Smita Jayakar : 'इतकी कामं करुन आजही जाहिरातींच्या ऑडिशनसाठी फोन येतात तेव्हा...', ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता जयकर यांनी व्यक्त केला संताप
Smita Jayakar : अभिनेत्री स्मिता जयकर यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण नुकतच त्यांनी त्यांच्या आयुष्यातली एक खंत व्यक्त केली आहे.
Smita Jayakar : परदेस, सरफरोश, हम दिल दे चुके सनम, देवदास यांसारख्या सिनेमांमध्ये आईची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे स्मिता जयकर (Smita Jayakar). स्मिता जयकर यांनी मराठीसह हिंदी रसिक प्रेक्षकांच्या मनावरही अधिराज्य केलं आहे. पण इतकं असूनही आजही या अभिनेत्रीला जाहिरातींच्या ऑडिशनसाठी कॉल्स येतात, असा अनुभव सांगितला. तसेच त्यांनी सध्याच्या सिनेसृष्टीतल्या सध्याच्या प्रक्रियेवरही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
स्मिता जयकर यांनी नुकतच 'इट्स मज्जा' या युट्युब पोर्टला नुकतीच मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी अनेक गोष्टींबाबत भाष्य केलं आहे. तसेच कोणत्या गोष्टींचा राग येतो यावर त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे दिग्गज अभिनेत्री असूनही आजही जेव्हा ऑडिशनसाठी कॉल्स येतात, तेव्हा काय वाटतं यावरही समिता जयकर यांनी स्पष्टपणे भाष्य केलं आहे. स्मिता जयकर यांनी नेमकं काय म्हटलं याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
स्मिता जयकर यांनी काय म्हटलं?
इतकी वर्ष काम केल्यानंतर आता लांबून ही सिनेसृष्टी तुम्हाला कशी वाटते? या प्रश्नाचं उत्तर देताना स्मिता जयकर यांनी अनेक मुद्दे मांडले. त्यांनी म्हटलं की, 'आता सिनेसृष्टी फार बदलली आहे. तो बदल हा व्हायलाच हवा, आता तो बदल तुम्ही कसा स्वीकारता यावर सगळं अवलंबून असतं. तुम्ही त्या बदलाला विरोध केला की त्रासदायक होतो. बदल होणं हे नैसर्गिक आहे, पण तो बदल कसा घ्यायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे. या प्रत्येक गोष्टीला चांगली आणि वाईट बाजू आहे. आता हे सगळं कॉर्पोरेटच्या हातात गेलंय. तिथे सगळी नवीन पोरं आहेत. आता त्या नवीन पोरांना आम्हा सिनियर्सविषयी माहिती आहे की नाही, याची कल्पना नाही.'
पुढे त्यांनी म्हटलं की, 'मला हे कॅमऱ्यासमोर बोलायचीच इच्छा आहे. जाहिरातींच्या शुटींगसाठी मला दररोज कॉल्स येतात. ते मला सांगतात की मॅडम तुम्ही तुमची लूक टेस्ट द्या. मी त्यांना सांगते लूक टेस्ट देत नाही आणि तुमच्या ऑडिशन्सही देत नाही. त्यावर ते म्हणतात की, नाही फक्त तुम्ही कॅमेऱ्यासमोर तुमचं वय, हाईट आणि तुम्ही अशा कोणत्या प्रोडक्टसाठी जाहिरात केली असेल तर ते सांगा. मी त्यांना सांगते की असं काहीही करणार नाही. त्यामुळे जेव्हा लोकं म्हणातात, की मी असं केलं तसं काम केलं, पण जेव्हा ही मुलं मला असं विचारतात तेव्हा खरंच वाईट वाटतं. आपण मग 30 वर्ष काम करुन केलं काय. मी काही छोटो मोठे रोल केले आहेत, लोकं अजूनही ओळखतात. बरं असंही नाही की, मी मध्ये गायब झाले आणि 15 वर्षांनी परतले असंही नाहीये. त्यामुळे जेव्हा असे कॉल्स येतात, तेव्हा वाटतं की यांना माहिती नाही की हे मु्द्दाम करतात', असं म्हणत स्मिता जयकर यांनी त्यांचा राग व्यक्त केला आहे.