'लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील' भाजप नेत्याच्या वक्तव्यावर रितेश देशमुखांची सडेतोड प्रतिक्रिया
Riteish Deshmukhs Sharp Reply to BJP Leader: रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे लातूरमध्ये राजकीय वाद. रितेश देशमुख यांचे संयमित पण खणखणीत प्रत्युत्तर.

Riteish Deshmukh slams Ravindra Chavan: महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील, अशी भाषा करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांना विलासरावांचा मुलगा आणि अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याने संयमित पण तितक्याच खणखणीत शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. 'लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही', असे रितेश देशमुख याने म्हटले आहे. रितेशने मंगळवारी सकाळी सोशल मीडियावरुन यासंदर्भातील व्हिडीओ पोस्ट केला.
लातूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविंद्र चव्हाण शहरात आले होते. यावेळी त्यांनी सभा घेत भाषण केलं. उपस्थितांना संबोधित करताना दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर वक्तव्य केलं. यामुळे लातुरमधील वातावरण तापण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधून सध्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
रविंद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?
भाषण करताना रविंद्र चव्हाण म्हणाले, "लातूरमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळतोय. हा उत्साह पाहून लक्षात येते की, लातूर शहरातून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील, यात कोणतीही शंका नाही". त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला.
रितेश देशमुखांची प्रतिक्रिया समोर
यावेळी विलासराव देशमुख यांचे पुत्र रितेश देशमुख याने प्रतिक्रिया दिली आहे. "दोन्ही हात वर करून सांगतो. लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेल्या असतात. लिहिलेलं पुसता येतं. कोरलेलं नाही. जय महाराष्ट्र". त्यानं मोजक्या शब्दांत सणसणीत उत्तर दिलं. रितेशनं हा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियात शेअर केला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांनी समर्थन दर्शवलं.
हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावर हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "स्व. विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूर जिल्ह्यातून पुसू शकणारा अजून कुणी निर्माण झाला नाही. अनेक जण या ठिकाणी इच्छा बाळगून आले. परंतु, स्वाभिमानी लातूरकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. विलासराव देशमुख यांनी आपलं संपूर्ण आयुष्य लातूरच्या विकासासाठी समर्पित केलं. आज सत्तेचा माज असलेले भाजप नेते लातूरमध्ये येऊन बरळून जातात की विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या गेल्यात. त्यांना काय समजणार विलासराव देशमुख यांचं लातूरकरांसोबत असलेलं नातं. भाजपवालो याद राखा, याचा करारा जवाब मिलेगा".
























