Saif ali khan attack in Mumbai: सैफ अली खानच्या मणक्यातून सुऱ्याचं अडीच इंची पातं बाहेर काढलं, थोरॅसिक स्पायनल कॉडला दुखापत, डॉक्टर काय म्हणाले?
saif ali khan knife attack: सैफ अली खान याच्यावर एकूण सहा वार करण्यात आले. त्याच्या मानेवर 10 इंच खोल जखम झाली आहे. सैफच्या मणक्यात घुसलेलं सुऱ्याचं पातं डॉक्टरांनी काढलं
मुंबई: बॉलीवूड इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध नट आणि पद्मश्री पुरस्कार विजेता अभिनेता सैफ अली खान याच्यावर बुधवारी रात्री त्याच्या मुंबईतील राहत्या घरी एका चोराने हल्ला केला. सैफ अली खान (Saif ali khan) हा वांद्रे येथील सतगुरु शरण इमारतीमध्ये राहतो. घरात शिरलेल्या चोराशी त्याची झटापट झाली होती. यावेळी चोराने धारदार सुऱ्याने सैफ अली खानवर सहा वार केले होते. यामध्ये सैफ अली खान गंभीररित्या जखमी झाला होता. मुंबईच्या लिलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. यासंदर्भत लिलावती रुग्णालयातील डॉ. निरज उत्तमानी आणि न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन सैफ अली खानच्या प्रकृतीबाबत माहिती दिली.
सैफ अली खान याच्यावर न्यूरोसर्जरी आणि प्लॅस्टिक सर्जरीची शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्याला अतिदक्षता कक्षात (ICU Ward) हलवण्यात आले आहे. त्याला एका दिवसासाठी डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. सैफ अली खानची प्रकृती स्थिर असून तब्येत वेगाने सुधारत आहे, अशी माहिती डॉ. निरज उत्तमानी यांनी दिली.
सैफला दोन खोल जखमा, दोन मध्यम स्वरुपाच्या जखमा झाल्या आहेत. काही ठिकाणी चाकूने खरचटले आहे. आम्ही शस्त्रक्रिया करुन त्याच्या मणक्यातून अडीच इंचाचा चाकूचा तुकडा मणक्याच्या भागातून बाहेर काढला, असेही डॉ. निरज उत्तमानी यांनी सांगितले.
सैफच्या थोरॅसिक स्पायनल कॉडला दुखापत; डॉक्टरांची माहिती
न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफ अली खान याला काल रात्री 2 वाजता लिलावती रुग्णालयात जखमी अवस्थेत आणण्यात आले. त्याच्या थोरॅसिक स्पायनल कॉडला मोठी दुखापत झाली आहे. शस्त्रक्रिया करुन त्याच्या मणक्यातील सुरा बाहेर काढण्यात आणि स्पायनल फ्लुईडचा प्रवाह थांबवण्यात आला. सैफ अली खानच्या हातावर, मानेवरचे घाव प्लॅस्टिक सर्जरीची शस्त्रक्रिया करुन पूर्ववत करण्यात आले आहेत. डॉ. श्रीनिवास कुडवा यांच्या नेतृत्त्वाखाली ही शस्त्रक्रिया पार पडली. सैफच्या थोरॅसिक स्पायनल कॉडमधून लांब सुरा बाहेर काढण्यात आला, अशी माहिती न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे यांनी दिली. सध्या मुंबई पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे.
आणखी वाचा