Bigg Boss Marathi : 'मालवणी ही मराठी भाषा नाही', वैभव चव्हाणच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्याची संतप्त पोस्ट;म्हणाला 'हे खरे परप्रांतीय...'
Bigg Boss Marathi : वैभवने मालवणी भाषेवर केलेल्या वक्तव्यावर सध्या एका मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत आली आहे.
Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या घरातमध्ये (Bigg Boss Marathi Season 5) प्रत्येकजण प्रत्येकाची एक वेगळी शैली घेऊन आला आहे. कुणी बोलण्यात हुशार आहे तर कुणी राडे घालण्यात पुढे आहे. तसेच कुणी गायक, कुणी रॅपर तर कुणाच्या बोलण्याच्या शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली जातायत. अंकिता हिची मालवणी बोलीही प्रेक्षकांना खूप आवडतेय. पण याच मालवणी भाषेवरुन सध्या बिग बॉसच्या घरात झालेल्या चर्चेची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे.
वैभव चव्हाणने मालवणी ही मराठी भाषा नाही, असं वक्तव्य केलं आहे. त्याचा आणि अरबाजचा संवाद सुरु असतानाच वैभवने हे वक्तव्य केलं. त्यामुळे सोशल मीडियावर या दोघांसाठी बराच रोष व्यक्त केला जातोय. आता एका मराठी अभिनेत्याने देखील पोस्ट करत यावर भाष्य केलं आहे.
मराठी अभिनेत्याची पोस्ट
बिग बॉस मराठीचा माजी स्पर्धक अभिजीत केळकर याने ही पोस्ट केली आहे. अभिजीतने त्याच्या सोशल मीडियावर म्हटलं की, 'कोण आहेत हे लोक आणि नक्की कुठल्या राज्यातून आले आहेत? हे लोक खरे परप्रांतीय आहेत ज्यांना मालवणी भाषा, मराठी भाषा वाटत नाही... हे स्वतः मराठी म्हणून जी भाषा बोलतात, ती भाषा, मराठी म्हणून आम्ही चालवून घेतोच आहोत की. देवा म्हाराजा, ह्यांका BiggBossMarathi5 च्या घरातून, हुसकून भायेर काड आनी "मालाडच्या मालवणीत" नेऊन सोड म्हाराजा, व्हय म्हाराजा...'
अरबाज वैभववर नेटकरी संतापले
दरम्यान सोशल मीडियावरही अरबाज आणि वैभवर नेटकरी संतापल्याचं पाहायला मिळत आहे. एका युजरने कमेंट करत म्हटलं की, मालवणी भाषा ही कोकणची शान आहे.ह्या दोघांना आधी बाहेर काढा. दुसऱ्या एका युजरने कमेंट करत म्हटलं की, अरे त्या वैभव ला भाषेतला श ष कोणता हे कळत नाही... तो काय तोंड वर करून बोलतो. आणखी एका युजरने कमेंट करत म्हटलं की, महाराष्ट्रात राहून जर मालवणी भाषा माहीत नसेल तर काय उपयोग आहे तुमचा? जर मालवणी भाषा कळत नसात तर कोकणात येवा तुमका शिकवतव आम्ही , जर मराठी शो मध्ये तुम्ही इंग्रजी किंवा हिंदी बोलू शकता तर एक मालवणी माणूस आपली मुख्य भाषा बोलू शकत नाही का ?
View this post on Instagram
नेमकं काय घडलं?
बिग बॉसच्या नव्या टास्कमध्ये बाळाला खेळवताना अंकिता मालवणी भाषा बोलते. त्यावेळी वैभव तिचे मालवणी ही मराठी भाषा नाही म्हणून मार्क कापतो. त्यावेळी बी टीम मधले सगळे तिने मराठी न वापरता मालवणी भाषेचा वापर केला म्हणून तिचे मार्क कापतात. त्यानंतर वैभव जेव्हा मलावणी भाषेचा वापर केला म्हणून समोरच्या टीमचे मार्क कापतो, त्यावेळी तो भाषा हा शब्द लिहिला तो शहामृगातला श लिहितो. त्यावर अंकिता म्हणते भाषेतला ष कोणता येतो हे याला माहिती नाही.