रणबीर, करिना अन् करिश्मासोबत संवाद, आलिया भट्टच्या प्रश्नांची उत्तरं, सैफला सांगितली आठवणी; राज कपूरांच्या आठवणींमध्ये रमले पंतप्रधान मोदी
PM Modi Meets Kapoor Family : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच कपूर कुटुंबियांसोबत संवाद साधला.
PM Modi Meets Kapoor Family : दिवंगत चित्रपट निर्माते आणि अभिनेते राज कपूर (Raj Kapoor) म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीच्या एका जमान्याचे जणू शोमन. आज पंतप्रधान मोदी (PM Modi) देखील त्याच राज कपूर यांच्या आठवणींमध्ये रमून गेल्याचं पाहायला मिळालं. निमित्त होतं राज कपूर यांची नातवंडं म्हणजे रणबीर कपूर (Ranbir Kapoor), करिना कपूर (Kareena Kapoor), करिश्मा कपूर (Karishma Kapoor) आणि रिद्धिमा कपूर यांच्यासह कपूर कुटुंबातल्या अनेक सदस्यांनी पंतप्रधान मोदींची घेतलेली भेट. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलेल्या कपूर कुटुंबातल्या अन्य सदस्यांमध्ये नीतू कपूर, आलिया भट, सैफ अली खान यांचाही समावेश होता. कपूर कुटुंबाच्या सदस्यांनी या भेटीत पंतप्रधानांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांना आपल्या मनातील प्रश्नही विचारले.
या साऱ्या मंडळींमध्ये रंगलेल्या गप्पा पाहून तुम्हाला प्रश्न पडला असेल की या भेटीचं निमित्त काय होतं? तर मंडळी, दिवंगत चित्रपट निर्माते आणि अभिनेते राज कपूर यांची जन्मशताब्दी येत्या 14 डिसेंबरला देशभर साजरी करण्यात येत आहे. आणि त्यानिमित्त 13 ते 15 डिसेंबर या कालावधीत राज कपूर यांच्या चित्रपटांच्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा महोत्सव पीव्हीआर आयनॉक्स साखळीतल्या चित्रपटगृहांमध्ये संपन्न होणार असून, त्यासाठी कपूर कुटुंबीयांच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. यावेळी करिना कपूरनं आपल्या तैमूर आणि जहांगीर या मुलांसाठी पंतप्रधान मोदींकडून खास संदेशही लिहून घेतला.
पंतप्रधानांनी साधला कपूर कुटुंबियांशी संवाद
राज कपूर यांचा 100 वा जन्मदिवस म्हणजेच भारतीय चित्रपटसृष्टींचा सुवर्णप्रवासाचा दिवस आहे. 1947 निलकमल आता 2047 ला आपण जातोय... शंभर वर्षांचा जेव्हा प्रवास होतो..तेव्हा ती एक यात्रा होते. मध्य आशियात असा एखादा सिनेमा तयार व्हावा जिथे राज कपूर हे तिथल्या लोकांच्या मनात कायम राहतील, असं यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कपूर कुटुंबियांना सांगितलं.
आलिया भट्टचा प्रश्न
आलियाने पंतप्रधानांना प्रश्न विचारत म्हटलं की, मी आफ्रिकेतील तुमची एक क्लिप पाहिली. ज्यामध्ये तुम्ही एका जवानासोबत आहात आणि त्यामध्ये तुम्ही माझं गाणं गात होतात. पण मी ती क्लिप पाहिली आणि सगळेजण तेव्हा खूप आनंदी होते. आपल्या गाण्यांसोबत लोकं मानाने जोडली जातात त्यालाच धरुन एक प्रश्न आहे की, तुम्ही गाणी ऐकता का? त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले की,मी गाणी ऐकतो आणि मला गाणी ऐकायला आवडतंही. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा मी गाणी ऐकत असतो.
सैफ अली खानला सांगितली वडिलांची आठवण
दरम्यान यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैफ अली खानला त्याच्या वडिलांची टायगर पतौडींचीही आठवण सांगितली. यावेळी पंतप्रधानांनी म्हटलं की, मी तुमच्या वडिलांना भेटलो आहे आणि मला असं वाटलं की, आज मला तीन पिढ्यांना भेटण्याची संधी मिळेल. पण तुम्ही तिसऱ्या पिढीला आणलच नाहीत, असं पंतप्रधानांनी मिश्किलपणे म्हटलं.
राज कपूर यांच्या चाहत्यांच्या आणि नव्या पिढीतल्या चित्रपटरसिकांच्या माहितीसाठी, आगामी महोत्सवात राज कपूर यांचे आग, आवारा, श्री 420, संगम आणि मेरा नाम जोकर आदी चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.