#MeToo च्या जाळ्यात पुन्हा अडकला साजिद खान, वयाच्या 17 व्या वर्षी शोषण केल्याचा मॉडेलचा आरोप
साजिद पुन्हा एकदा वादात अडकला आहे, कारण त्याच्यावर पॉला नावाच्या मॉडेलने लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.
मुंबई : दोन वर्षांपूर्वी हॉलिवूडमध्ये आलेली लाट भारतातही आली आणि त्यावेळी मनोरंजनसृष्टीतही लैंगिक शोषणाचे आरोप झाले. यालाच #MeToo चळवळ संबोधली गेली. सोशल मीडियावर अनेक स्त्रियांनी आपल्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडली. त्यावेळी मी टू हॅशटॅग ट्रेंड झाला होता. त्यावेळी अनेक कलाकारांची नावं वादात आली. यावेळी साजिद खानवरही आरोप झाले. त्याच्यावर झालेले आरोप पाहता त्याला हाऊसफुल 4 हा सिनेमा सोडावा लागला होता पण तोच साजिद पुन्हा एकदा वादात अडकला आहे, कारण त्याच्यावर पॉला नावाच्या मॉडेलने लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.
पॉला ही मॉडेलिंग करते. अनेक ब्रॅंड्ससाठी तिने मॉडेलिंग गेोलं आहे. अनेक फॅशन शोमध्ये तिने सहभागही घेतला आहे. पॉलाने इन्स्टाग्रामवरून साजिद खानवर आरोप केले आहेत. यात तिने काही वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला आहे. हाऊसफुलच्यावेळी सिनेमाचं कास्टिंग चालू होतं. त्यावेळी पॉलाला साजिदच्या वर्तनाचा अनुभव आल्याचं ती म्हणते. तिने केलेल्या पोस्टमध्ये ती म्हणते, 'मी त्यावेळी 17 वर्षांची होते. हाऊसफुल सिनेमाचं कास्टिंग चालू होतं. त्यावेळी मी साजिदला भेटले. त्याने माझ्याशी असभ्य, अश्लील संभाषण केलं. शिवाय, मला माझे कपडेही उतरवायला सांगितले. झाल्या प्रकाराने मी खूप घाबरले. पण त्यावेळी मी काही बोलले नाही. कारण, माझ्या आई वडिलांनी याबद्दल कुठेच काही वाच्यता न करण्याबद्दल मला सांगितलं. मी टू चळवळ सुरू झाली. तेव्हा साजिदवर खूप बोललं गेलं. पण मला कुणीच गॉडफादर नाहीय. मला कुटुंबही चालवायचं होतं. आता माझे पालक माझ्यासोबत नाहीयेत. माझी मी माझ्यासाठी कमावते. मला कल्पना नाही किती मुलींना हा अनुभव आला असेल. पण या घटनेचे अत्यंत वाईट पडसाद माझ्या मनावर उमटले. म्हणूनच मग बोलायला हवं असं मला वाटून गेलं. हीच ती वेळ नाही का? अशा लोकांना तुरूंगातच डांबलं पाहिजे. केवळ कास्टिंग काऊच केलं म्हणून नव्हे, तर हे लोक स्वप्नंही हिरावून घेतात. पण मी थांबले नाही. मी वेळेत बोलले नाही ही मात्र माझी चूक झाली. '
View this post on Instagram???????? Before democracy dies and there is no freedom of speech anymore I thought I should speak !
या पोस्टने पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. साजिदवर यापूर्वीही असे आरोप झाले होते. त्यामुळेच त्याला सिनेमा सोडावा लागला होता. त्याला हाऊसफुल 4 मधून काढता पाय घ्यावा लागला होता. साजिद खानवर आता काय कारवाई केली जाते ते पाहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे. पॉलाच्या या आरोपांनंतर पुन्हा एकदा मी टू ची चळवळ जोर पकडते का हे पाहायला हवं. सध्या एकिकडे कंगना रनौत, रिया चक्रवर्ती यांची नावं आणि यांवरचे वाद चर्चेत असताना, पॉलाच्या या पोस्टमुळे बॉलिवूडच्या काळ्या रंगात भरच पडेल हे नक्की.
संबंधित बातम्या :