातील विविध देशांमध्ये, विविध भाषांमध्ये बिग ब्रदर वेगवेगळ्या रुपात आणि नावाने सुरु आहे. भारतात हा 'बिग ब्रदर' 'बिग बॉस' झाला.
भारतीयांना खऱ्या अर्थाने बिग ब्रदरची ओळख 2007 मध्ये झाली. बिग ब्रदर (ब्रिटीश) सीजन-5 मध्ये शिल्पा शेट्टी एका वादामुळे चर्चेत आली होती. हाच वाद शिल्पाच्या उतरती कळा लागलेल्या करिअरला कलाटनी देणार होता, हे तिलाही कदाचित माहित नसावं. 'बिग ब्रदर'ची कंटेस्टंट असताना हॉलिवूड अॅक्ट्रेस आणि मॉडेल जेड गुडीने शिल्पावर वर्णद्वेषी टिपण्णी केली होती. त्यानंतर जगभरात शिल्पाला प्रसिद्धी मिळाली. याचा परिणाम असा झाला की त्या सीजनची शिल्पा विजेती ठरली होती. बुडत्याला काडीचा आधार म्हणतात ना... मात्र शिल्पाला तर पूर्ण स्पीट बोटच मिळाली. त्यानंतर तिच्या करिअरने घेतलेला वेग आजतायगत सुरुच आहे.
बिग बॉसमधील 'बॉस'
मराठी आणि हिंदी बिग बॉसचे होस्ट खऱ्या अर्थाने इंडस्ट्रीचे बॉस आहेत. कारण सलमान खानचा बॉलिवूडमध्ये असलेल्या दरारा वेगळा सांगायला नको. कार्यक्रमाच्या नावाला साजेशा अशा व्यक्तिमत्वाने या कार्यक्रमाच होस्टिंग करायला हवं, असं एकंदर अपेक्षित आहे. हिंदी बिग बॉसच्या सुरुवातीच्या होस्ट्सवर नजर टाकली तर ते त्यांच्या सीजनमध्ये फारशी छाप पाडू शकले नव्हते. सलमानची ज्यावेळी हिंदी बिग बॉसमध्ये एन्ट्री झाली तेव्हापासून त्याने बिग बॉसला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे.
बिग बॉसचा होस्ट म्हटलं की त्याची स्पर्धकांमध्ये दहशत असायला हवी. याआधी अरशद वारसी, शिल्पा शेट्टी, अमिताभ बच्चन, संजय दत्त, फराह खान यांनी हिंदी बिग बॉसचं होस्टिंग केलं. मात्र त्यांना सलमानसारखा दरारा स्पर्धकांमध्ये निर्माण करता आला नाही. या लिस्टमध्ये अमिताभ बच्चन यांचंही नाव आहे. मोठी नावं असली या सर्वांना 'बिग बॉस'चा बॉस होणं जमलं नाही.
आतापर्यंत बिग बॉस हिंदीचे 12 सीजन झाले आहेत. त्यापैकी सात सीजनचं होस्टिंग सलमानने केलं आहे. एका एपिसोडसाठी सलमान कोट्यवधी रुपये आकारतो. कारण त्यांचं कार्यक्रमात असणं किती महत्त्वाचं आहे हे निर्मात्यांना चांगलंच ठाऊक आहे. इतर पाच होस्टच्या तुलनेत सलमानने होस्ट केलेल्या सीजनचा टीआरपी नेहमीच जास्त राहिला आहे. मराठी बिग बॉसचे होस्ट महेश मांजरेकर यांचाही मराठी इंडस्ट्रीवर दबदबा आहे. त्यामुळे स्पर्धकांमध्ये त्यांची दहशत आहे.भारतात सात भाषांमध्ये बिग बॉस
भारतात बिग बॉस सध्या सात भाषामध्ये सुरु आहे. कन्नड, बंगाली, तमिळ, तेलुगू, मराठी, मल्याळम आणि हिंदी या भाषांमध्ये बिग बॉस सुरु आहे. कन्नड भाषेत बिग बॉसचे आतापर्यंत 6 सीजन झाले आहेत. तमिळ भाषेत तीन, तेलुगू भाषेत तीन, मराठीत दोन, बंगाली भाषेत दोन आणि मल्याळम भाषेत एक सीजन आला आहे.
मेघा धाडे मराठी बिग बॉसच्या पहिल्या सीजनची विजेती ठरली होती. मेघासोबत शर्मिष्ठा राऊत, आस्ताद काळे, स्मिता गोंदकर, पुष्कर जोग आणि सई लोकुर हे फायनलिस्ट होते. त्यांनी बिग बॉसच्या घरातील लाईट बंद करुन बिग बॉसच्या घरातील आपला प्रवास संपवला होता. तेव्हापासून हे सर्वजण लाईम लाईटमध्ये आहेत. त्यामुळे बिग बॉस घरात अनोखळी व्यक्तींलाही ओळख मिळते, मात्र ती क्षणिक असू शकते. किशोरी शहाणे, वीणा जगताप, शिव ठाकरे, शिवानी सुर्वे, नेहा शितोळे, आरोह वेलणकर हे मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सीजनचे फायनलिस्ट्स आहेत. यांच्यापैकी कोण विजेता ठरणार हे आज कळणार आहे. सर्व फायनलिस्ट्ना..... बेस्ट ऑफ लक!