Sharad Ponkshe : ‘मोठ्या भावासारखे माझ्या पाठीशी खंबीरपणे ऊभे राहीले!’, एकनाथ शिंदेंसाठी अभिनेते शरद पोंक्षे यांची पोस्ट
Sharad Ponkshe : शरद पोंक्षे यांनी एक पोस्ट लिहित शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. अर्थात ही पोस्ट राजकीय नसली, तरी राजकीय वादळ सुरु असताना त्यांनी केलेली ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
Sharad Ponkshe : अभिनेता शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) हे चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. आपल्या दमदार अभिनयाने ते प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करतात. केवळ अभिनयच नाही तर, आपल्या बेधडक मतांसाठी देखील ते नेहमी चर्चेत असतात. सध्या महाराष्ट्राचं राजकारण प्रचंड तापलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे सत्तेचं राजकारण ढवळून निघालं आहे. मात्र, या सगळ्यात आता अभिनेते शरद पोंक्षे यांची पोस्ट चर्चेत आली आहे.
शरद पोंक्षे यांनी एक पोस्ट लिहित शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. अर्थात ही पोस्ट राजकीय नसली, तरी राजकीय वादळ सुरु असताना त्यांनी केलेली ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. शरद पोंक्षे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. वेगवेगळ्या घडामोडींवरील तसेच विषयांवरील त्यांची मतं ते सोशल मीडियावर मांडतात.
काय आहे पोस्ट?
‘कर्करोगाशी लढताना मोठ्या भावासारखे मा.शिंदेसाहेब माझ्या पाठीशी खंबीरपणाने ऊभे राहीले’, असे कॅप्शन लिहित अभिनेते शरद पोंक्षे यांनी एक फोटो देखील शेअर केला आहे. या फोटोमध्ये लिहिलेय की, ‘हॉस्पिटलमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला. म्हणाले तुम्ही बिल भरायचे नाही. फक्त स्वतःची काळजी घ्यायची आणि बरं व्हायचं...सख्ख्या भावासारखे ते माझ्या मागे उभे राहिले.’ अभिनेते शरद पोंक्षे यांच्या ‘दुसरं वादळ’ या पुस्तकाची दुसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली. यानिमित्ताने त्यांनी ही पोस्ट शेअर केली होती.
पाहा पोस्ट :
काही वर्षांपूर्वी अभिनेते शरद पोंक्षे यांना काही वर्षांपूर्वी कर्करोगाची लागण झाली होती. या दरम्यान त्यांनी मनोरंजन विश्वातून काही काळ ब्रेक घेतला होता. यातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा दमदार पदार्पण केले. त्यांनी आपण कर्करोगावर मात कशी केली, यावर एक पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात त्यांनी आपला संपूर्ण प्रवास मांडला आहे.
पुन्हा एकदा दमदार पदार्पण!
शरद पोंक्षे सध्या स्टार प्रवाहवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत महत्वाची भूमिका साकारत आहेत. तसेच, त्यांनी ‘उंच माझा झोका’, ‘असे हे कन्यादान’, ‘राधा ही बावरी’ अशा अनेक मालिकांमधून महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच, 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकातील त्यांची नथुरामची भूमिकाही प्रचंड गाजली होती. शरद पोंक्षे यांना अनेक पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे.
संबंधित बातम्या