'ए हा s s य... तुझ्यासारखीच हाक मारतोय...' दिवंगत प्रिया मराठेच्या आठवणीत नाटकाचं नवं पान उलगडलं, सारी टीम पुन्हा गहिवरली
आता त्या नाटकाच्या रंगमंचावर एक नवीन पान उघडत आहे. प्रियाच्या जागी अभिनेत्री दीप्ती भागवत ‘अ परफेक्ट मर्डर’मध्ये झळकणार आहे.

Priya Marathe: अभिनेत्री प्रिया मराठ्याचं अचानक निघून जाणं हे मराठी रंगभूमी आणि टीव्ही विश्वासाठी मोठा धक्का आहे. कॅन्सरसारख्या आजाराशी दीर्घकाळ झुंज देत अखेर 31 ऑगस्ट रोजी ती या जगाचा निरोप घेऊन गेली. काही वर्षांपूर्वीच तिने या आजारावर मात केली होती, पण नियतीने पुन्हा तिची कसोटी घेतली. ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतून प्रिया शेवटची प्रेक्षकांसमोर झळकली होती. मालिकेसोबतच ती ‘अ परफेक्ट मर्डर’ या नाटकाचा भाग होती. मात्र आजाराने पुन्हा डोके वर काढल्याने तिला दोन्ही कामं अर्धवट सोडावी लागली आणि रंगमंचावरची तिची जागा रिकामी झाली.
प्रियानंतर ‘अ परफेक्ट मर्डर’ नाटकाचं नवं पान
आता त्या नाटकाच्या रंगमंचावर एक नवीन पान उघडत आहे. प्रियाच्या जागी अभिनेत्री दीप्ती भागवत ‘अ परफेक्ट मर्डर’मध्ये झळकणार आहे. अनिकेत विश्वासराव, पुष्कर श्रोत्री, श्वेता पेंडसे, राहुल पेठे आणि सुबोध पंडे या कलाकारांसोबत ती आता ‘मीरा’ ही भूमिका साकारताना दिसणार आहे. नीरज शिरवईकर यांनी नाटकाचं लेखन केलं असून दिग्दर्शनाची धुरा विजय केंकरे यांनी सांभाळली आहे.
‘अ परफेक्ट मर्डर’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या नव्या टप्प्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 5 नोव्हेंबरपासून हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येत आहे, आणि त्याचा पहिला शो मुंबईच्या रॉयल ओपेरा हाऊसमध्ये रंगला. प्रियाच्या जाण्याने नाटकाच्या टीमलाही सुनंसुनं वाटलं . तिच्या शिवाय होणाऱ्या नाटकाच्या प्रयोगामुळं सारेच जण गहिवरले . सोशल मीडियावर या संदर्भात अभिनेता पुष्कर श्रोत्रीने एक पोस्ट केलीय.
"ए हा s s य..." तुझ्याच सारखी हाक मारतोय तुला, प्रिया...ह्या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू... तुझ्या आठवणीत पुन्हा ह्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग करतोय आम्ही... आमच्यावर असंच प्रेम असू दे तुझं! असं म्हणत प्रियाच्या आठवणीत ही पोस्ट करण्यात आलीय.
View this post on Instagram
दीप्ती भागवतसाठी हे नाटक केवळ एक नवीन भूमिका नाही, तर एका भावनिक जबाबदारीसारखं आहे कारण ती त्या कलाकाराची जागा घेत आहे, जी प्रेक्षकांच्या मनात अजूनही जिवंत आहे. दीप्तीची मुलगी जुई भागवतही आज मराठी चित्रपटसृष्टीत झळकत आहे. ‘गुलकंद’, ‘लाईक अँड सबस्क्राईब’ आणि ‘झापुक झुपूक’ या चित्रपटांमधून तिने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
प्रियाच्या जाण्यानंतर रंगमंचावर पुन्हा एकदा तिचं अस्तित्व जाणवणार आहे . तिच्या भूमिकेतून, तिच्या संवादांतून, आणि त्या आठवणींतून ज्या रंगमंचावर अजूनही दरवळत आहेत. ‘अ परफेक्ट मर्डर’चं हे नव्या टप्प्यातलं पुनरागमन म्हणजे प्रियाला अर्पण केलेलं एक सुंदर श्रद्धांजलीगीतच आहे























