Saif Ali Khan Attacked in Mumbai: सैफ अली खानवर मुंबईत चोराकडून धारदार शस्त्राने वार; सुप्रिया सुळेंनी बारामतीतून लगेच फोन फिरवला, म्हणाल्या....
Saif Ali Khan: सैफ अली खानवर हल्ला. रात्री अडीच वाजता हा प्रकार घडल्याचे समजते. चोराशी झटापट झाली , हल्ला झाल्याने सैफ अली खान गंभीर जखमी
मुंबई: बॉलीवूड इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेता सैफअली खान याच्यावर बुधवारी रात्री राहत्या घरी एका चोराने धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये सैफ अली खान याला गंभीर दुखापत झाली आहे. चोराने सैफच्या मानेवर आणि पाठीवर वार केल्याचे समजते. त्याच्या मानेवर 10 सेंटीमीटरची खोल जखम झाली आहे. तर धारदार पाते त्याच्या पाठीत रुतून राहिले होते. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. रात्री अडीच वाजता हा प्रकार घडल्याचे समजते. आज सकाळी या घटनेची माहिती समोर आली तेव्हा खासदार सुप्रिया सुळे या बारामती येथील कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमात होत्या. त्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने सैफच्या कुटुंबीयांना फोन केला.
सुप्रिया सुळे सैफच्या कुटुंबीयांशी फोनवर बोलत असतानाचा संवाद 'एबीपी माझा'च्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. फोनवरील व्यक्ती नेमकी कोण होती, हे समजू शकलेली नाही. मात्र, ही व्यक्ती करिना कपूरची बहीण करिश्मा कपूर असावी, असा अंदाज आहे. सुप्रिया सुळे यांनी फोनवरील व्यक्तीला सांगितले की, बेबो आणि सैफला सांग मी फोन केला होता. काय होतंय, ते मला सांगत राहा. काळजी घ्या. मी काही मदत करु शकत असेन तर मला सांगा, असे सुप्रिया सुळे यांनी फोनवरील व्यक्तीला सांगितले.
हा फोन ठेवल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी याबाबत फार बोलण्यास नकार दिला. मात्र, सैफ अली खानवरील हल्ला धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटले. जी घटना घडली त्याबद्दल पोलीस आणि सैफ अली खानच्या कुटुंबाकडून काय अधिकृत माहिती येते , हे आपण पाहुयता. आपण त्यांच्या खासगीपणाचा आदर केला पाहिजे, अशी मोघम प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.
नेमकं काय घडलं?
सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरात रात्री अडीचच्या सुमारास चोर शिरल्याचे लक्षात आले. घरातील नोकरांशी चोराचा वाद सुरु होता. त्यावेळी सैफ अली खान तिकडे आला. त्याची चोराशी झटापट झाली. यावेळी चोराने धारदार शस्त्राने सैफ अली खानवर वार केले. यामध्ये सैफच्या मानेवर, हातावर आणि पाठीवर दुखापत झाली आहे. सैफ अली खानवर लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.
आणखी वाचा
सैफ अली खानवर चाकू हल्ला, घरात शिरलेल्या चोरानं भोकसलं; रुग्णालयात उपचार सुरू