Alka kubal : 'भन्साळींनी बाजीराव मस्तानीसाठी बोलावलं होतं, पण...', 'या' कारणामुळे अलका कुबल यांना मिळाली नाही बाजीराव मस्तानीमध्ये भूमिका
Alka kubal On Sanjay Leela Bhansali: 'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल पण 'या' कारणामुळे मिळाली नाही भूमिका, एबीपी माझाच्या मुलाखतीत सांगितलं कारण, जाणून घ्या सविस्तर.

Alka kubal: मराठी सिनेसृष्टीवर आपल्या अभिनयाने अनेक दशके राज्य करणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री अलका कुबल सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहेत. ‘माहेरची साडी’ या गाजलेल्या चित्रपटातून त्या आणि त्यांचा सर्वांच्या मनाला भिडणारा अभिनय घराघरात पोहोचल्या. अलका कुबल यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एक मोठा खुलासा केला आहे. ‘माहेरची साडी’मुळे मिळालेल्या प्रचंड लोकप्रियतेसोबतच त्यांच्यावर ‘रडूबाई’ अशी छबी देखील तयार झाली. त्यानंतर अनेक भूमिका त्याच धर्तीवरच मिळत गेल्या. याच इमेजमुळे एक मोठा सिनेमा त्यांच्या हातून निसटल्याचं त्यांनी सांगितलं. संजय लीला भन्साळी यांचा ऐतिहासिक चित्रपट ‘बाजीराव मस्तानी’ या भव्य चित्रपटातील एक भूमिका अलका कुबल यांना ऑफर करण्यात आली होती. मात्र त्यांची इमेज पाहून नंतर ती भूमिका दुसऱ्याच कलाकाराला दिली गेली, असा अनुभव त्यांनी शेअर केला आहे.
“सिनेमात काम करताना कलाकाराला अनेक प्रकारच्या भूमिका करायला मिळाव्यात, पण माझी एक ठरलेली इमेज झाल्यामुळे मला त्या संधी कमी मिळाल्या,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. या वक्तव्यानंतर चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आलं असून, अलका कुबल यांना अजूनही मोठ्या पडद्यावर विविध भूमिकांमध्ये पाहण्याची इच्छा व्यक्त केली जात आहे. अलका यांनी नुकतीच एबीपी माझाला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्या म्हणाल्या, त्यांच्या या गोंडस आणि हसऱ्या चेहऱ्यामुळे माझं नुकसान जास्त झालं', असं म्हटलं आहे.
काय म्हणाल्या अलका?
मला निगेटीव्ह रोल करायला खूप आवडेल. मी निगेटीव्ह रोलमध्ये कशी दिसेल माहिती नाही. पण मला तो करायला आवडेल. मी निगेटिव्ह रोल करायचा प्रयत्न नक्की करेन. मला एका सिनेमांमध्ये गोड दिसते म्हणून निगेटिव्ह रोलसाठी घेतलं नाही. संजय लीला भन्साळी यांनी बाजीराव मस्तानी चित्रपटाच्या एका रोलसाठी मला बोलावलं होतं. पण माझा चेहरा बघून म्हणाले, अरे तुम वैसी दिखती ही नही हो, तुम्हारा फेस तो बहुत सोबर है, असंही होतं म्हणजे कधी कधी. ते म्हणाले तुझा चेहरा एवढा सोज्वळ आहे की आम्ही तुला तो रोल देऊच शकत नाही. तुमच्या गोड चेहऱ्यामुळे देखील नुकसान होतं कधी कधी. वीस दिवस मला त्यांच्या प्रोडक्शन हाऊसमधून वारंवार फोन येत होते. आऊटडोर वरून आल्यावर मी त्यांना भेटायला गेले. पण असो, मी त्यांना एक तास भेटले. माझ्या आयुष्यातला तो एक तास खूप छान गेला. मी त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. ही माझी गोड आठवण आहे. अभिनेत्री तन्वी आजमी यांनी बाजीराव मस्तानी चित्रपटात केलेल्या रोलसाठी अलका यांना बोलवलं होतं.
अलका कुबल यांची कारकीर्द
अलका कुबल यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात 1980 च्या दशकात केली. त्यांनी मराठीसह काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. मात्र त्यांना खरी ओळख मिळाली ती ‘माहेरची साडी’ या सुपरहिट चित्रपटामुळे. या चित्रपटात त्यांनी साकारलेली समजूतदार, दु:खी पण कणखर स्त्रीची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. यानंतर त्यांची एक विशिष्ट प्रतिमा म्हणजे "हळवी, सोज्वळ," अशी तयार झाली, जी त्यांच्या अभिनय कौशल्याचा फक्त एकच पैलू दाखवत होती. त्यांनी अनेक सामाजिक, कौटुंबिक आणि भावनिक भूमिकांमध्ये काम केलं, पण या प्रतिमेमुळे त्यांना विविधतेने भरलेल्या भूमिका मिळण्यात मर्यादा आल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. अलका सध्या त्यांच्या 'वजनदार' या नाटकामुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांचं 'वजनदार' हे नाटक रंगभूमीवर दाखल झालं आहे. अलका काही मालिकांमध्येही दिसल्या होत्या.























