(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सई लोकुरच्या हातावर आणि हातात.. दोन्हीकडे गाडी
सईच्या हातावर रंगलेल्या मेंदीमध्ये एक कारचं चित्र दिसलं. अनेकांना सुरुवातीला कळलं नाही की मेंदी काढताना गाडीचं चित्र तिने का काढलं आहे. पण आता त्याचा उलगडा झाला आहे.
मुंबई : सई लोकुर हे नाव सर्वतोमुखी झालं ते बिग बॉसमुळे. बिग बॉसच्या पहिल्या सीझनमध्ये सई लोकुर आणि पुष्कर जोग यांची मैत्री गाजली. हा शो संपल्यानंतर सई आणखी कुठल्या नव्या शोमध्ये दिसली नाही. आता ती चर्चेत आली ती तिच्या लग्नामुळे. सई लोकुरच्या लग्नाचा बार 30 नोव्हेंबरला उडतो आहे. या निमित्ताने लोकुर कुटुंबात लगीनघाई नसली तरच नवल. लॉकडाऊनमुळे अत्यंत मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडत आहे. सध्या सईच्या हातावर मेंदी रंगली आहे. पण गंमत अशी की या मेंदीमध्ये एक कार दिसू लागली आहे. त्यामुळे अनेकांना प्रश्नचिन्ह पडलं आहे.
सई लोकुरच्या मेंदीचे फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. त्या फोटो तिच्या हातावर सुंदर नक्षी दिसतेय. पण आश्चर्याचा भाग असा की याच नक्षीमध्ये एक कार अर्थात गाडीचं चित्रं दिसू लागली आहे. अनेकांना सुरुवातीला कळलं नाही की मेंदी काढताना गाडीचं चित्र तिने का काढलं आहे. आता त्याचा उलगडा झाला आहे. सई लोकुरच्या हातावर गाडीचं चित्र आलं कारण तिनेच मेंदी काढणाऱ्या आपल्या मैत्रिणीला या मेंदीत गाडी काढण्याची विनंती केली. याला कारण सईचे आई-वडील ठरले आहेत. लोकुर कुटुंबियांनी हे लग्न थाटात करायचं ठरवलं आहेच. पण लॉकडाऊनमुळे आणि कोरोनाची भीती असल्याने सर्व नियम पाळूनच हे लग्न होत आहे. या लग्नात सईच्या आई वडिलांनी सईला वेरना ही गाडी भेट दिली आहे.
वेरना ही गाडी सेडान सेगमेंटमध्ये येते. या अलिशान गाडीसोबत सईची बिदाई होणार आहे. सईने या गाडीतूनच घर सोडावं असं तिच्या आई वाडिलांना वाटतं. सईलाही ही भेट आवडली आहे. पण अशी भेट असेल तर ती अविस्मरणीय असणार हे तर उघड आहे. मग आपला हाच आनंद आपण कसा व्यक्त करायचा असा विचार जेव्हा सई करु लागली तेव्हा तिला एक नवी आयडिया सुचली. म्हणून लग्नाच्या काही दिवस आधी मेंदी काढताना, या मेंदीत गाडी काढण्याची विनंती तिने आपल्या मैत्रिणीला केली. त्यानंतर तिनेही ही गाडी तिच्या हातावर काढली.
सई आता तीर्थदीप रॉयसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. तीर्थदीपसोबत ही लगीनगाठ बांधली जाणार आहे ती लोकूर यांच्या घरात. लॉकडाऊनमुळे घरीच अत्यंत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हे लग्न होणार आहे. सई लोकूर यापूर्वी अनेकदा स्क्रीनवर नवरी बनली आहे. काही जाहिरातींमध्येही ती सजलेली दिसते. आता मात्र तिच्या खऱ्या आयुष्यातली ही नवी इनिंग सुरु होत आहे. तिची आणि तीर्थदीपची ही संसाराची गाडी सुसाट आनंदी होवो हीच सदिच्छा.