Oscar 2024 : कलाविश्वातील मानाचा सोहळा, कोण ठरतील यंदाचे मानकरी? ऑस्कर 2024च्या विजेत्यांची संभाव्य यादी समोर
Oscar 2024 : नामांकन जाहीर झाल्यापासून ऑस्कर सोहळ्याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली होती. दरम्यान या सोहळ्यातील संभाव्य विजेत्यांची नावं समोर आली आहे.
Oscar 2024 : कलाविश्वात ज्या एका पुरस्कार सोहळ्याची उत्सुकता असते तो ऑस्कर (Oscar 2024) सोहळा येत्या सोमवारी म्हणजेच 11 मार्च रोजी पार पडणार आहे. यंदाच्या ऑस्कर (Oscar Award 2024) सोहळ्याचं हे 96 वं वर्ष आहे. या पुरस्कारांसाठी जानेवारी महिन्यात नामांकनं जाहीर करण्यात आली होती. आता हा सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असून याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. नुकतच या सोहळ्यातील संभाव्य विजेत्यांची (Oscar Winners 2024) नावं समोर आली आहे.
10 मार्च रोजी लॉस एंजेलिस येथील ओव्हेशन हॉलीवूड येथील डॉल्बी थिएटरमध्ये 96 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा होणार आहे. कॉमेडियन जिमी किमेल ही सलग चौथ्यांदा ऑस्करचे सूत्रसंचालन करणार आहे. भारतीय वेळेनुसार पहाटे चार वाजता या सोहळ्याचं प्रक्षेपण सुरु करण्यात येईल.
सर्वोत्कृष्ट चित्रपट
न्यूयॉर्क टाइम्सच्या मते, ख्रिस्तोफर नोलनच्या 'ओपेनहायमर'या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळू शकतो. या यादीमध्ये 'अमेरिकन फिक्शन', 'ॲनाटॉमी ऑफ अ फॉल', 'बार्बी', 'द होल्डोव्हर्स', 'किलर्स ऑफ द फ्लॉवर मून', 'मेस्ट्रो', 'पास्ट लाइव्ह्स' आणि 'पुअर थिंग्ज' 'द झोन' 'ऑफ इंटरेस्ट' या चित्रपटांना देखील नामांकनं आहेत.
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
रिपोर्टनुसार, क्रिस्टोफर नोलनला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ऑस्कर पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. जोनाथन ग्लेझर, योर्गोस लॅन्थिमोस, मार्टिन स्कोर्सेसे, जस्टिन ट्रिट यांनाही यामध्ये नामांकन देण्यात आलंय.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, लिली ग्लॅडस्टोनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळू शकतो. ॲनेट बेनिंग, सँड्रा हलर, केरी मुलिगन, एम्मा स्टोन यांनाही या पुरस्कारासाठी नामांकनं मिळाली आहेत.
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
अहवालानुसार, रॉबर्ट डाउनी जूनियरला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळू शकतो. या पुरस्कारासाठी र्लिंग के. ब्राउन, रॉबर्ट डी नीरो, रायन गॉसलिंग आणि मार्क रफालो यांनाही नामांकन देण्यात आलंय.
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
रिपोर्टनुसार, D'Avine Joy Randolph ला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. एमिली ब्लंट, डॅनिएल ब्रूक्स, अमेरिका फेरेरा आणि जोडी फॉस्टर यासाठी नामांकनं देण्यात आली आहेत.
कुठे पाहाल सोहळा ?
'ऑस्कर 2024' ही नेहमीप्रमाणे एबीसीवर लाईव्ह करण्यात येणर आहे. त्यामुळे इथे तुम्ही तो सोहळा पाहू शकता. तसेच भारतात डिस्नी +हॉटस्टारवरही हा सोहळा थेट प्रक्षेपित केला जाणार आहे. 'ऑस्कर 2024' 11 मार्च रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे चार वाजता प्रक्षेपित केला जाणार आहे.
'ऑस्कर 2024'मध्ये 'ओपनहायमर'ला सर्वाधिक नॉमिनेशन
क्रिस्टोफर नोलनच्या (Christopher Nolan) 'ओपनहायमर' (Oppenheimer) या ब्लॉकबस्टर सिनेमाला 'ऑस्कर 2024'मध्ये सर्वाधिक नामांकन मिळालं आहे. या सिनेमाला एकूण 13 नामांकन मिळाले आहेत.