Saif Ali Khan Attacked: तैमूर-जेहच्या नॅनीसोबत चोराची बाचाबाची, सैफच्या पाठीत मागून धारदार शस्त्र खुपसलं, प्रतिकार करुन चोराला पळवलं
Saif Ali Khan Attacked in Mumbai: सैफ अली खान याच्यावर चोराने वार केले. यामध्ये सैफच्या मानेवर आणि पाठीवर गंभीर दुखापत झाली आहे. वांद्रे परिसरातील घटना
मुंबई: बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर वांद्रे येथील राहत्या घरी बुधवारी रात्री एका चोराने हल्ला केला. या चोराने सैफच्या अंगावर धारदार शस्त्राने अनेक वार केले. यामध्ये सैफ अली खानच्या मानेवर, पाठीवर आणि हातावर गंभीर वार झाले. हा सगळा प्रकार रात्री अडीचच्या सुमारास घडला. या घटनेबाबत सैफ अली खानच्या टीमकडून एक निवेदन जारी करुन माहिती देण्यात आली आहे.
या निवेदनातील माहितीनुसार, चोर सैफच्या घरात शिरला. तैमूर आणि जेह या मुलांच्या नॅनीला तो दिसला आणि या दोघांमध्ये बाचाबाची सुरु झाली. हा गोंधळ ऐकून सैफ बेडरुमच्या बाहेर आला. तेव्हा चोराने मागच्या बाजूने त्याच्या पाठीत धारदार शस्त्रं खुपसले. करिना आणि लहान मुलं घरात असल्यामुळे सैफने या चोराला प्राणपणाने प्रतिकार केला. मी चोराला काबूत आणण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र, त्याने माझ्यावर धारदार शस्त्राने अनेक वार केले. त्यामुळे माझ्या शरीरातून बरेच रक्त वाहायला लागले होते. त्यानंतर घरात आरडाओरडा झाल्याने चोर पळून गेला, असा जबाब सैफ अली खाने पोलिसांना दिल्याची माहिती आहे. या घटनेचा आणि चोराचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरु आहे. तोपर्यंत संयम बाळगावा, असे आवाहन सैफच्या टीमकडून करण्यात आले आहे. दरम्यान, मुंबई पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने तातडीने या घटनेचा तपास सुरु केला आहे. काहीवेळापूर्वीच सैफच्या घरातून तीन नोकरांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सगळ्यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येईल.
चोर नेमका कुठून आला?
सैफ अली खान हा वांद्रे येथील सद्गुरु शरण या इमारतीमध्ये राहतो. सैफ अली खान या इमारतीच्या 12 व्या मजल्यावर राहतो. सैफ अली खान याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, चोर घरात शिरला होता. मात्र, मुंबई पोलिसांनी या इमारतीचे गट, लॉबी आणि सैफ राहत असलेल्या मजल्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, यामध्ये कोणतीही व्यक्ती दिसत नाही. त्यामुळे चोर नेमका आला कुठून हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. चोर इमारतीच्या एसी किंवा इलेक्ट्रिक डक्टमधून वर आला का, हे तपासले जात आहे. त्यासाठी बिल्डिंगचा आराखडा पोलिसांकडून तपासला जात आहे. मात्र, एसी किंवा इलेक्ट्रिक डक्टमधून चोर इतक्या वर कसा येऊ शकतो, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.
आणखी वाचा