VIDEO : महात्मा फुले आणि निळू फुले यांचं नातं काय? निळूभाऊंच्या जुन्या मुलाखतीत 'वारसा'चा उल्लेख!
Nilu Phule and Mahatma Phule : 'मला सत्यशोधकी वारसा आहे, मी महात्मा फुलेंचा खापर पणतू आहे', निळू फुलेंनी केला होता मोठा खुलासा

Nilu Phule and Mahatma Phule : दिवंगत अभिनेते निळू फुले यांचे सिनेमे आजही प्रेक्षक तेवढ्याच आवडीने पाहातात. त्यांनी साकारलेल्या कित्येक भूमिका आज देखील प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय असतात. सिनेमांमध्ये खलनायक म्हणून अनेक भूमिका साकारणारे निळू फुले हे वैयक्तिक आयुष्यात संवदेनशील आणि समाजिक चळवळींचं भान असलेले दिग्गज कलाकार होते. दरम्यान, आपण 11 एप्रिल म्हणजे शुक्रवारी महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी केली. महात्मा फुले आणि निळू फुले यांचं नातं काय होतं? याबाबत खुद्द निळु फुलेंनी एका मुलाखतीत भाष्य केलं होतं.
मला सत्यशोधकी वारसा , मी महात्मा फुलेंचा खापर पणतू आहे : निळू फुले
निळु फुले म्हणाले होते की, मला सत्यशोधकी वारसा आहे. मी महात्मा फुलेंचा खापर पणतू आहे. तीन-चार पिढ्या आम्ही पुण्यात आलो. त्यापूर्वी सर्व मंडळी खळद खनावडी जे गाव आहे. तिथे राहात होती. अजूनही काही मंडळी तिथे आहेत. आम्ही तीन-चार पिढ्या तिथे आलो. महात्मा फुले जेव्हा गंजपेठेत राहायला आले. तेव्हापासून फुलेंची सर्व मंडळी पुण्यात स्थायिक झाली. त्याच्यामधला मी एक आहे. राष्ट्रसेवा दलात येण्याचा मार्ग 150 वर्षांपूर्वीच ठरला होता, असं म्हणायला हरकत नाही. मी राष्ट्र सेवा दलात एक वर्ष फुल टाईम काम केलं. त्यानंतर एक वर्ष मी समाजवादी पक्षात देखील काम केलं आहे.
माझा वावर पश्चिम महाराष्ट्रात जास्त होता - निळू फुले
पुढे बोलताना निळू फुले म्हणाले होते की, खरं म्हणजे लोकांनी मला स्वीकाराला कसा? असा प्रश्न पडतो. कारण माझी भाषा ग्रामीण होती. कमलाकर सरांनी मला घोटून तयार केलं. कारण तो ब्राम्हण आहे. त्याच्या तोंडामध्ये सगळी ब्राम्हणी आहे, पण शिव्या देखील आहेत. हे सगळं घोटून घेतलेलं होतं. माझा वावर पश्चिम महाराष्ट्रातला होता. मी जी पुढारी मंडळी पाहिली ती, पश्चिम महाराष्ट्रातली पाहिली. गाव पातळीवरुन जिल्हा पातळीपर्यंत सगळे जण पश्चिम महाराष्ट्रातले होते. राष्ट्रीय चळवळीच्या निमित्ताने आणि सेवा दलाच्या निमित्ताने त्यांच्या अवतीभोवती फिरायचा योग आला होता. त्यामुळं त्यांच्या नकला करणे...ते पोशाख कसे घालतात? बोलतात कसे? या सर्व गोष्टींचा आपोआप अभ्यास झाला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























