Aapka Apna Zakir : बॉलिवूड सेलिब्रिटींमुळे फ्लॉप झाला झाकिर खानचा पहिला टीव्ही शो, महिन्याभरातच गाठोडं गुंडाळलं
Zakir Khan TV Show : कॉमेडीयन झाकीर खानचा पहिला टीव्ही शो लवकरच चाहत्यांचा निरोप घेणार असल्याचं वृत्त समोर येत आहे.
Aapka Apna Zakir : देशातील अव्वल कॉमेडीयन अशी ओळख असलेला कपिल शर्मा ओटीटीवर फ्लॉप ठरताना दिसत आहे. तर दुसरीकडे स्टँड अप कॉमेडीयन झाकीर खानचा पहिला टीव्ही शो लवकरच चाहत्यांचा निरोप घेणार आहे. अवघ्या महिन्याभरापूर्वी सुरु झालेला आपका अपना झाकीर टीव्ही शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ओटीटी सोडून छोट्या पडद्यावर आलेला झाकीरच्या शोकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं दिसत आहे. त्यामुळे निर्माते शो गुंडाळण्याच्या तयारीत आहे.
झाकिर खानचा पहिला टीव्ही शो सुरु होताच संपला
कपिल शर्माच्या दुसऱ्या इनिंगकडेही प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं दिसत आहे. नेटफ्लिक्सवरील द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो (The Great Indian Kapil Show) प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला नाही. कपिल शर्मा टेलिव्हिजन ओटीटीवर आला आणि फ्लॉप झाला. दुसरीकडे, ओटीटी सोडून टीव्हीवर गेलेला स्टँड अप कॉमेडियन झाकीर खान महिनाभरही टीव्हीवर टीकू शकलेला नाही. शोमध्ये होणारी बॉलिवूड सेलिब्रिटींची गर्दी दोन्ही शोच्या अपयशाचं मुख्य कारण मानलं जात आहे.
महिन्याभरातच गुंडाळला झाकीर खानचा शो
कोरोनाकाळापासून बॉलिवूड चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळत होतं. आता कुठे प्रेक्षक थिएटरकडे वळू लागले आहेत. त्यात बॉलिवूड सेलिब्रिटी चित्रपटांच्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या पर्यायांचा अवलंब करताना दिसत आहेत. त्यात टीव्हीवरील शोमध्ये झळकण्याचाही एक मार्ग आहे. पण, थिएटरमध्ये दिसणारे चेहरे टीव्ही शोमध्ये पाहण्याला प्रेक्षकांची पसंती दिसत नाही. टीव्ही प्रेक्षक हिंदी चित्रपटातील कलाकारांवर इतके चिडले आहेत की, ते शो बंद करण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचले आहेत.
नेमकं कारण काय?
टीव्ही प्रेक्षक हिंदी चित्रपटातील कलाकारांवर इतके चिडल्याने निर्माते शो बंद करण्याच्या तयारीत आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत बनवलेले चित्रपट प्रेक्षकांपर्यंत नेण्यासाठी निर्मात्यांना सध्या कुठलाही नवा मार्ग सुचत नाहीय. सेलिब्रिटी त्यांच्या प्रत्येक चित्रपटापूर्वी देशातील काही निवडक शहरांमधील मॉल्स, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रमोशन करताना दिसतात. यामुळे सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळते. अभिनेता विजय देवरकोंडा याने अशा प्रमोशनबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "हे सर्व कितपत यशस्वी आहे, हे मी स्वतः समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण, आमच्या करारामध्ये याचा उल्लेख आहे आणि आम्हाला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी प्रमोशनसाठी चित्रपट निर्मात्यांना काही दिवस द्यावे लागतील. या काळात ते काय करतात, याची आम्हाला पर्वा नाही, पण आम्हाला ते सांगतील ते करावं लागतं."