Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठीच्या घरात मी माझ्या नवऱ्याला...'; नेमकं काय म्हणाली योगिता चव्हाण?
Bigg Boss Marathi Yogita Chavan : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री योगिता चव्हाण सध्या बिग बॉस मराठी 5 च्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे.
Yogita Chavan And Saurabh Choughule : 'कलर्स मराठी'वरील 'जीव माझा गुंतला' या मालिकेत योगिता चव्हाण नायिका म्हणून झळकली. सर्वगुणसंपन्न, हवीहवीशी वाटणाऱ्या तिच्या अंतरा या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. आता 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमध्येही तिचा चांगलाच बोलबाला आहे. सातारकर असणाऱ्या योगिताचा जन्म ठाण्यात झाला आहे. नृत्यात करिअर करण्याची तिची इच्छा होती. त्यामुळे 'मराठी बाणा' या कार्यक्रमात ती सहभागी झाली. इंडस्ट्रीत बॅकग्राऊंड डान्सर म्हणून तिने काम सुरू केलं. पडद्यामागे काम करत सुरू झालेला तिचा प्रवास आता 'बिग बॉस मराठी'पर्यंत पोहोचला आहे.
योगिता चव्हाणसाठी पहिला आठवडा अडचणीचा ठरला
बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 5) घरात सुरुवातीचा आठवडा योगिता चव्हाणसाठी फार अडचणीचा ठरला. लग्नाला अवघे पाच महिने झाले असताना योगिताने बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली, त्यामुळे पहिल्याच दिवशी तिला नवरा अभिनेता सौरभ चौघुलेची आठवण आली. पहिल्या आठवड्यात योगिता नॉमिनेशनमध्ये होती, त्याशिवाय घरातील इतर सदस्यांमधील राडा आणि भांडणाचाही तिला खूप त्रास झाल्याचं पाहायला मिळालं. पण, त्यानंतर योगित खंबीरपणे बिग बॉसच्या घरातील परिस्थितीला तोंड देत आहे.
'बिग बॉस मराठीच्या घरात जा आणि लढ'
'बिग बॉस मराठी'च्या ग्रँड प्रीमियरमध्ये योगिता म्हणाली होती की, "बिग बॉस मराठी'च्या माध्यमातून योगिता काय आहे हे प्रेक्षकांना कळणार आहे. त्यामुळे मी खूप उत्सुक आहे. 100 दिवस सोशल मीडिया आणि फोनपासून मी दूर असणार आहे. घरच्यांना 'बिग बॉस मराठी'मध्ये जाण्याबाबात सांगितलं, तेव्हा सर्वच खूप आनंदी होते. सासरकडची मंडळीदेखील खूप समजूतदार आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या घरात जा आणि लढ असं त्यांनी सांगितलं आहे".
नवऱ्याला बिग बॉसच्या घरात घेऊन जाण्याची योगिताची इच्छा
योगिता म्हणाली, "बिग बॉस मराठी'च्या घरात जाण्याआधी शेवटचा कॉल मी माझ्या बाबांना केला होता. 'बिग बॉस मराठी'च्या घरात एखादी व्यक्ती घेऊन जाण्यास परवानगी दिली तर मी माझ्या नवऱ्याला घेऊन जाईल. माझा पती खूप मनोरंजक आहे. तो घरात माझा खूप चांगला सांभाळ करेल. यंदाच्या सीझनमध्ये एक फ्रेशनेस आहे. नावीन्य असणाऱ्या सीझनचा मी भाग आहे याचा आनंद आहे. 'बिग बॉस मराठी' जिंकण्याचं मी काही प्लॅनिंग केलेलं नाही. 'बिग बॉस मराठी'च्या घरात मला फक्त मजा करत खेळायचं आहे".